Home >> ती >> मुखवटा की ओळख?

मुखवटा की ओळख?

मानसिक आरोग्याचा प्रवास हा नवीन व्यक्ती बनण्याचा नसतो. तो एक-एक मुखवटा अलगद बाजूला ठेवत, स्वतःकडे परत येण्याचा असतो. लोकांनी आपल्याला ओळखणं महत्त्वाचं आहेच पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, सर्व मुखवटे काढल्यानंतर उरलेल्या स्वतःला आपण ओळखतो का?

Story: मनी मानसी |
24th July, 09:53 pm
मुखवटा की ओळख?

“तू अगदी शांत स्वभावाची आहेस.”

“तो खूप कडक आहे.”

“ती कायम आनंदी असते.”

आपण अनेकदा लोकांबद्दल अशी ठाम मतं बनवतो. पण खरंच एखादी व्यक्ती एवढीच असते का?

कल्पना करा. ऑफिसमध्ये अतिशय शिस्तप्रिय आणि कठोर वाटणारा अधिकारी घरी आल्यावर नातवाबरोबर जमिनीवर बसून खेळत असतो. सोशल मीडियावर सतत हसतमुख दिसणारी व्यक्ती रात्री एकटेपणाशी झुंज देत असते. मित्रांसमोर मनमोकळा बोलणारा मुलगा, घरात मात्र एक शब्दही बोलत नाही.

मग यापैकी खरं कोण?

कार्ल युंग यांनी या प्रश्नाचं उत्तर Persona या संकल्पनेतून दिलं. Persona म्हणजे आपण समाजासमोर घालणारा एक मुखवटा. हा खोटेपणाचा मुखवटा नाही, तर प्रत्येक परिस्थितीनुसार आपण स्वीकारलेली सामाजिक भूमिका आहे. शिक्षक वर्गात जसे असतात, तसे ते मित्रांसोबत नसतात. डॉक्टर रुग्णांसमोर जसे वागतात, तसे ते घरी नसतात. प्रत्येक भूमिकेला काही अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःची एक विशिष्ट आवृत्ती जगासमोर मांडतो.

खरं तर आपण सगळेच थोडेफार कलाकार असतो. मुलाखतीला जाताना आपण अधिक आत्मविश्वासू दिसण्याचा प्रयत्न करतो. पाहुणे घरी आले की घरातील वातावरणही थोडं बदलतं. नवीन लोकांना भेटताना आपण शब्द जपून वापरतो. याचा अर्थ आपण खोटे आहोत, असा होत नाही. समाजात राहण्यासाठी काही भूमिका आवश्यक असतात. समाजशास्त्रज्ञ Erving Goffman यांनी यालाच The Presentation of Self असं म्हटलं आहे. आता त्यात प्रश्न भूमिका वठवण्याचा नाही, तर भूमिका संपल्यानंतर आपल्याला स्वतःचा चेहराच विसरायला होतो का ह्याचा आहे. 

समुपदेशनात अनेकदा काही जण म्हणतात, “मला आता मी नेमका कोण आहे, हेच समजत नाही. प्रत्येक व्यक्तीसमोर मी वेगळी असते.” हे वाक्य वरवर साधं वाटतं पण त्यामागे स्वतःपासून दूर जाण्याची खोल प्रक्रिया दडलेली असते.

याची सुरुवात अनेकदा बालपणात होते. आपण नकळत काही गुण आत्मसात करतो, रडायचं नाही, नेहमी हसतमुख राहायचं, लोकांना नाराज करायचं नाही, नेहमी मजबूत दिसायचं. मानसशास्त्रज्ञ Carl Rogers यांच्या मते, अशा अनुभवांतून Conditions of Worth तयार होतात. म्हणजे, माझ्यावरचं प्रेम जर मला टिकवायचं असेल, तर मला असंच वागायला हवं. मग काही जण परफेक्ट होण्याचा प्रयत्न करतात, काही सतत सगळ्यांना खूश ठेवतात, तर काही स्वतःच्या भावना दडपून मी ठीक आहे असंच सांगत राहतात.

आज सोशल मीडियामुळे ही प्रक्रिया आणखी तीव्र झाली आहे. आपण आपल्या आयुष्यातील निवडक क्षण जगासमोर मांडतो. यश दिसतं, संघर्ष नाही. हसू दिसतं, अश्रू नाहीत. त्यामुळे इतर लोक आपल्याला ओळखतात, असं वाटत असलं तरी ते अनेकदा आपल्या आयुष्याची संपादित आवृत्ती पाहत असतात.

युंग यांच्या मते, Persona जितका कठोर होत जातो, तितकाच आपल्या मनाचा दुसरा भाग, Shadow दाबला जाऊ शकतो. सतत मी ठीक आहे असं दाखवणारी व्यक्ती आतून थकलेली असू शकते. कायम मजबूत राहण्याचा प्रयत्न करणारा माणूस एक दिवस अचानक कोसळू शकतो. कारण दाबलेल्या भावना नाहीशा होत नाहीत, त्या फक्त शांतपणे योग्य वेळेची वाट पाहत राहतात.

म्हणूनच कधी कधी आपण दिवसभर लोकांमध्ये असूनही एकटे वाटतो. कारण त्यांनी आपल्याला नाकारलेलं नसत, त्यांनी आपल्याला कधी भेटलंच नसतं. त्यांनी भेटलेली असते ती आपल्या Persona ची आवृत्ती.

याचा अर्थ असा नाही की प्रत्येकासमोर मन मोकळं करावं. प्रत्येक नातं तेवढी सुरक्षित जागा देत नाही. पण आयुष्यात किमान काही माणसं तरी अशी असावीत, ज्यांच्यासमोर आपल्याला सतत भूमिका वठवावी लागत नाही. जिथे मी ठीक आहे म्हणण्याची सक्ती नसते. जिथे आपण अपूर्ण, गोंधळलेले किंवा भावनिक असलो तरी स्वीकारले जातो. कदाचित म्हणूनच अशा लोकांबद्दल आपण सहज म्हणतो, I've found my tribe. कारण तिथे आपल्याला अभिनय करावा लागत नाही,  फक्त स्वतःसारखं असण्याची परवानगी मिळते.

म्हणून पुढच्या वेळी कुणाबद्दल ठाम मत बनवण्यापूर्वी एक क्षण थांबा. कदाचित तुम्ही त्या व्यक्तीला नाही, तर तिची एखादी भूमिका पाहत असाल.

आणि स्वतःलाही एक प्रश्न विचारा...

लोकांना मी भेटतोय... की माझी भूमिका?

कारण मानसिक आरोग्याचा प्रवास हा नवीन व्यक्ती बनण्याचा नसतो. तो एक-एक मुखवटा अलगद बाजूला ठेवत, स्वतःकडे परत येण्याचा असतो. लोकांनी आपल्याला ओळखणं महत्त्वाचं आहेच पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, सर्व मुखवटे काढल्यानंतर उरलेल्या स्वतःला आपण ओळखतो का?

- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक

डिचोली - गोवा 

७८२१९३४८९४