अनुभव हा माणसाचा सर्वात मोठा शिक्षक असतो. काही अनुभव आनंद देतात, तर काही अनुभव आयुष्यभर लक्षात राहतील असे धडे देऊन जातात.

रविवार हा आठवड्यातील असा दिवस असतो ज्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. संपूर्ण आठवडा काम, शिक्षण, व्यवसाय आणि जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असलेले लोक या दिवशी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आनंद मिळावा, थोडा आराम मिळावा आणि एकमेकांसोबत काही सुंदर क्षण घालवता यावेत म्हणून अनेक जण फिरायला जाण्याचे नियोजन करतात.
असाच एक रविवार होता. एका कुटुंबाने समुद्रकिनारी जाऊन संध्याकाळचा सुंदर सूर्यास्त पाहण्याचे आणि कुटुंबासोबत काही आनंदाचे क्षण घालवण्याचे ठरवले. सकाळपासूनच सर्वजण उत्साहात होते. घरातील कामे लवकर आटोपून प्रत्येक जण फिरायला जाण्याची तयारी करत होते. वातावरणही सुंदर होते. मनात आनंद, चेहऱ्यावर उत्साह आणि दिवस संस्मरणीय होईल अशी आशा घेऊन ते कुटुंब घराबाहेर पडले. सुरुवातीला त्यांनी 'कोलवा' समुद्रकिनारी जाण्याचे ठरवले होते. 'कोलवा' हा गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असल्यामुळे तेथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. त्या दिवशीही तेथे खूप गर्दी होती. वाहनांची मोठी गर्दी होती. गर्दीमुळे समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेता येणार नाही असे वाटल्याने त्यांनी दुसऱ्या शांत समुद्रकिनाऱ्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. सूर्यास्ताचा आनंद शांत वातावरणात घ्यावा हा त्यामागचा उद्देश होता. त्यामुळे त्यांनी 'सनसेट' बीचकडे जाण्याचे ठरवले. त्या ठिकाणी जाणारा रस्ता थोडा अरुंद होता पण दोन गाड्या सहज जाऊ शकतील इतकी जागा होती. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चालू होते. मात्र काही अंतर गेल्यानंतर अचानक वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. समोर आणि मागे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही वेळ सर्वजण संयमाने थांबले. थोड्याच वेळात रस्ता मोकळा होईल अशी आशा होती.
परंतु परिस्थिती अपेक्षेपेक्षा वेगळी निघाली. तेवढ्यात एक व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत समुद्रकिनाऱ्यावरून परतत होती. त्या व्यक्तीने दारूचे सेवन केले होते आणि तो नशेत गाडी चालवत होता. त्याला गाडी मागे घेण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती. सामान्य परिस्थितीत तो सहज मागे जाऊ शकला असता आणि वाहतूक सुरळीत झाली असती. परंतु नशेच्या प्रभावामुळे त्याने परिस्थिती समजून घेण्याऐवजी हट्टीपणा करण्यास सुरुवात केली. त्याने अचानक आपली गाडी वेगाने समोर आणून उभी केली. त्यामुळे समोरच्या कुटुंबाची गाडी पूर्णपणे अडकली. त्या कुटुंबाला मागे जाण्यासाठी जागा नव्हती. रस्ता अरुंद असल्यामुळे त्यांची परिस्थिती अधिकच कठीण झाली. चूक स्वतःची असतानाही त्या व्यक्तीने उलट समोरच्या लोकांवर ओरडणे सुरू केले. तो शिवीगाळ करू लागला, आक्रमकपणे बोलू लागला आणि विनाकारण वाद घालू लागला. अशा परिस्थितीत कोणाच्याही संयमाचा बांध फुटू शकतो. अनेकदा लोक रागाच्या भरात भांडण करतात, परिस्थिती अधिक चिघळते आणि त्याचे गंभीर परिणाम होतात. पण त्या कुटुंबाने शांतता राखली. त्यांनी कोणत्याही प्रकारचा वाद वाढू दिला नाही. परिस्थिती समजून घेत संयमाने वागण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर त्यांनी शक्य तितक्या काळजीपूर्वक गाडी बाजूला घेतली आणि मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला.
या प्रसंगाने एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. आजच्या समाजात अनेक प्रकारची माणसे आढळतात. काही लोक चूक झाल्यास ती स्वीकारतात, माफी मागतात आणि परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही लोक स्वतःची चूक असतानाही इतरांवर दोष टाकतात. अहंकार, राग आणि असंयम यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. दारू पिऊन वाहन चालवणे ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. अशा प्रकारे वाहन चालवणारी व्यक्ती केवळ स्वतःचा जीव धोक्यात घालत नाही तर इतरांच्याही जीवाशी खेळत असते. त्या दिवशी ही अशाच एका निष्काळजी वर्तनामुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागला.
