दोडामार्ग :तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे शुक्रवारपासून पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे गोव्यातील पेडणे तालुक्यातील इब्रामपूर-हणखणे, चांदेल, हसापूर, कासरवर्णे आणि वारखंड या नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ
महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यासह तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागातून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात जमा होत आहे. गुरुवारी सकाळी धरणाची पाणीपातळी १०५.६४ मीटरपर्यंत पोहोचली होती आणि धरण ७४.५० टक्के भरले होते. धरणाची पूर्ण जलसंचय पातळी ११३.२० मीटर तर सांडवा माथा पातळी १०६.७० मीटर आहे. वाढत्या पाणीसाठ्यामुळे खळग्यातील दगडी धरणाच्या सांडव्यावरून पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
खराडी नदीचे पाणी आणि तिलारी धरणातून सोडण्यात येणारे पाणी एकत्र तिलारी नदीत मिळत असल्याने नदीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम पेडणे तालुक्यातील गावांबरोबरच कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, आवाडे, मणेरी, कुडासे आणि साटेली-भेडशी या नदीकाठच्या गावांवरही होऊ शकतो.
१) नदीच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी नदीपात्रातून ये-जा करू नये तसेच कपडे धुण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी पाण्यात उतरू नये.
२) पाळीव जनावरे नदीकाठी किंवा नदीपात्रात सोडू नयेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
३) गावागावांत दवंडी पिटवून नागरिकांना सतर्क करण्यात येत असून, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली.


