स्वावलंबन

मुलांना आयुष्यभर सुखाच्या सावलीत ठेवण्यापेक्षा, उन्हात स्वतःची सावली निर्माण करता येईल इतके सक्षम करणे हे पालकांचे खरे प्रेम असते. पालकांची खरी संपत्ती सुखसोयी नसून स्वावलंबनाची शिकवण हीच असते.

Story: अनुभवलेलं |
31st July, 10:20 pm
स्वावलंबन

आजकालच्या काळात पालक आपल्या मुलांचे खूप लाड करतात. आपण ज्या सुखसोयी अनुभवल्या नाहीत, त्या आपल्या मुलांना मिळाव्यात आणि त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये, अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यासाठी ते मुलांना सर्व सुविधा उपलब्ध करून देतात. पण सहज मिळणाऱ्या गोष्टींची किंमत कधी कधी मुलांना कळत नाही. आयुष्यभर सावलीत वाढलेल्या झाडाला उन्हाची सवय नसते, त्यामुळे अचानक सावली नाहीशी झाली तर ते झाड डगमगून जाते; अगदी तसेच मुलांच्या बाबतीतही होते. लक्ष्मी आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय होती, पण आपल्या लेकीची काळजी तिचे आई-वडील मनापासून घेत. लक्ष्मीचे बालपण अगदी सुखासमाधानात गेले. बालवर्गात असताना बाबांच्या सायकलवर बसून शाळेत जाणे असो किंवा आईने शिजवलेले साधे जेवण असो, लक्ष्मीसाठी ते एखाद्या पंचपक्वान्नापेक्षा कमी नव्हते. शाळा सुटल्यावर आईबरोबर चालत घरी येताना दोघींच्या गप्पा रंगायच्या.

​लक्ष्मी हळूहळू मोठी होत होती. पहिलीपासून शाळेची वेळ वाढल्यामुळे बाबा तिला रोज शाळेत ने-आण करू लागले. काही दिवसांनी बाबांनी लुना घेतली. बाबांच्या पाठीला घट्ट धरून बसलेली लक्ष्मी स्वतःला जगातील सर्वात सुरक्षित मुलगी समजत असे. आई-बाबांच्या प्रेमाच्या सावलीत वाढणाऱ्या लक्ष्मीचे जग हे घर, शाळा आणि आई-बाबा यांच्यापुरतेच मर्यादित होते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण आई-बाबा स्वतः पुढे होऊन दूर करत असल्यामुळे, परिस्थितीशी झगडणे किंवा एखादी जबाबदारी घेणे असा प्रसंग तिच्यावर कधी आलाच नव्हता. असेच दिवस आनंदात जात असताना लक्ष्मी दहावीत पोहोचली. तिचे आयुष्य निवांत चालले होते. पण एक दिवस अचानक शेजाऱ्यांच्या फोनवरून निरोप आला "लक्ष्मीच्या बाबांना हृदयविकाराचा झटका आला आहे!"

​हे शब्द ऐकताच लक्ष्मीच्या पायाखालची जमीन सरकली. आई नातेवाईकांसोबत हॉस्पिटलच्या दिशेने धावली आणि लक्ष्मी घरात एकटीच राहिली. घरातील वस्तू आणि पैसे असूनही त्या क्षणी तिला माणसाचे महत्त्व कळले. स्वयंपाक न येणाऱ्या आणि एकटी घराबाहेर न पडलेल्या लक्ष्मीला त्या रात्री पहिल्यांदाच स्वतःची असहायता जाणवली. 'आई-बाबा नसतील तर आपले काय होईल?' या विचाराने तिचे काळीज धडधडू लागले. सुदैवाने काही दिवसांत बाबा हृदयविकारातून सावरले आणि घरी परतले. लक्ष्मीने सुटकेचा नि:श्वास सोडला; पण या घटनेमुळे बाबांच्या मनात एक विचार रुजला— 'आपण उद्या नसू तर आपली मुलगी आयुष्याच्या उन्हात स्वतः उभी राहू शकेल का?' त्यांनी लक्ष्मीला स्वावलंबी बनवण्याचा निर्णय घेतला.

​दुसऱ्या दिवसापासून बाबांनी तिला शाळेत सोडणे बंद करून चालत जाण्यास सांगितले. सुरुवातीला लक्ष्मीला वाईट वाटले, पण बाबांनी तिला स्वतःच्या पायावर चालायला शिकवण्याचा मार्ग धरला होता. त्यांनी तिला खिशात पैसे देऊन ते जपून वापरायला, गरजा आणि इच्छा यांतील फरक ओळखायला शिकवले. "सुखात जगणे चांगलेच, पण सुख नसेल तरी खंबीरपणे जगता आले पाहिजे," हा मंत्र बाबांनी तिला दिला. हळूहळू लक्ष्मी स्वतःच्या छोट्या जबाबदाऱ्या स्वीकारू लागली. बारावी सायन्सनंतर तिने बाबांकडे हात न पसरता स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे ठरवले. ती विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेऊ लागली. दिवसभर कॉलेज, संध्याकाळी शिकवण्या आणि रात्री स्वतःचा अभ्यास... या कष्टांतून तिने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण स्वबळावर पूर्ण केले.

​काळ पुढे सरकत गेला. एक दिवस लक्ष्मी एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून रुजू झाली. तिच्यात आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याचे धैर्य आले होते. एका संध्याकाळी ती आई-बाबांसमोर उभी ठाकली. बाबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. लक्ष्मी बाबांच्या कुशीत शिरत म्हणाली, "बाबा, तुम्ही मला शाळेत सोडणे बंद केले तेव्हा मला राग आला होता; पण आज समजतेय, तुम्ही मला शाळेचा रस्ता नाही तर आयुष्याचा रस्ता चालायला शिकवलात." मुलांना आयुष्यभर सुखाच्या सावलीत ठेवण्यापेक्षा, उन्हात स्वतःची सावली निर्माण करता येईल इतके सक्षम करणे हे पालकांचे खरे प्रेम असते. पालकांची खरी संपत्ती सुखसोयी नसून स्वावलंबनाची शिकवण हीच असते.

- सौ. गौरी रोशन वेर्लेकर