आजच्या 'हम दो, हमारा एक' च्या जमान्यात भूतकाळात जमा झालेली एकत्र कुटुंब पद्धती अनुभवणाऱ्या लेखिकेने, आपल्या मडगावच्या आठवणींतील 'माणूसवेड्या' आजोळचे आणि तिथल्या अकृत्रिम प्रेमाचे रेखाटलेले हे एक सुंदर, भावुक चित्र.

गोव्यात, पणजीमध्ये एक मोठे घर आहे. बऱ्याचदा त्याविषयी वर्तमानपत्रात, फेसबुक वगैरेवर अनेक लेख येतात. असे म्हणतात की, आजसुद्धा त्या घरात जवळजवळ पन्नास ते साठ माणसे आणि तीसुद्धा एकाच परिवारातील गेल्या अनेक पिढ्या गुण्यागोविंदाने राहत आहेत. आजकालच्या ‘हम दो, हमारा एक’ च्या जमान्यात जरा अजबच ना? एकत्र कुटुंब पद्धती हा प्रकार इतिहासजमा झाला आता. इच्छा असूनही असे नांदते घर आजच्या पिढीला अनुभवायला मिळत नाही आणि कदाचित मिळणारही नाही यापुढे. पण या बाबतीत मात्र मी नशीबवान! एकत्र, एकाच घरात राहिलेला एक जबरदस्त आणि मस्त परिवार मी पाहिला आहे; आणि नुसता पाहिलाच नाही, तर त्या परिवाराचा, त्या घराचा एक भागसुद्धा बनून राहिले मी, अगदी हक्काने. आणि ते म्हणजे माझे आजोळ.
मठग्रामात (मडगाव), अगदी मध्यवर्ती भागात ‘मालभाट’ म्हणतात त्याला. चर्चसमोर एक प्रचंड मोठे घर होते, ते माझे आजोळ. 'होते' म्हणजे आता नाही ते घर, कारण आता त्या ठिकाणी एक उंच बिल्डिंग उभी आहे. असो!
माझे आजोळ हे त्या काळच्या एकत्र कुटुंब पद्धतीचे एक जितेजागते उदाहरणच म्हणा ना! माझे आजोबा आणि त्यांचे पाच भाऊ असे सहा जण. त्यापैकी पाच भाऊ आपल्या परिवारासोबत त्या घरात राहत. अगदी पसरलेले घर. समोर अंगण, मागे छोटेसे परसदार, एका बाजूला लहानसा गोठा; अगदी शहरात राहूनही गावचा 'फील' देणारे असे वातावरण. माझे पाच आजोबा आणि चार आज्या. आता आजच्या पिढीला हे एवढे मोठे समीकरण कळणार नाही म्हणा, त्यासाठीच तर हा प्रपंच! तर माझे आजोबा हे थोरले. 'बाबा' म्हणत त्यांना. माझ्या सख्ख्या आजीला मी कधीच पाहिले नाही, कारण माझी आई लहान असताना ती देवाघरी गेली. पण खरे सांगू, सख्ख्या आजीची उणीव मला कधीच भासली नाही या घरात आणि कोणी जाणवूही दिली नाही. माझ्या आईचा आणि तिच्या सख्ख्या भावंडांचा सांभाळ तिच्या काकीने, म्हणजे माझ्या 'माई आजीने' केला, अगदी सख्ख्या आईसारखा. अर्थात, इतर आज्यांचाही सहभाग होता त्यात. जशी माझी आई घरात थोरली, तशीच नात म्हणून, भाची म्हणून मी घरात थोरली. भरपूर लाड होत असत माझे.
एवढे मोठे घर, त्यात पाच कुटुंबे आणि पूर्वीच्या पद्धतीनुसार प्रत्येकाची पाच ते सहा मुले, म्हणजे माझे मामा आणि मावश्या मिळून सहज पंचवीसचा आकडा जातो. आता एवढ्या संख्येने मामा-मावश्या, मग विचार करा किती लाड होत असतील पहिल्या भाचीचे? एवढी माणसे रोजची घरात, शिवाय पाहुणे वेगळे प्रत्येकाचे. एक मात्र, कोणीही येऊ देत, तो आपल्याकडे आला आहे ही भावना मोठी. परकेपणा हा प्रकारच नाही, तुझं-माझं नाही. अगदी दिलखुलास स्वागत होई पाहुण्यांचे.
