आवाज उठला की गोंगाट होतो,
शांत बसलो तर कमकुवत ठरतो.
उपोषणावर बसले की बातमी बनतो,
न्याय...न्याय मात्र तरीही वाट पाहतो.
मोर्चे निघतात, घोषणा घुमतात,
आपण मात्र मोबाईलवर टाळ्या वाजवतो.
दोन दिवस स्टेटस, चार दिवस चर्चा,
मग पुन्हा सगळं विसरून जातो.
प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरतो आवाज,
प्रत्येक वेळी मनात पेटते ज्वाला.
पण इतिहासाला जाग यावी म्हणून,
का द्यावा लागतो पुन्हा...पुन्हा... रक्ताचाच हवाला?
भूक आहे पण ती अन्नासाठी नाही,
तर न्यायासाठी.
रोज थोडं थोडं शरीर होतं क्षीण,
पण सत्तेचं मन मात्र विरघळत नाही.
प्रत्येक वेळी उपाशीच राहून प्रश्न सोडवावा का लागतो?
प्रत्येक वेळी जीव धोक्यातच घालावा का लागतो?
न्याय मिळविण्यासाठी
माणसाने स्वतःलाच संपवावं का लागतं?
आज पुन्हा एक दीप वाऱ्याशी लढतो आहे,
अंधार मात्र अजूनही हसतो आहे.
जिवंत असताना ऐकू येत नाही कुणाला,
गेल्यावर मात्र कळते जगाला.
प्रश्न अजूनही जिवंत आहे.
आशेचा दिवा अजूनही तेवत आहे.
सत्तेच्या दारी उभा आहे प्रश्न,
उत्तर मात्र अजूनही नि:शब्द आहे.
एक दिवस इतिहास लिहिला जाईल कदाचित,
कोण जिंकले...कोण हरले याचा.
पण त्या पानांवर आधी उमटले असतील ठसे,
न्यायाच्या भूकेसाठी लढणाऱ्या माणसांचे.
- रुचिता रत्नाकर राव
भुतवाडी, पेडणे, गोवा