कायदा एकाच विवाहाला मान्यता देतो, पण प्रत्यक्षात अनेक जण दुहेरी आयुष्य जगताना दिसतात. काही जण तर दोन्ही पत्नींसोबत सोशल मीडियावर रील्स बनवून प्रसिद्धी आणि पैसा कमावताना दिसतात.

समीरा ही तिच्या आईची दोन मुलांनंतर झालेली अत्यंत लाडकी मुलगी. ‘आईचीच लाडकी’ म्हणण्याचे कारण म्हणजे तिचे वडील दारूच्या आहारी गेलेले होते. मुलांच्या शिक्षणासाठी, संगोपनासाठी किंवा भविष्यासाठी त्यांनी कधीच विशेष जबाबदारी घेतली नाही. बिचारी आई मात्र दिवस-रात्र कष्ट करून संसाराचा गाडा ओढत होती.
समीराचे दोन्ही भाऊ फारसे शिकले नाहीत. मोठा भाऊ जेमतेम दहावीपर्यंत पोहोचला, तर धाकटा भाऊ दहावी पूर्ण करण्याआधीच शिक्षणापासून दूर गेला. पुढे तोही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत दारूच्या नशेत रमू लागला.
आईच्या सर्व आशा आता फक्त समीरावरच खिळल्या होत्या. ती शिकेल, स्वतःच्या पायावर उभी राहील आणि घराचे नशीब बदलेल, अशी तिची स्वप्ने होती. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. आठवीच्या परीक्षेत नापास होऊन समीराने आईला मोठा धक्का दिला.
आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने पुढे काय करावे, हा प्रश्न आईसमोर उभा राहिला. ज्या घरांमध्ये ती धुणी-भांडी करण्यासाठी जायची, तिथे कधीकधी ती समीरालाही सोबत घेऊन जाऊ लागली. काही वेळा तब्येत ठीक नसल्यास ती स्वतःच्या जागी समीरालाच कामावर पाठवत असे.
समीरा ज्या घरी कामाला जायची, ते एक सुशिक्षित आणि सुखवस्तू कुटुंब होते. आई-वडील दोघेही शिक्षक आणि दोन मुलगे असा तो परिवार होता. समीराच्या आईचे त्या घरच्यांशी कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते.
याच काळात त्या घरातील मोठा मुलगा धीरज आणि समीरा यांच्यात जवळीक निर्माण झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे प्रेमात. दोघेही गुपचूप भेटू लागले. काळ पुढे सरकत गेला आणि त्यांचे नाते अधिक घट्ट होत गेले.
धीरजला चांगलेच माहीत होते की त्याचे आई-वडील एका अशिक्षित आणि कामगार महिलेच्या मुलीला कधीच सून म्हणून स्वीकारणार नाहीत. त्यामुळे दोघांनी कोणालाही न सांगता कायदेशीररीत्या कोर्ट मॅरेज केले.
काही वर्षे ही गोष्ट गुपितच राहिली. मात्र धीरजच्या आई-वडिलांना याची कुणकुण लागली असावी. त्यांनी तसे काहीही न दाखवता त्याच्यासाठी इतर स्थळे पाहण्यास सुरुवात केली.
एके दिवशी स्थळ पाहण्याच्या बहाण्याने त्यांनी धीरजला बाहेर नेले आणि तिथेच दुसऱ्या एका मुलीशी त्याचे लग्न लावून दिले.
धीरजच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास होता आणि आईची प्रकृतीही सतत नाजूक असायची. "माझे आधीच लग्न झाले आहे," हे सांगितल्यास त्यांना धक्का बसेल, या भीतीने धीरज गप्प राहिला. त्याच्या या मौनामुळे मात्र तीन आयुष्ये अंधारात ढकलली गेली.
ही बातमी समीराच्या कानावर पडली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कोर्ट मॅरेज झाल्यामुळे ती आतापर्यंत निर्धास्त होती. कायद्याने धीरजचे दुसरे लग्न वैध नव्हते, तरी समाजाच्या नजरेत मात्र दुसरीच मुलगी त्याची पत्नी बनून घरात आली होती.
धीरज प्रचंड मानसिक तणावाखाली होता. एका बाजूला त्याचे समीरावरचे प्रेम आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाचा दबाव. त्याला त्या नव्या मुलीबद्दलही अपराधीपणा वाटत होता. तिची काहीच चूक नसताना तिच्या आयुष्याशी खेळले गेले होते.
गोव्यात परतल्यानंतर धीरजने समीराची भेट घेतली. तिला सर्व प्रकारचा आधार देण्याचे आश्वासन देत त्याने तिच्यासाठी स्वतंत्र फ्लॅटची व्यवस्था केली. त्यानंतर त्याच्या दुहेरी आयुष्याला सुरुवात झाली.
दिवसाचा बराच वेळ तो समीरासोबत घालवत असे, तर रात्री उशिरा दुसऱ्या पत्नीच्या घरी परतत असे. या विचित्र परिस्थितीत दिवस पुढे सरकत राहिले.
काही काळानंतर नियतीने आणखी एक विचित्र वळण घेतले. दोघीही जवळजवळ एकाच काळात गरोदर राहिल्या आणि योगायोगाने दोघींनाही मुलगे झाले.
समीराच्या मनात मात्र सतत भीती होती. कुणीतरी तिचा मुलगा तिच्यापासून हिरावून नेईल, अशी भीती तिला सतावत होती. त्यामुळे मुलगा सहा वर्षांचा होईपर्यंत तिने त्याला शाळेतही पाठवले नाही. तिची आई तिच्यासोबत राहत होती आणि दोघी मिळून मुलाचे संगोपन करत होत्या.
आज तो मुलगा सहावीत शिकत आहे.
पण आजही काही प्रश्न अनुत्तरितच आहेत.
आई-वडिलांनी केलेले हे कृत्य योग्य होते का?
धीरजने सत्य लपवून ठेवणे योग्य होते का?
समीराचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना त्याचा अधिकार कोणी दिला?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्या दुसऱ्या निरपराध मुलीचा काय दोष होता?
कायद्याच्या पुस्तकात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात; पण काही प्रश्नांची उत्तरे माणसाच्या विवेकबुद्धीतच दडलेली असतात.
आजही आपल्या समाजात अशा अनेक घटना घडतात. कायदा एकाच विवाहाला मान्यता देतो, पण प्रत्यक्षात अनेक जण दुहेरी आयुष्य जगताना दिसतात. काही जण तर दोन्ही पत्नींसोबत सोशल मीडियावर रील्स बनवून प्रसिद्धी आणि पैसा कमावताना दिसतात.
मात्र प्रश्न अजूनही तसाच उभा आहे.
कायद्यापेक्षा मोठे काय आहे?
समाज?
कुटुंब?
की माणुसकी?
याचे उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारावे.

सौ. गौरी रोशन वेर्लेकर