Home >> ती >> फूल

फूल

मोठी झाल्यावर मागे वळून बघितले, तेव्हा कळले की जी फुले वेचत होती ती फुलेच नाहीशी झाली. फुलांसारखी आजी कोमेजून नाहीशी झाली. ती फुले विकणारी ताजी टवटवीत नाजूक फुलेही हरवली.

Story: ललित |
24th July, 10:17 pm
फूल

ल​हानपणीची एक आठवण, फूल हे फक्त सुगंधाने भरलेले एक नाजूक पुष्प नव्हे तर ती एक आठवण आणि आठवणीने भरलेली भावना. फूल म्हंटले की वेगवेगळ्या रंगांची आणि वासाची फुले डोळ्यासमोर येतात. फूल म्हटले की सर्वांना आवडतात, कोणाला प्रेमाच्या सुगंधमय आठवणी आठवतात तर कोणाला त्या आठवणीतला प्रियकर. कोणी म्हणतो प्रेयसी ही फुलांसारखी सौंदर्याने भरलेली आहे. पण तरीही मी म्हणेन, माझ्यासाठी भुईचाफा हे सर्वात आवडते फूल. ह्याची फुले जरी वर्षातून फक्त एकदाच फुलतात, पण त्यांचा सुगंध कस्तुरीपेक्षाही जास्त मोहक, सुगंधमय आणि मनाला भावणारा असतो. असे भुईचाफ्याचे पांढरेशुभ्र आणि सौंदर्य वाढवण्यासाठी त्यावर असलेला हलकासा जांभळा रंग, जो फुलांची सुंदरता वाढवतो. ही सुंदर, नाजूक फुले सकाळी ताजी टवटवीत खिलतात आणि संध्याकाळी कोमेजून जातात; पण सुगंध वर्षभर मनातील एका कोपऱ्यात दरवळत असतो.

पण माझ्या लहानपणी मी गावातील मुलांबरोबर शाळेत जात असे. वाटेत जात असताना जंगलातून जावं लागायचं आणि वाटेत बकुळाची फुले मोत्यासारखी पडलेली असायची. त्यांचा तो सुगंध मनाला ताजा करणारा आणि त्यात आपण लहानशी ताजी टवटवीत फुलं! त्या फुलांना बघून खूप आनंद व्हायचा. आणि आम्ही सकाळी मुले ती फुले गोळा करायचो. काही फुले खिशात भरायची, तर काही फुले शाळेच्या युनिफॉर्मच्या स्कर्टमध्ये भरून शाळेत आणायची.

शाळेत केळीच्या झाडांची ४-५ रोपटी आणि त्या रोपट्यांच्या बाजूला असलेली २ ते ३ केळीची मोठी झाडे. त्या केळीच्या झाडांचे दोरे काढायचे आणि बकुळीच्या फुलांची माळ करून शाळेतील सरस्वतीच्या फोटोला चढवायची; राहिलेली सर्वजण माडाच्या चुट्टीचे दोर करून त्यावर फुले गुंतून माळायची. दररोज घरातून लवकर शाळेला निघायचे, कारण फुले गोळा करायची होती. शाळेभोवती उंच असे कुंपण होते आणि त्या कुंपणाच्या आत शाळा आणि शाळेभोवती असलेली रंगीबेरंगी जास्वंदीची फुले, गुलाब, जाई, जुई.

तसेच आईबरोबर गावात झरीवर जात असताना झरीच्या बाजूला एक मोठे बकुळीचे झाड होते. मी ती फुले गोळा करायची व एका पानात टाकून तिच्या पदरात ठेवायची. घरी येऊन सुगंधमय फुले गुंतून देवाला चढवायची. सुट्टीच्या दिवसातही शेजारच्या मुलांबरोबर पहाटे उठून सकाळी बॅटरीचा दिवा घेऊन जायचे.

लहानपणी फक्त बकुळाची फुलेच नव्हे, तर जाई, मोगरी, जुई, अबोली, सोनचाफा, शेवंती, कुंदा, कस्तुरी मोगरी, झेंडू, पात, कण्हेरी, काण्णा, पिटकोळी अशी अनेक फुले घरातील बागेत फुलायची व ती फुले मी आणि माझी बहीण त्यांच्या वेण्या करून विकायचो. ही फुले फक्त फुले नव्हे, तर ती आमच्या जगण्यातील एक छोटासा भाग होती. फुले विकून घरातील जेवणाची व्यवस्था व्हायची, त्यामुळे ही फुले फक्त फुले नव्हे तर लहानपणाच्या आठवणी आहेत. ते पैसे जमवून ठेवायचो आणि चतुर्थीला कपडे आणि सर्वांना बांगड्या आणायचो.

आजी दररोज फुले काढून ठेवायची आणि आई व काकी ती फुले गुंतायची. अशी अनेक वर्षे, म्हणजेच अगदी वर्षाच्या १२-१३ व्या वर्षापर्यंत, म्हणजे ७ वीत असताना सुद्धा फुले विकली. त्यामुळे फुलांच्या आणि माझ्या वेगळ्याच आठवणी आहेत. फूल ही फक्त फुलेच नव्हे तर तो परिश्रम, ती मेहनत आहे. ही फक्त माझी नसून माझ्यासारख्या अनेक लोकांची आहे. हे पोटासाठी केलेले कष्ट आहेत. दुःखाचे घोट पिऊनही जीवन जगण्याची धडपड आहे.

"नारायण सुर्वे" त्यांच्या कवितेत म्हणतात:

 “शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले, रात्र धुंद झाली  भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली”

 पण आमच्या आयुष्यात शेकडो फुले फुलली, रात्रंदिवस फुले विकली, पण फुलातील मध शोधण्यातच अर्धे आयुष्य संपले. पण तरीही टवटवीत भाजीसुद्धा फुलेच समजून विकली. शेतात रक्ताचा घाम करून रुजले आणि त्यातून भाजी, फुले, मिरच्या उगवण्यातच लहानपण संपले.

मोठी झाल्यावर मागे वळून बघितले, तेव्हा कळले की जी फुले वेचत होती ती फुलेच नाहीशी झाली. फुलांसारखी आजी कोमेजून नाहीशी झाली. ती फुले विकणारी ताजी टवटवीत नाजूक फुलेही हरवली. फुलांनी भरलेली झाडेही फुलांचे ओझे सांभाळू न शकल्याने कोसळून खाली पडली; यातच फुले संपून गेली. फुलांची माया प्रेमातून संपली आणि आजकालची मुले 'फूल' म्हंटले की प्रेम, प्रियकर आणि गुलाबाचे फूल यातच अडकून पडली.

- सिया गावडे

गोवा विद्यापीठ, ९६३७२८४७०१