माझ्या मोठ्या दोन आजोबांचे हॉटेल होते मडगावात. 'होते' म्हणजे अजूनही आहे, सध्या माझा मामा बघतो ते. रोज सकाळी घरच्या हॉटेलातून गरमागरम पावभाजी, मिरची नाश्ता म्हणून घरी येई. पंगतच बसे सर्वांची, मजा येई. घर मोठे जरी असले तरी माणसेही भरपूर, त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला तशी लहानच जागा यायची. सुट्टीच्या दिवसांत घर गच्च भरायचे अगदी. पण एक सांगू, त्या खोल्या जरी लहान असल्या, अडचणीच्या असल्या, तरी त्यात ठासून भरला होता जिव्हाळा, ओतप्रोत भरलेले प्रेम आणि आपलेपणा, जे आज मोठमोठ्या बंगल्यांत अजिबात मिळणार नाही. हे एक असे घर होते, ज्याने 'कुलूप' हा प्रकारच कधी अनुभवला नाही. अगदी माणूसवेडे होते ते घर! तशा परसदारी तीन-चार चुली दिसायच्या वेगवेगळ्या, पण त्या तेवढ्यापुरत्याच. 'हा माझा आणि तो तुझा' हे माहितीच नव्हते हो कुणाला!
माझ्या मावश्या आणि मामा, अगदी वर सांगितल्याप्रमाणे प्रेमळ आणि हौशी. माझ्या लहानपणी कोण मोठे होऊन नोकऱ्या करणारे, कोण कॉलेज तर कोण शाळेत असे होते. तशी पैशांची वानवा नसायची. सुट्टीत मी गेले की मग मावश्यांबरोबर सिनेमा बघायला हटकून जायचो. 'विशांत' थिएटर बाजूलाच, त्यामुळे पिक्चरला प्रायोरिटी जास्त. आयुष्यात पहिला चित्रपट मी पाहिला तो 'शोले' तिथेच. "अमिताभ मेला कसा? तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये का नेले नाही?" म्हणून मी माझ्या सुलू मावशीकडे खूप भांडले, रडले. शेवटी आईस कॅन्डीवर तोडपाणी झाली. तुम्हाला सांगू, खेड्यात वाढलेली मी, हो त्यात लहान! पिक्चर, थिएटर त्याकाळी तसे कौतुकच. शिवाय विशांतच्या बाहेर एक आईस्क्रीमचा कारखाना होता, 'मिल्क कॅन्डी' फेमस होती त्याची. मी पिक्चरला जायचे तेव्हा इंटरव्हलची वाट बघायचे जास्त. कारण कधी इंटरव्हल होतो आणि कधी मामा आईस कॅन्डी आणतो असे व्हायचे. पिक्चर सुरू व्हायच्या आधीच इंटरव्हलचा विचार करणारी बहुदा मी पहिली आणि शेवटचीच असावी, निदान मडगावात तरी! कधी रविवारी मावशीबरोबर 'कोलवा बीच' ठरलेले असे, तेसुद्धा अगदी स्पेशल टॅक्सीतून. वाटेत मिलन कामत कडे साधारण माझ्या हातभर लांबीचा मसाला डोसा ठरलेला. एक तास लागायचा मला तो संपवायला. हॉटेलवाला कंटाळायचा पण मावशी नाही. खरंच, अगदी अकृत्रिम प्रेम हो!
नातीगोती वाढण्यात आणि वाढविण्यात माणसांबरोबर ती ज्या वास्तूत राहतात, तिचाही थेट संबंध असतो असे मला नेहमीच वाटते. अशी कितीतरी घरे मी पाहिली आहेत, जी माणसाच्या वावरण्याला, आवाजाला आसुसलेली आहेत; वाट बघत आहेत कोणीतरी येईल याची वर्षानुवर्षे. असो!
सुट्टीत तिथे जाणारी मी कशी मिसळून जायची ना त्या घरात, ते कळतच नव्हते. एक भागच बनायची मी त्या घराची. ते माई आजीचे प्रेम, ताई आजीचे रुचकर हुमण, काकी आजीने प्रेमाने दिलेले घरचे दूध, अनि आजीचा मोगऱ्याचा गजरा... सगळे सगळे आठवतेय मला. आज ते घर नाही, ते अर्थात काळानुसार थकले हो, पण नवीन रूप मिळाले त्याला. पण आता ती विहीरही नाही आणि ते अंगण, परसदारही नाही. पण त्या वास्तूने तिच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला जे माणसांचे, नात्यांचे वेड लावले ना, ते अजूनही आहे. आजही अगदी वेळ काढून सगळे एकत्र जमतात, धम्माल करतात, गोकुळ भरते अगदी. ओघाने जुन्या घराच्या आठवणी येतात आणि मग कुठूनतरी खुदकन हसण्याचा भास होतो; जणू ती वास्तूही आपल्यात सामील झाली आहे...

- सौ. रेशम जयंत झारापकर
मडगाव,गोवा