वारी संपून परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हा प्रत्येक जण "राम कृष्ण हरी, माऊली!" म्हणत गळाभेट घेत निरोप देत होता. नाव, गाव, ओळख काहीच महत्त्वाची राहिली नव्हती; आम्ही सारे फक्त ‘माऊली’ झालो होतो.

"राम कृष्ण हरी... जय जय राम कृष्ण हरी!" हे शब्द कानावर पडले की मन आपसूकच पंढरीच्या वाटेवर निघते. गेली वीस वर्षे आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांसोबत वारकरी, संत, विठ्ठल-रखुमाई यांच्या वेशात दिंडी काढताना पायी वारीचे संस्कार नकळत माझ्या मनात रुजत गेले. मुलांबरोबर फुगड्या खेळताना, विठ्ठलनामाचा गजर करत चालताना एक प्रश्न मात्र सतत मनात यायचा. आजच्या काळात इतकी वाहने असताना लोक शेकडो किलोमीटर पायी का चालतात? त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची ओढच अखेर मला पायी वारीकडे घेऊन गेली.
दरवर्षी "यावर्षी नाही, पुढच्या वर्षी" असे म्हणत राहिले. पण एक दिवस ठाम निर्धार केला. गोव्यातून कार्तिकी पायी वारी निघते, हे समजताच मी लगेच नाव नोंदवले. वारीच्या दिवशी "श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज वारकरी प्रतिष्ठान" येथे पोहोचले. एकामागून एक वारकरी येत होते. प्रत्येक जण हसतमुखाने "राम कृष्ण हरी, माऊली!" म्हणत गळाभेट घेत होता. हा माझ्यासाठी अगदी नवीन अनुभव होता. मी मात्र नवखी असल्याने थोडी बुजलेली, थोडी उत्सुक आणि मनात विठ्ठलनाम घेऊन त्या वातावरणात उभी होते. पालखीची पूजा झाली, टाळ-मृदंगांचा गजर सुरू झाला आणि त्या क्षणी अंगावर रोमांच उभे राहिले. माझ्या मनातील भीती विरून आनंदाने डोळे भरून आले.
पहिल्याच दिवशी चालण्याचा खरा कस लागला. पाय, जांघा दुखू लागल्या. एका अनोळखी माऊलीने प्रेमाने खोबरेल तेल दिले, एवढेच नव्हे तर बाटलीत भरूनही दिले. त्या माऊलीच्या मायेने माझ्या डोळ्यांत पाणी आले. त्या दिवसापासून रोज रात्री पायांना तेल लावताना एकच प्रार्थना असायची. "पांडुरंगा, उद्या पुन्हा चालण्याचे बळ दे."
दुसऱ्या दिवशी मला सेवाकार्याची जबाबदारी मिळाली. वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात हातभार लावला. तेव्हा जाणवले की वारी म्हणजे केवळ चालणे नव्हे; सेवा, समर्पण आणि सहजीवन यांचाही तो उत्सव आहे. प्रत्येक वारकरी दुसऱ्याच्या सुख-दुःखाची मनापासून काळजी घेत होता.
वारीत अनेक अविस्मरणीय अनुभव लाभले. पालखीबरोबर चालणारा घोडा जसजसा थकत होता तसतसे माझे मनही व्याकूळ होत होते. काही दिवस एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आमच्या दिंडीत सहभागी झालं. त्याला दूध पाजताना मनात वाटलं, हीदेखील विठ्ठलाने दिलेली सेवा आहे. पुढे अनेक श्वान काही काळ आमच्या वारीत सहभागी झाले. त्या मुक्या जीवांमध्येही भक्तीचा अंश जाणवत होता.
गावोगावी पालखीचे होणारे स्वागत तर शब्दातीत होते. शेतकरी काम सोडून धावत येत, पालखीसमोर पाणी अर्पण करत, वारकऱ्यांचे पाय धुऊन नम्रतेने सेवा करत. कुणी शेतातील शेंगा, फुले, फळे झोळीत टाकत होते. त्या प्रत्येक कृतीत भक्ती, प्रेम आणि समर्पण भरून वाहत होते. त्या क्षणी वारकरी म्हणून नव्हे, तर विठ्ठलाचेच रूप म्हणून आमचा सन्मान होत असल्याची जाणीव मनाला स्पर्शून जात होती.
दररोज हरिपाठ, भजन, रिंगण, फुगड्या आणि अखंड नामस्मरणामुळे थकवा कधी जाणवलाच नाही. शरीर दमायचे, पण मन अधिकाधिक प्रसन्न होत गेले. चालता चालता अहंकार, तक्रारी, अपेक्षा सगळे काही मागे पडत गेले.
जसजसे पंढरपूर जवळ येत गेले तसतशी चंद्रभागेच्या स्नानाची आणि विठ्ठलदर्शनाची ओढ वाढत गेली. पूर्वी पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेच्या परिसरातील अस्वच्छता पाहून मनात संकोच निर्माण झाला होता. पण या वारीने मन इतके शुद्ध केले होते की आता त्या सर्व गोष्टी गौण वाटत होत्या. डोळ्यांसमोर फक्त चंद्रभागा आणि विठ्ठलाचे चरण होते.
शेवटी आम्ही पंढरपुरात पोहोचलो. चंद्रभागेच्या दिशेने चालताना आमच्या दिंडीचा गजर संपूर्ण परिसरात दुमदुमत होता. इतक्यात हलकासा पाऊस सुरू झाला. तो पाऊस जणू विठ्ठलाचा आशीर्वादच वाटत होता. चंद्रभागेत स्नान, आरती, पूजा आणि त्यानंतर दीर्घ प्रतीक्षेनंतर लाभलेले विठ्ठलाचे चरणदर्शन हा क्षण आयुष्यभर विसरणे अशक्य आहे. त्या क्षणी सर्व कष्ट, वेदना आणि थकवा नाहीसा झाला.
वारी संपून परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हा प्रत्येक जण "राम कृष्ण हरी, माऊली!" म्हणत गळाभेट घेत निरोप देत होता. नाव, गाव, ओळख काहीच महत्त्वाची राहिली नव्हती; आम्ही सारे फक्त ‘माऊली’ झालो होतो. गंगापूजनाच्या वेळी "जे हवे ते मागा" असे सांगितले गेले. पण माझी सर्वात मोठी इच्छा आधीच पूर्ण झाली होती. पायी वारी करण्याची.त्या क्षणी मी फक्त एवढीच प्रार्थना केली."सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चिद् दुःखभाग् भवेत्॥"
आज मागे वळून पाहताना जाणवते, पायी वारी म्हणजे केवळ पंढरपूरपर्यंतचा प्रवास नाही; तो स्वतःकडे नेणारा प्रवास आहे. या वाटेवर शरीर थकते, पण मन समृद्ध होते. पायांना फोड येतात, पण अंतःकरणात भक्ती फुलते. माणुसकी, सेवा, समर्पण आणि विठ्ठलनामाचा अखंड गजर अनुभवताना खरेच वाटते.
पायी वारी म्हणजे स्वर्गसुखाचा प्रत्यक्ष अनुभव!
- संतोषी शामसुंदर महाले
पर्वरी (९४२०५९४८५९)