Home >> ताज्या बातम्या >> कुलगुरु पदासाठी १८० अर्ज प्राप्त

कुलगुरु पदासाठी १८० अर्ज प्राप्त

राज्यातील प्राचार्य, प्राध्यापकही उत्सुक; छाननीनंतर होणार मुलाखती


23 mins ago
कुलगुरु पदासाठी १८० अर्ज प्राप्त

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : गोवा विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी राज्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य, तसेच विद्यापीठातील प्राध्यापकांनी उत्सुकता दाखवली आहे. गोवा आणि इतर राज्यांमधून या पदासाठी एकूण १८० अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांची छाननी करून समिती पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. त्यानंतर निवडक नावांची यादी राज्यपाल आणि राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. राज्यपालांच्या मंजुरीनंतर नव्या कुलगुरूंच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे.
सध्याचे कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांचा कार्यकाळ येत्या सप्टेंबरमध्ये संपत आहे. त्यापूर्वी म्हणजे ऑगस्टअखेरपर्यंत नव्या कुलगुरूंची नियुक्ती निश्चित होण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, गोवा विद्यापीठातील प्राध्यापक, अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्राध्यापक, तसेच इतर राज्यांतील अनेक प्राध्यापकांनी या पदासाठी अर्ज केले आहेत. अर्ज स्वीकारण्याची मुदत संपल्यानंतर तीन सदस्यीय समितीने अर्जांची छाननी सुरू केली आहे. पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर अंतिम निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.