उभारी

प्रत्येक वर्षी संक्रांत कोसळते किंवा करी दिनाचा त्रास होतो असे नाही. आजपर्यंत आम्हाला कसलाही त्रास नव्हता किंवा कसलाही अनुभव नव्हता, किंवा या गोष्टीही माहीत नव्हत्या. पण ही एक म्हण ऐकलेली होती. कधीतरी हा दिवस असाही येऊ शकतो, त्यातूनच वाट काढून पुढे जायचे असते, रडत-खडत बसायचे नसते.

Story: आठवणींचे पंचामृत |
4 hours ago
उभारी

इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्ष जानेवारीत सुरू होते व या महिन्यातील पहिला सण-उत्सव तो म्हणजे संक्रांत. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत ते रथसप्तमीपर्यंत या सणाचा कालावधी असतो. दरवर्षी हा सण १४ जानेवारीला येतो आणि कधीतरी १५ जानेवारीला येतो. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू झाले की, संक्रांत सुरू होते. दिवस मोठा व रात्र लहान असा बदल दिसून येतो. "तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचा तिळगुळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका," असा एकमेकांतील स्नेह वाढवणारा, दानधर्म करायला लावणारा, तसेच थंडीचे दिवस असल्याने शरीरात उष्णता वाढवण्यासाठी तीळ आणि गूळ खाणे, शिवाय तिळातील नाजूकपणा आणि गुळाचा गोडवा असे नातेसंबंध जपणे, अशा अनेक गोष्टींचा संदेश देणारा हा सण. असे असले तरी त्याच्याबरोबर कधीतरी एक म्हण ऐकलेली होती, ‘संक्रांत कोसळली’ शाळेत त्याचा अर्थ लिहिला, वाक्यात उपयोग केला. आणि प्रत्यक्ष संक्रांत कोसळणे म्हणजे काय, हे मला आज समजले होते. माझ्या कुटुंबावर, सासर आणि माहेर या दोन्ही कुटुंबांवर एक प्रकारची संक्रांत कोसळली होती. संक्रांत कोसळली याचा अर्थ ती दरवर्षी कोसळते असेही नाही. कधीतरी सुखाबरोबर दुःखालाही सामोरे जावे लागते, पण या म्हणीचा पुरेपूर अनुभव मला असा आला होता. 'सुलोचना'... सु-लोचन म्हणजे सुंदर डोळे असणारी ती आणि खरोखरच सुलोचना तशीच होती. तिचे फक्त सुंदर डोळे नव्हते, दृष्टीच सुंदर नव्हती, तर दूरदृष्टी असणारे ते डोळे होते. आपल्या सुंदर संसारात दूरदृष्टीने पाहत होती आणि तो संसार ती करत होती. संपूर्ण संसारातील चढ-उतारांना योग्य पद्धतीने तोंड देऊनच आपला संसार फुलवत होती. असा हा फुललेला संसार... मुलेही आता मोठी झाली होती, आपापल्या संसारात गुंतली होती. तीही नातवंडांचे कोडकौतुक करत होती आणि ती आपल्या वडिलोपार्जित घरात राहून संसारात कष्ट करून आनंदाने राहत होती. आता ती जवळजवळ ७० च्या आसपास होती, मात्र कामातील दम तोच होता.

भोगी आणि संक्रांत सण साजरे केल्यानंतर करिदिन म्हणजेच आराम करायचा दिवस. असे म्हणून त्या सणाची कर मानून त्या दिवशी सहजासहजी बाहेर न जाणे, कोणतीही कामे न करणे, असे सांगितले गेलेला तो दिवस. किंक्रांतीच्या दिवशी ती डोंगरात जायला बाहेर पडली. शेजारील सूनबाईच्या मनात आले, "ही आज किंक्रांतीची कशाला डोंगरात जाते?" पण तिचाही शब्द तोंडातल्या तोंडात राहिला, कारण वेळच तशी आली होती. डोंगरात सुकी लाकडे आणायला गेली खरी आणि गेल्या गेल्या जे सुके लाकूड तिने दोन्ही हातांनी तोडले, ते तोडताना जो हात सटकला, तो लाकूड थेट डोळ्यात गेले. नेमके सांगायचे तर काय झाले, हे तिला कळलेच नाही. डोळ्यातून पाणी वाहू लागले, पाणी चालूच राहिले. काय झाले कोण जाणे, पण ती तशीच घरी आली. झालेला प्रकार बाबांना सांगितला आणि नेहमीप्रमाणे ती तटस्थ होती. फोनाफोन झाले आणि ती सरळ आपल्या मुलाकडे, डॉक्टरकडे येण्यास निघाली. तोपर्यंत डोळ्यातून भरपूर पाणी गेले होते. तातडीने ऑपरेशनही झाले, हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती, ट्रीटमेंट चालू होती. पण डोळ्याला दुसऱ्या दिवशी थोडेफार दिसत होते, पुढच्या दोन दिवसांत आता दिसणे बंद झाले होते. आईला डोळ्याने दिसणार नाही, हे कोणीही मान्य करायला तयार नव्हते. मुलाने तातडीने चेन्नईला डॉक्टरकडे नेले. चेन्नईला जाताना विमानात बसताना, आई घाबरून काय होईल, ही भीती मुलीला होती. पण ती तो प्रवास करून पुन्हा आली. तिथे समजले की, डोळ्यात फंगल इन्फेक्शन (Fungal Infection) आहे व ते वाढलेले आहे. दिसणे मुश्किल, त्यामुळे तो डोळा गेलेला आहे. त्या डोळ्याने तिला आता दिसणार नाही, हे निदान झाले.