या घटनेनंतर त्या कुटुंबाचा उत्साह बराच कमी झाला होता. ज्या आनंदासाठी ते घराबाहेर पडले होते, तो आनंद कुठेतरी हरवला होता. तरीही त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. कदाचित समुद्रकिनाऱ्यावर पोहोचल्यानंतर वातावरण बदलून जाईल असे त्यांना वाटत
होते.
परंतु नियतीने त्यांच्या वाट्याला अजून एक वेगळाच अनुभव ठेवला होता. समुद्रकिनाऱ्याजवळ एका वृद्ध आजीचे शेत होते. त्या ठिकाणी वाहन उभी करण्यासाठी जागा उपलब्ध होती. अनेक पर्यटक तेथे गाड्या पार्क करत होते. त्या आजींनी त्या जागेचा वापर पार्किंगसाठी सुरू केला होता. दरम्यान, त्या कुटुंबाने समुद्रकिनारी न जाता दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना फक्त गाडीला यू-टर्न घ्यायचा होता. त्यामुळे काही क्षणांसाठी त्यांनी गाडी बाजूला घेतली. परंतु त्या आजी ने लगेच वाद घालायला सुरुवात केली. त्या रागावल्या, ओरडू लागल्या आणि गाडीला वळण्यासाठीही जागा देण्यास तयार नव्हत्या. त्या कुटुंबाने शांतपणे परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केवळ गाडी वळवण्यासाठी काही क्षण जागा हवी असल्याचे सांगितले. पण आजी कोणतेही स्पष्टीकरण ऐकण्यास तयार नव्हत्या. तेथे उपस्थित काही तरुणांनी ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शांततेने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. पण आजी आपल्या भूमिकेवर ठाम होत्या. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी सर्वांच्या प्रयत्नांनंतर थोडी जागा मिळाली आणि ते कुटुंब त्या ठिकाणाहून बाहेर पडू शकले. त्यावेळी त्यांच्या मनात निराशा, दुःख आणि आश्चर्य अशा अनेक भावना होत्या. एक साधा आणि आनंदी रविवार इतक्या अनपेक्षित घटनांनी भरून जाईल असे त्यांनी कधीच कल्पनाही केली नव्हती.
मात्र प्रत्येक अनुभव माणसाला काहीतरी शिकवून जातो. या प्रसंगातून अनेक महत्त्वाचे धडे मिळाले.
सर्वप्रथम, कोणतीही परिस्थिती कितीही कठीण असली तरी संयम सोडू नये. रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. दुसरे म्हणजे, दारू पिऊन वाहन चालवणे ही केवळ कायद्या विरुद्धची गोष्ट नाही तर समाजासाठीही मोठा धोका आहे. तिसरे म्हणजे, पैशापेक्षा माणुसकी अधिक महत्त्वाची असते. थोडी समजूतदारपणा, थोडा आदर आणि थोडे सहकार्य अनेक समस्या सहज सोडवू शकतात. आजच्या काळात माणूस तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत झाला आहे. पण अनेक ठिकाणी माणुसकी कमी होताना दिसते. दुसऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याची भावना कमी होत चालली आहे. परंतु अशा अनुभवांमुळे आपण स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो.
त्या कुटुंबाचा रविवार अपेक्षेप्रमाणे गेला नाही. त्यांना समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेता आला नाही. सूर्यास्ताचा आनंदही मनमोकळेपणाने अनुभवता आला नाही. मात्र त्या दिवसाने त्यांना आयुष्यभर लक्षात राहतील असे काही मौल्यवान धडे दिले.
शेवटी एक गोष्ट निश्चित आहे. जीवनात प्रत्येक दिवस आपल्या मनाप्रमाणे घडेलच असे नाही. काही दिवस आनंद देतात, तर काही दिवस अनुभव देतात आणि अनेकदा अनुभव हे आनंदापेक्षाही अधिक मौल्यवान असतात. कारण तेच आपल्याला अधिक समजूतदार, संयमी आणि मजबूत बनवतात. म्हणूनच या प्रसंगाकडे केवळ एका वाईट दिवसाच्या नजरेने न पाहता, आयुष्याने दिलेला एक महत्त्वाचा धडा म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल.

वर्धा हरमलकर