पावसाळ्याचे दिवस होते. झाडांवरची पानं धुवून निघाली होती आणि अंगणातल्या चिमण्याही चिवचिव करत होत्या. चिऊ-काऊचा घास भरवता भरवता आता बाळाला शिशुवाटिकेत पाठवायला हवे, समाजात, मुलांत मिसळायला शिकवायला हवे, याची जाणीव आईला झाली.
त्याच दिवसांत वनिता आणि विजय यांचा एकुलता एक वेद अडीच वर्षांचा झाला. घरातला लाडका, सगळ्यांच्या डोळ्यांची पापणी.
"आपल्या वेदाला आता बालवाडीत पाठवायचं आहे," वनिताने एके दिवशी विजयला सांगितले.
म्हणून मग आधीपासूनच दोघांनी तयारी सुरू केली. त्याला इतर मुलांसोबत मोकळ्या बागेत खेळायला सोडायचे. शाळेच्या गेटपाशी संध्याकाळी फेरी मारायची. घरी बसून त्याला गोष्टी सांगायच्या - "बाळा, शाळेत गेल्यावर बाईंचे ऐकायचे, सगळ्यांशी हसून बोलायचं, रडायचं नाही हं."
आई-वडिलांच्या या संस्कारांचा परिणाम असा झाला की ज्या दिवशी वेद पहिल्यांदा शाळेत गेला, त्या दिवशी तो कोणाचाही हात न धरता, अगदी हसतमुखाने वर्गात गेला.
वर्गात गेल्यावर बाई जे सांगतील ते करणे - नमस्कार करणे असो, प्रार्थना असो, खेळ असो की व्यायाम वा कोणत्याही क्रियाकलाप... वेद सगळ्यात पुढे असायचा. बाई एखादी गोष्ट सांगायच्या तर तो टक लावून ऐकायचा आणि मग हात वर करून उत्तरही द्यायचा.
पण शाळेचे पहिले काही दिवस जरा गोंधळाचे होते. गावातून आलेली कोवळी मुलं पहिल्यांदा आईपासून लांब आली होती. त्यामुळे वर्ग सुरू झाला की कुणीतरी हमसून हमसून रडायचं.
बाईंचीही अडचण होती. जोपर्यंत रडणे थांबत नाही तोपर्यंत नीट वर्ग कसा घेणार? म्हणून बाई त्या रडक्या मुलाला मांडीवर घ्यायच्या, पाठीवरून हात फिरवायच्या, खेळणी द्यायच्या आणि हळूहळू गप्प करायच्या.
या सगळ्यात "शहाणी" मुलं बाजूला राहायची.
बाईंच्या मनातही असं असायचं - "ती शहाणी आहेत, त्यांना समजतं. आधी यांना गप्प करू."
पण लहान मुलांच्या मनाला हे कुठे कळणार?
त्यांना फक्त एवढंच दिसायचं - "बाई त्याला जवळ घेतात, त्याच्याशी बोलतात, त्याला 'शाब्बास' म्हणतात. मग आमचं काय?"
असाच एक दिवस झाला. शाळा सुटल्यावर वेद घरी आला, पण आज त्याच्या चेहऱ्यावरचा हसरा भाव नव्हता. तो सरळ आईच्या पदराला लागून बसला.
वनिता म्हणाली, "काय झालं बाळा? आज एवढा शांत का?"
वेदाचे डोळे पाणावले. तो म्हणाला, "आई... मी कुठे चुकलो का?"
आई घाबरली. "काय झालं बाळा? सांग ना."
वेद म्हणाला, "आई, बाई रोज त्यांनाच जवळ घेतात जे रडतात. त्यांनाच गोष्ट सांगता. त्यांच्याशीच बोलतात. मी शांत बसतो, सगळं ऐकतो, तरी बाई माझ्याकडे बघतच नाहीत. मला कधी 'शाब्बास' म्हणत नाहीत. मी पण रडलो असतो का मग?"
आईचा काळजाचा ठोकाच चुकला. तिने वेदाला घट्ट मिठी मारली.
"नाही बाळा! तू अजिबात चुकला नाहीस. तूच तर खरा शहाणा आहेस. बाई तुला त्रास देत नाहीत. पण बाळा, तुझं म्हणणंही बरोबर आहे. शहाण्यांनाही कधीतरी कौतुकाची थाप हवी असते."
दुसऱ्या दिवशी वनिता शाळेत गेली आणि तिने ही गोष्ट बाईंना प्रेमाने सांगितली.
बाईंना क्षणात आपली चूक कळली. त्या म्हणाल्या, "अगं ताई, नकळत आपण किती मोठा अन्याय करत होतो."
त्या दिवसापासून बाईंनी नियमच केला. वर्गात थोडा वेळ मध्ये मध्ये या मुलांना घेऊन लाड करायचे, बाकी आपला वर्ग चालू ठेवायचा. शहाण्या मुलांशी गप्पा मारायच्या, त्यांच्या चित्रांचं कौतुक करायचं, त्यांच्याशी खेळायचे, त्यांना 'शाब्बास' म्हणायचे.
आणि गंमत बघा... जेव्हा शहाण्या मुलांना लक्ष मिळू लागले, बाई त्यांच्याशी भरपूर खेळ खेळू लागल्या, गंमत बडबडगीते गाऊ लागल्या; तेव्हा रडकी मुलंही बघता बघता शांत झाली. आपोआप ती पाहता पाहता हसू लागली, गाऊ लागली. उलट बाई गप्प झाल्यावर ती रडू लागत होती; कारण त्यांना कळलं की, शाळेत फक्त येऊन जायचे नसते, तर शाळेत खूप खूप मज्जा असते. रडल्याशिवायही बाई प्रेम करतात. हा उपाय १०० नंबरी ठरला.
...आणि कधीकधी मुलं रडण्यामागचं कारणही आई-वडील असतात, कारण आधीच शाळेची, बाईंची भीती घालून पाठवतात. तर असे दोन्हीकडून होऊ नये.
शिवाय पहिलेवहिलेच दिवस दोन्ही मनांना जपणारे असावेत.
काहीच दिवसांत दोन्ही मुलांना शाळा आपले घर वाटते आणि बाई आपल्या आई वाटू लागतात. नंतर बाई आणि मुलगा दोघांनाही त्रास होत नाही, जर बाईंनी आईसारखे प्रेम केले तर... "आईपेक्षाही जवळच्या बाई होऊन जातात."
शेवटी एकच शिकवण -
बालमन हे काचेसारखे असते. त्यावर कोणता ओरखडा कधी पडेल हे आपल्याला कळतही नाही. म्हणून प्रत्येक मुलाला, मग तो शहाणा असो की रडका, सारखेच प्रेम आणि लक्ष दिले पाहिजे.