आईच्या नजरेस नजर भिडवून बोलण्याची खूप भीती वाटत होती. आईच्या चेहऱ्याकडे न बघता आईशी बोलणे होत होते, कारण तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तिचा डोळा नाही, हे भासणार होते. त्यामुळे बहुतेक वेळा आईकडे न बघताच बोलले जात होते. या वयात नजर हळूहळू कमी होते, असे असताना एक डोळाही गेला, या गोष्टीचा सर्वांना खूप त्रास होत होता. मात्र ती माऊली दुःखी नव्हती, ती रडली नाही. तोंडावर दुःखाचे सावट नव्हते किंवा बोलण्यातही दुःख जाणवत नव्हते. त्या सर्व उपचाराच्या कालावधीत आईचा डोळा गेला, आता एका डोळ्यावर पुढचे आयुष्य काढायचे आणि त्या डोळ्याला खूप जपायचे, काळजी घ्यायची, हे आईला सांगत असताना आई म्हणाली, "हो! काय नाही हरकत. अगं, माझ्या पोराने संपूर्ण आयुष्य एका डोळ्यावर काढले. (मामाच्या डोळ्यात लहानपणी मावशीच्या केसातला आकडा पडून त्याचा एक डोळा गेला होता) मला तर उरलेले काहीच आयुष्य एका डोळ्यावर काढायचे आहे." हे ऐकून आमचे तोंड उघडेच पडले. आमच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू बाहेर पडले. केवढी मोठी दूरदृष्टी तिच्याकडे होती पहा! जगण्याची उभारी, हिंमत तिने तिच्या भावाकडून घेतली होती.

हा विचारही आम्ही करू शकत नव्हतो. खरंच, तिच्या या बोलण्यावरून मंगेश पाडगावकरांच्या त्या ओळी आठवल्या, "सांगा कसे जगायचे, रडत रडत की गाणे म्हणत."

जराही दुःख न करता दिलेले आयुष्य जसे असेल तसे आनंदात कसे जगायचे, हा मंत्र तिने आम्हाला आयुष्यभर दिला होता, तो नकळत इथेही दिला होता. त्यावर्षी संक्रांत १५ जानेवारीला आलेली. किंक्रांतीला आईचे हे असे झाले, तर दुसऱ्या दिवशी १७ जानेवारीला जाऊबाई बाळंत झाली. दुसरा मुलगा झाला आणि तिने पिशवीचे ऑपरेशनही केलेले. त्याच्यानंतर डॉक्टरने असे लक्षात आणून दिले की, बाळ बरे नाहीये, त्याची ट्रीटमेंट मोठ्या हॉस्पिटलमध्ये करायला हवी. आई व बाळ या दोघांची ट्रीटमेंट एकाच हॉस्पिटलमध्ये चालू होती. महिन्याभरात बाळ गेले, आईने हंबरडा फोडला आणि दुधाचा पान्हा शरीरावरून जमिनीवर वाहू लागला. आईचे दुःख आईच जाणू शकते. ही घरात यावर्षी कोसळलेली संक्रांत... व माहेरी आईचा डोळा. आमच्या घरी सण साजरा झाला नाही. नंतर पुढच्या वर्षी संक्रांत येण्यापूर्वी, नेमके संक्रांत म्हणजे काय हे पाहायला गेली, तर संक्रांती देवीने संक्रासुराचा वध केल्यावर किंक्रांत नावाच्या मायावी राक्षसाने थैमान घातले व देवीने त्याचाही वध केला. असे हे राक्षस मारले गेले, नंतर ते थोडेच गप्प राहणार होते? तर त्यांचा तो दुसरा दिवस म्हणजे 'कर'. हा दिवस संघर्षाचा, संहाराचा असल्याने अशुभ मानला जातो.

करी दिन कष्टाचा दिन म्हणून त्या दिवशी काही काम केले जात नाही, असेही लक्षात आले की, आपल्या पूर्वजांनी जे काही सांगून ठेवले आहे, ते संपूर्ण धर्मशास्त्र, संस्कृतीला अनुसरून सांगितलेले आहे, फक्त ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

प्रत्येक वर्षी संक्रांत कोसळते किंवा करी दिनाचा त्रास होतो असे नाही. आजपर्यंत आम्हाला कसलाही त्रास नव्हता किंवा कसलाही अनुभव नव्हता, किंवा या गोष्टीही माहीत नव्हत्या. पण ही एक म्हण ऐकलेली होती. कधीतरी हा दिवस असाही येऊ शकतो, त्यातूनच वाट काढून पुढे जायचे असते, रडत-खडत बसायचे नसते. हे शिकवणारी माझी आई, येणाऱ्या वर्षी तितक्याच उत्साहाने संक्रांत साजरी करून, "तिळगुळ घ्या, गोड गोड बोला," अशी म्हणणारी माझी माऊली आम्हाला सतत जगताना बळ देते.


संतोषी शामसुंदर महाले, पर्वरी (९४२०५९४८५९)