Home >> ती >> ओढ विटेवरच्या भगवंताची, थोरवी वारकऱ्यांची

ओढ विटेवरच्या भगवंताची, थोरवी वारकऱ्यांची

संतांनी दिलेल्या भक्ती, समता आणि सेवाभावाच्या विचारांचा वारसा प्रत्येक पिढीने जपला, तर वारकरी परंपरेचे पावित्र्य कायम राहील. हीच या वारीची खरी शिकवण आहे.

Story: वारी |
24th July, 10:24 pm
ओढ विटेवरच्या भगवंताची,  थोरवी वारकऱ्यांची

जुलै महिना सुरू होताच प्रत्येक वारकऱ्याच्या मनात एक वेगळाच उत्साह दाटतो,

विठ्ठलाच्या गजरात वारकरी मग्न होतो.

भूक - तहान विसरून रात्रंदिवस विठोबाचे भजन करतो,

पारी वारी करत पांडुरंगाच्या चरणाशी लीन होतो.

वारी म्हणजे प्रत्येक भक्ताला आध्यात्मिक बळ देणारी आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारी परंपरा. आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येक वारकऱ्याच्या आणि प्रत्येक विठ्ठलभक्ताच्या नसानसांत विठ्ठलनामाचा गजर घुमू लागतो. आषाढी एकादशीच्या सुमारे पंधरा-वीस दिवस आधीच वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास सुरू करतात.

आजचे युग तंत्रज्ञानाचे आणि आधुनिकतेचे आहे. त्यामुळे घरी बसूनही मोबाईलच्या माध्यमातून वारीचा अनुभव घेता येतो. विविध दिंड्या कुठपर्यंत पोहोचल्या, त्यांचा दिवस कसा जातो, नामसंकीर्तन, रिंगण, भजन, कीर्तन यांसारख्या अनेक घडामोडी आज सहज पाहता येतात. मात्र, असे म्हणतात की प्रत्येक माणसाने आयुष्यात किमान एकदा तरी पंढरीची वारी अवश्य करावी. आज मोबाईलवर एखाद्या वारकऱ्याचा व्हिडिओ किंवा छायाचित्र पाहिले की मनात नकळत विचार येतो, एकदा तरी ही वारी अनुभवायलाच हवी. कारण प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, विठ्ठलावरील अढळ श्रद्धा आणि भक्तीची तल्लीनता मनाला स्पर्श करून जाते.

माझ्या या लेखात मला विशेष उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे वारीत सहभागी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा आणि लहान मुलांचा. आजचे युग वेगाने बदलत असले तरी आपल्या पूर्वजांनी दिलेली भक्तीची परंपरा आजही अनेक वयोवृद्ध जपताना दिसतात. त्यांचे समर्पण आणि श्रद्धा खरोखरच प्रेरणादायी आहे. तसेच लहान - लहान मुले देखील विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन आज पायिवारी करतात. त्यांना पाहून स्वतः विठ्ठलच जणू त्या तान्हूल्या बाळांना बळ‌ देतो असे वाटते.‌

वारीचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे वयाचे कोणतेही बंधन नसते. लहान-लहान मुलेही आनंदाने, उत्साहाने आणि भक्तिभावाने पायी वारी करतात. कदाचित त्यांना वारीचे संपूर्ण महत्त्व अजून समजत नसेल,‌पण विठ्ठलनामात रमलेले त्यांचे निरागस हास्य आणि उत्साह प्रत्येकाच्या मनाला आनंद देऊन जातो.

तसेच, वारीमध्ये मेंढ्यांचे रिंगण पालखी भोवती घातले जाते. मोबाईल मध्ये त्यांची छायाचित्रे पाहूनच मन तृप्त होते तर समोरासमोर ते रिंगण पाहून वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा होईल हे मात्र नक्की. असे म्हणतात, की पूर्वीच्या काळात मेंढ्यांचा रोग आला होता तेव्हा मेंढपाळांनी पालखीभोवती मेंढ्यांचे रिंगण घालून प्रार्थना केली होती आणि त्यानंतर तो‌ रोग नष्ट झाला असा इतिहास आहे. पण, आज‌ देखील या इतिहासातील आख्यायिकेचा पुरस्कार वारी मध्ये होतो. त्यामुळे आज देखील आपली परंपरा जपली जात आहे याचा प्रत्यय येतो.

पंढरीच्या वारीची परंपरा अनेक शतकांपासून अखंड सुरू आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांसारख्या संतांनी या वारकरी परंपरेला अधिक बळ दिले. त्यांच्या अभंगातून, कीर्तनातून आणि भक्तीमार्गातून ही परंपरा आजपर्यंत अविरतपणे पुढे चालत आली आहे. आजही हजारो वारकरी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून ही परंपरा जिवंत ठेवत आहेत, हिच एक महत्वाची बाब आहे.

पायी वारीतील सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे समता आणि परस्पर आदर. वारी करणारा प्रत्येक वारकरी जात, धर्म, श्रीमंती किंवा गरिबी यांचा कोणताही भेद न करता सर्वांना समानतेने सोबत घेतो. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटले आहे की, 

"विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ.

आणि खरोखर या अभंगाचा संदेश आजही प्रत्येक वारकरी आपल्या आचरणातून जगतो. समानतेचा पुरस्कार करत वारी करतो.

वारीतील एक सुंदर परंपरा म्हणजे प्रत्येकाला "माऊली" म्हणून हाक मारणे. लहान असो किंवा मोठा, श्रीमंत असो किंवा गरीब प्रत्येकामध्ये विठ्ठलाचे रूप पाहिले जाते. इतकेच नव्हे, तर वारीत भेटणाऱ्या पशू-पक्ष्यांनाही प्रेमाने आणि समभावाने वागवले जाते. हीच खरी वारकरी संप्रदायाची शिकवण आहे.

आपल्या गोव्यातूनही अनेक वारकरी पायी चालत पंढरपूर गाठतात. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण विठ्ठलभक्तीत तल्लीन झालेला असतो. हीच अढळ श्रद्धा त्यांना पायी वारी करण्याचे बळ देते. ऊन, पाऊस, थकवा किंवा इतर अडचणी यांची पर्वा न करता ते आनंदाने, एकजुटीने आणि समभावाने हा प्रवास पूर्ण करतात. अखेरीस विठ्ठलाच्या दर्शनाने त्यांच्या भक्तीची सांगता होते आणि त्यांचा प्रवास सार्थकी लागतो.

संतांनी दिलेल्या भक्ती, समता आणि सेवाभावाच्या विचारांचा वारसा प्रत्येक पिढीने जपला, तर वारकरी परंपरेचे पावित्र्य कायम राहील. हीच या वारीची खरी शिकवण आहे.

शेवटी, वारी करणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला मनःपूर्वक एवढेच सांगावेसे वाटते,

तुमची विठ्ठलावरील श्रद्धा अधिकाधिक दृढ होवो.

प्रत्येक वर्षी आषाढी वारीचा पवित्र प्रवास तुमच्या पायांनी घडो.

तुमच्या वारीत कोणतीही अडचण येऊ नये.

माऊलीच्या कृपेने तुमच्या हातून सदैव विठ्ठलाची सेवा घडो.

रामकृष्ण हरी!

- पूजा भिवा परब

पालये, पेडणे - गोवा