आपण अनेकदा आरोग्याचा विचार करताना फक्त वजन, बॉडी मास इंडेक्स (BMI) किंवा शरीरयष्टीकडे पाहतो. पण आपल्या आरोग्याचा खरा आरसा वजनकाटा नसून आपल्या शरीराची चयापचयाची क्षमता (Metabolic Health) असते. दिसायला सडपातळ किंवा “फिट” असणे म्हणजे आपण मेटाबॉलिकदृष्ट्या निरोगी आहोतच असे नाही. त्याचप्रमाणे जास्त वजन असलेल्या प्रत्येक व्यक्तीची मेटाबॉलिक हेल्थ खराब असेलच असेही नाही.
आपण जे अन्न खातो त्यातून शरीराला ऊर्जा मिळते. ही ऊर्जा योग्य प्रकारे वापरणे, गरजेनुसार साठवणे आणि आवश्यकतेनुसार पुन्हा वापरणे ही शरीराची क्षमता म्हणजे “मेटाबॉलिक हेल्थ.”
वजनकाटा हा संपूर्ण आरोग्याचा मापदंड नाही. शरीराचे वजन हे चरबी, स्नायू, हाडे, पाणी आणि इतर ऊती यांचे एकत्रित वजन असते..
BMI (Body Mass Index) हा वजन आणि उंची यांच्या आधारे शरीराचे वर्गीकरण करण्यासाठी उपयुक्त निर्देशक आहे. मात्र तो शरीरात किती चरबी आहे, किती स्नायू आहेत किंवा चरबी नेमकी कुठे साठली आहे हे सांगत नाही. त्यामुळे BMI महत्त्वाचा असला तरी तो मेटाबॉलिक हेल्थचा एकमेव निकष नाही.
मेटाबॉलिक हेल्थचे मूल्यमापन करताना केवळ वजन नव्हे, तर कंबरेचा घेर, रक्तदाब, रक्तातील साखर, ट्रायग्लिसराइड्स आणि HDL (“चांगले” कोलेस्टेरॉल) यांचाही विचार केला जातो.
यापैकी तीन किंवा अधिक गोष्टी असामान्य असतील तर त्या स्थितीला मेटाबॉलिक सिंड्रोम असे म्हणतात. हा स्वतः एक आजार नसून भविष्यात टाइप २ मधुमेह, फॅटी लिव्हर, हृदयविकार आणि इतर चयापचयाशी संबंधित आजारांचा धोका वाढल्याचा इशारा असतो.
मेटाबॉलिक सिंड्रोमचे प्रमुख निकष :
कंबरेचा घेर – पुरुष ≥९० सेमी, महिला ≥८० सेमी
ट्रायग्लिसराइड्स ≥१५० mg/dL
HDL – पुरुष <४० mg/dL, महिला <५० mg/डल
रक्तदाब ≥१३०/८५ mmHg किंवा त्यासाठी औषधे सुरू असणे.
उपाशीपोटी रक्तातील साखर ≥१०० mg/dL किंवा त्यासाठी उपचार सुरू असणे
आपण अनेकदा तपासण्या तेव्हाच करतो जेव्हा काही त्रास सुरू होतो. पण मेटाबॉलिक आरोग्य बिघडण्याची प्रक्रिया अनेक वर्षे शांतपणे सुरू असू शकते. त्यामुळे आजार होण्याची वाट पाहण्यापेक्षा मेटाबॉलिक हेल्थ वेळोवेळी तपासण्याची सवय लावणे अधिक शहाणपणाचे आहे.
वयाच्या तिशीनंतर, किंवा मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास, लठ्ठपणा, PCOS, उच्च रक्तदाब किंवा इतर जोखीम घटक असल्यास त्यापूर्वीही, वजन, कंबरेचा घेर आणि रक्तदाब नियमित तपासावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी उपाशीपोटी रक्तातील साखर, HbA1c आणि लिपिड प्रोफाइल यांसारख्या तपासण्या करून घेणे उपयुक्त ठरते.
एकदा उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा कोलेस्टेरॉलचे विकार दीर्घकालीन स्वरूप धारण करतात, तेव्हा अनेकांना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधांची गरज भासते. औषधे प्रभावी आणि आवश्यक असू शकतात, परंतु आपले उद्दिष्ट आजार होण्याची वाट पाहणे नसून तो टाळणे किंवा शक्य तितका उशिरा होऊ देणे हे असले पाहिजे.
आरोग्याच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची असते ती पोटाभोवती साठणारी चरबी. म्हणूनच कंबरेचा घेर हा मेटाबॉलिक हेल्थचा महत्त्वाचा निर्देशक मानला जातो.
आजकाल पोट सुटणे इतके सामान्य झाले आहे की अनेकांनी ते आयुष्याचा नैसर्गिक भाग मानून स्वीकारले आहे. “वय वाढले की पोट येणारच”, “मुलं झाल्यावर, विशेषतः सिझेरियननंतर पोट राहणारच”, “पुरुषांचे पोट वयानुसार वाढतेच” अशी वाक्ये आपण नेहमी ऐकतो. पण ही अवस्था सामान्य असली तरी अपरिहार्य नाही.
वय वाढल्यावर, गर्भधारणेनंतर किंवा प्रसूतीनंतर शरीरात अनेक बदल होतात आणि पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो. मात्र पोटाभोवती जास्त चरबी साठणे हे केवळ वय, गर्भधारणा किंवा सिझेरियनमुळेच होते असे नाही. आहार, नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप, ताणतणाव, तंबाखू व मद्यपान यांसारख्या जीवनशैलीतील घटकांचाही त्यावर मोठा प्रभाव असतो. त्यामुळे पोट सुटणे हे दुर्लक्ष करण्यासारखे नसून आपल्या मेटाबॉलिक हेल्थकडे लक्ष देण्याची एक संधी आहे.
चांगली मेटाबॉलिक हेल्थ असेल तर शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सुरळीत चालतात आणि टाइप २ मधुमेह, हृदयविकार, फॅटी लिव्हर यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.
चांगली गोष्ट म्हणजे मेटाबॉलिक हेल्थ सुधारता येते. संतुलित आहार हा त्याचा पाया आहे. त्यासोबत नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप, ताणाचे योग्य व्यवस्थापन, तंबाखू टाळणे आणि मद्यपानावर नियंत्रण या सवयी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
आपण काय खातो, किती खातो आणि कोणत्या स्वरूपात खातो याचा आपल्या मेटाबॉलिक हेल्थवर मोठा परिणाम होतो. म्हणून संतुलित आहार हा केवळ वजन कमी करण्यासाठी नसून निरोगी चयापचय, दीर्घकालीन आरोग्य आणि उत्तम जीवनमानासाठी अत्यावश्यक आहे.



