मागील लेखात सांगितल्याप्रमाणे आदिवासी मुलांना शाळेत एका जागी बसवणे हे महाकठीण काम. त्यांच्या आचार-विचारातच ते बसत नव्हते. दिवसभर रानावनात भटकणे, त्या दिवसापुरतीच पोटाची खळगी भरली की मग पुढचे पुढे ही वृत्ती अंगात भिनलेली. त्यांची भाषा वेगळी. त्यांच्या चालीरीती वेगळ्या. शिक्षित समाजाच्या तसे जवळच, पण विचाराने कोसो दूर असलेले असे हे निसर्गपुत्र. मूलभूत गरजा, हक्क वगैरे काहीच माहिती नाही. अशा जनतेला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हेच आमचे ध्येय होते. तसे अनेक जण, संघटना या कामात गुंतल्या होत्या. अर्थात त्यात काही मतलबी तर काही राजकारणीही होत्या. पण काही ठराविक लोक, कार्यकर्ते खरंच कष्ट घेत होते.
आम्ही बी.एड.चे विद्यार्थी फावल्या वेळेत जायचो आदिवासी पाड्यावर. अहो, मुंबईत अजूनही आदिवासी लोक राहतात पिढ्यानपिढ्या. यावर अनेकांचा विश्वास बसणे कठीण, पण वस्तुस्थिती आहे खरी. तर या लोकांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणणे, यांसाठी मुळात ते शिक्षित असणे आवश्यक. सरकारने पाड्या-पाड्यात अनेक अंगणवाड्या, शाळा बांधल्या होत्या. पण एक नकारात्मक भावना म्हणा किंवा दुर्लक्ष म्हणा, त्यांच्याकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नव्हते. आम्ही अगदी घराघरात जाऊन मुले गोळा करत असू. काही वेळा यश येत असे, पण बऱ्याचदा तशी बोंबच होती.
त्यांच्या पालकांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होते की त्यांना शिक्षणापेक्षा रोजच्या जेवणाची सोय महत्त्वाची. आता यातून मार्ग काढणे आवश्यक होते. आम्ही ज्या गावात जात असू, त्या गावचा सरपंच हा तसा भला माणूस होता, तसेच अनुभवी होता. लोकांच्या प्रश्नांची बऱ्यापैकी जाण असलेला. असाच एक दिवस मॅडमसह त्यांच्याशी याच विचारावर संवाद झाला. तेव्हा त्यांचे म्हणणे असे पडले की, पाड्यावरच्या लोकांना शिक्षित करण्यासाठी त्यांच्या पोटाची सोय झाली पाहिजे, तरच ते इतर गोष्टींकडे वळतील. आता पोटाची सोय कशी करायची? त्यांना काही धंदेवाईक शिक्षण दिले - उदा. शिवणकाम, लोणची-पापड करणे, आदिवासी कलाकृती तयार करून विकणे, भाजीपाला लागवड वगैरे.
विचार तर योग्य होते, पण प्रत्यक्षात आणायचे कसे? एक तर आम्हीही विद्यार्थी, त्यात पैशांचाही प्रश्न होता. कारण त्यांना जी सामग्री लागेल ती विकतच आणावी लागणार. मग ती जबाबदारी सरपंचाने घेतली. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही जर त्यांना मदत केली, तीही प्रत्यक्ष, तर आर्थिक साहाय्य तो उचलायला तयार झाला. चला म्हटले, हा प्रयोग करून पाहूयात. थोड्याच दिवसांत दिवाळीची सुट्टी सुरू होणार होती. मधल्या वेळात आम्हीही या गोष्टींचा अभ्यास केला, काही योजना आखल्या आणि सुरुवात केली एका नव्या पर्वाला.
आता ध्येय किंचित बदलले होते. नेहमी मुलांना शाळेत आणण्यासाठी धावपळ करणारे आम्ही, अब पालकांना पंचायत ऑफिसमध्ये जमा करू लागलो. अर्थात, गोष्ट जरा अवघडच गेली. पण काहीतरी नावीन्यपूर्ण गोष्ट पंचायतीत घडतेय, ही बातमी गावात पसरली होती. त्या कुतूहलापोटी म्हणा लोक येऊ लागले. सरपंचाने सगळी सोय करून ठेवली होती. अगदी शिवणयंत्रापासून ते मध काढण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या माणसापर्यंत. सरपंच खरा हौशी कलाकार. फक्त त्याला योग्य टेकू हवा होता, आणि तो आम्ही दिला.
पापड-लोणची बनवणे, शास्त्रीय दृष्टीने खताचा वापर करून भाजी पिकवणे, अशा तऱ्हेने शिक्षणाचा शुभारंभ झाला. आधी नवीन वाटणाऱ्या लोकांनी मग हळूहळू साथ द्यायला सुरुवात केली. त्यात सरपंचाची भीतीही होतीच. अशिक्षित माणूस हा खरा व्यवहारचतुर असतो असे म्हणतात. हे लोक रानावनात राहत असले, तरी विसाव्या शतकात वावरणारे. त्यामुळे पैशांचे महत्त्व त्यांनाही कळत होते. आम्ही जे त्यांना शिकवतो, त्यातून आपल्याला बऱ्यापैकी अर्थप्राप्ती होऊ शकते हे त्यांना आता पटू लागले. सर्वप्रथम तयार झालेली भाजी बाजारात विकल्यावर आलेला पैसा पाहून, चेहऱ्यावर कधी नव्हते ते खुशीचे भाव दिसू लागले त्यांच्या. मग हळूहळू साथ देऊ लागले. आता बोलवायची गरजच पडत नव्हती, उलट बाकीच्या पाड्यांवरचे लोकही जमू लागले.
आता झाली काही वर्षे आम्ही सुरुवात तर करून दिली, पुढे असे उपक्रम पंचायतीतर्फेही राबवण्यात येऊ लागले. आज पाडे बऱ्यापैकी स्वयंपूर्ण झालेत. अगदी शंभर टक्के म्हणत नाही मी, पण निवांत अंग झाकायला धडूत तरी आली. क्वचित एखाद्या घरात मोबाईल फोनही दिसतोय. आणि या कामात खारीचा का होईना वाटा उचलला, याचे समाधानही मिळतेय आम्हाला...

- सौ. रेशम जयंत झारापकर
मडगाव, गोवा.


