Home >> ती >> विठ्ठलाकडे जाणारी पावलं

विठ्ठलाकडे जाणारी पावलं

दर्शनाची खरी सांगता मंदिराबाहेर होते. जेव्हा आपण घरी परतल्यावर आपल्या वागण्यात करुणा, शब्दांत संयम आणि कृतीत माणुसकी जपतो, तेव्हाच विठ्ठल विटेवरून उतरून आपल्या जीवनात येतो.

Story: वारी |
24th July, 10:20 pm
विठ्ठलाकडे जाणारी पावलं

जगात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. प्रत्येक ठिकाणी माणूस देवाला शोधत जातो. पण पंढरपूर हे कदाचित एकमेव असे तीर्थक्षेत्र आहे, जिथे देवच शतकानुशतके भक्तांची वाट पाहत उभा आहे. कमरेवर हात ठेवून, विटेवर उभा असलेला विठ्ठल जणू प्रत्येकाला एकच प्रश्न विचारतो..."इतका उशीर का झाला?"

आषाढ जवळ आला की हा प्रश्न ऐकण्यासाठी लाखो पावलं घराबाहेर पडतात. ही पावलं फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर  गोव्याच्या किनाऱ्यांवरून, कर्नाटकाच्या भूमीतून, तेलंगणाच्या सीमाभागातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून श्रद्धेचे प्रवासी पंढरीच्या दिशेने निघतात. त्यांची भाषा वेगळी असते, परंपरा वेगळ्या असतात, पण त्यांच्या ओठांवरचं नाम एकच असतं ,ते म्हणजे ‘विठ्ठल’.

आषाढी एकादशी हा भगवान विष्णूच्या उपासनेचा दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. अनेक प्रदेशांत तो देवशयनी एकादशी म्हणून ओळखला जातो. मात्र पंढरपूरने या दिवसाला केवळ धार्मिकच नव्हे, तर सांस्कृतिक आणि मानवी मूल्यांचीही उंची दिली आहे. म्हणूनच पंढरपूर हे एका राज्याचे नव्हे, तर संपूर्ण भारताच्या भक्तिभावाचे प्रतीक आहे.

वारी म्हणजे अंतर मोजण्याचा प्रवास नाही, ती अहंकार कमी करण्याची साधना आहे. प्रत्येक पावलागणिक थकवा वाढतो, पण मन हलकं होत जातं. प्रत्येक अभंगात स्वर असतोच; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वारकऱ्याच्या चालण्यात एक तत्त्वज्ञान असतं. ही वारी सांगते की माणसापर्यंत पोहोचल्याशिवाय देवापर्यंत पोहोचता येत नाही.

आज आपण विज्ञानाच्या युगात जगतो, कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करतो, अवकाशात झेप घेतो, पण मनामनांतील अंतर वाढत चाललं आहे. अशा वेळी पंढरपूरची वारी आपल्याला आठवण करून देते की प्रगतीची खरी उंची तंत्रज्ञानात नाही, तर माणुसकीत आहे.

आषाढी एकादशीचा खरा अर्थ उपवासात नाही, तर अंतर्मनातील स्वार्थाचा त्याग करण्यात आहे. विठ्ठलाला फुलं अर्पण करणं सोपं आहे. पण दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचं फूल उमलवणं अधिक कठीण आहे. विठ्ठलाला नमस्कार करणं सहज आहे. पण प्रत्येक माणसात विठ्ठल पाहणं हीच तर खरी साधना आहे.

यंदा पुन्हा लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी उभे आहेत. परंतु दर्शनाची खरी सांगता मंदिराबाहेर होते. जेव्हा आपण घरी परतल्यावर आपल्या वागण्यात करुणा, शब्दांत संयम आणि कृतीत माणुसकी जपतो, तेव्हाच विठ्ठल विटेवरून उतरून आपल्या जीवनात येतो.

कदाचित म्हणूनच पंढरपूरची वारी आजही चालते. कारण देव बदलत नाही, पण प्रत्येक वर्षी बदलण्याची संधी मात्र माणसाला मिळत राहते.

- पल्लवी उल्हास घाडी