Home >> विचार >> सावध ऐका, ‘जेन झी’च्या हाका...

सावध ऐका, ‘जेन झी’च्या हाका...

आपण आणि आपल्या विचारसरणीचे पाठीराखे तेवढे देशप्रेमाचे ठेकेदार. इतर सर्वजण देशद्रोही, ही मानसिकता बदलली जाणार नसेल, तर दिवस भरत आले आहेत, असा स्पष्ट संदेश या चळवळीने दिला आहे.

Story: विचारचक्र |
2 hours ago
सावध ऐका, ‘जेन झी’च्या हाका...

पंढरीच्या विठुरायाच्या भक्तीचा सोहळा म्हणजे आषाढी एकादशी. या एकादशीसाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. या सोहळ्याचे ऐश्वर्य काय वर्णावे? प्रत्येक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला विठुमाऊली मानून त्याची सेवा करतो. कोणी अन्नदान करतो, कोणी जलदान करतो, कोणी स्वच्छतेची काळजी घेतो, कोणी निवास व्यवस्था पाहतो. अनेक ठिकाणी स्नान, शरीरशुद्धीचीही व्यवस्था केली जाते. इतकेच काय, अनोळखी असलेल्या वारकऱ्याचे पाय चेपून पायांना मालिश करण्याचे आगळे सुख आणि पुण्य हजारो विठ्ठलभक्त आपल्या खाती जमा करत आहेत. देशाची राजधानी दिल्लीतही काही वेगळे घडत नाही. तिथेही एक आगळी वारी जमली आहे. फक्त मुद्दा शिक्षण व्यवस्थेचा आणि युवकांच्या ​भविष्याचा आहे. माणुसकीचा जो प्रत्यय पंढरीच्या वाटेवर पदोपदी येतो, तोच प्रत्यय दिल्लीच्या जंतर-मंतरवरही येतो आहे.

या युवकांचे आंदोलन सत्ताधीश पक्षाविरोधात किंवा त्यांच्या समर्थक विचारसरणीविरोधात नाही. अद्याप राजकारणात सक्रिय न झालेली ‘कॉक्रोच जनता पार्टी’ वगळता अन्य कुठल्या राजकीय पक्षाच्या समर्थनात अद्याप कोणी बोललेले नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे बुद्धीभेद करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न सोशल मीडियावरून होत आहे, त्याला नवी पिढी पुरून उरताना दिसते. इथे आलेले विद्यार्थी कोणा एका ठराविक विचारसरणीचे नाहीत. ना त्यांना कोणत्या विचारसरणीची तळी उचलून धरायची आहे. इथला प्रत्येक जण उत्स्फूर्तपणे एकमेकाची काळजी घेताना दिसतो. कोणी आरोग्याच्या बाबतीत, कोणी जेवणाच्या बाबतीत, कोणी स्वच्छतेच्या बाबतीत, तर कोणी चक्क समुपदेशकाच्या भूमिकेत दिसतो. वर म्हटल्याप्रमाणे पंढरपुरच्या वाटेवरील दृश्ये इथेही बघायला मिळतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, धर्म आणि जातपात, भाषा आणि प्रांतवाद, रंगरूप आणि लिंगभेद विसरून हा युवा वर्ग एकवटला आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे बुजुर्गही ​धार्मिक एकतेचाच संदेश देतात. एका मोठ्या लोकसमूहाने द्वेषाची बिजे पेरण्यात दशकभरापेक्षा जास्त काळ घालवला, त्यांच्या श्रीमुखात सणसणीत लगावणारी ही चळवळ आहे.

नॅशनल एलिजिबिलिटी कम एंटरन्स टेस्ट म्हणजेच ‘नीट’ ही परीक्षा काही साधीसुधी परीक्षा नव्हे. बुद्धीचा कस आणि विचारक्षमतेचा किस पाडणारे हे एकप्रकारचे अग्निदिव्यच. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रावर आधारित मूल्यमापनाद्वारे वैद्यकीय प्रवेशासाठी सुमारे २२ ते २३ लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. अतिशय कुशाग्र बुद्धीचे आणि सृजनशील विद्यार्थी यात सहभागी होतात. एका दृष्टीने देशाच्या वैद्यकीय सक्षमतेचा बौद्धिक पायाच या परीक्षेच्या माध्यमातून भक्कम केला जातो. त्या आधी विद्यार्थ्यांकडून जी तयारी केली जाते, त्याला अकरावी, बारावीच्या अभ्यासक्रमाचा संदर्भ असतो. चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा होण्याच्या निकषामुळे अनेकांना फटका बसतो. त्यामुळे फार सावधगिरीने उत्तरे द्यावी लागतात. भौतिकशास्त्र, गणित याची सांगड घालून बुद्धीला सतत सक्रिय ठेवून पक्की पूर्वतयारी करावी लागते. या परीक्षेच्या कठोर निकषांमुळे निम्मेच विद्यार्थी यशस्वी ठरतात. त्यामुळे अशा असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या मुलांचे पेपरफुटीसारख्या गोष्टींतून खच्चीकरण होणे दुर्दैवी नव्हे, तर अक्षम्य आहे. त्यामुळेच ‘फेरपरीक्षा झाली, मुले पुढच्या शिक्षणाच्या तयारीलाही लागली, चौकशी सुरू आहे, संबंधितांना सोडणार नाही’ वगैरे जे तोकडे युक्तिवाद केले जातात, त्याला काडीचाही अर्थ आणि किंमत उरत नाही. किंबहुना तसा युक्तिवाद करणे हा शुद्ध निलाजरेपणा आहे. त्याहून कोडगेपणा म्हणजे विद्यार्थ्यांच्या मताला किंमत न देणे. लाठीमार वगैरे प्रकार निंदनीय आहेतच. पण या आंदोलकांनी केलेली केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणीच अव्हेरली जात असेल, तर फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करण्यात काय हशील? पेपर फुटल्यामुळे १० पेक्षा जास्त मुलांनी जीवन संपविले. शेकडो जण नैराश्येने ग्रस्त आहेत. याची जबाबदारी​ घ्यायला कोणीच तयार नसेल, तर न्याय कसा आणि कुठे मिळणार?

या एकूण आंदोलनात आणखी एक मुद्दा ठळकपणे अधोरेखित झाला आहे, तो म्हणजे संकुचित माध्यमे. ज्या पद्धतीने मुख्य प्रवाहातील इलेक्ट्रॉनिक मीडियाला हुसकावून लावले जात आहे, अपमानास्पद पद्धतीने नाकाराले जात आहे, ते पाहता माध्यमांनीही भानावर येण्याची गरज आहे. सत्ताधिशांची भलावण करणे एका मर्यादेपर्यंत गैर नाही. पण ती मर्यादा उल्लंघून समूळ शरणागती जर पत्करली जात असेल, तर या मानसिकतेची चिरफाड होणारच. त्यामुळे आमच्या व्यवसायबंधूंनी आता मगरीचे अश्रू ढाळण्याची गरज नाही. यातून धडा घेऊन पुढच्या काळात तरी निष्पक्षतेचे मूल्य जपायला हवे.

प्रस्थापितांच्या विरोधात कोणीही आवाज उठविला की, अलीकडच्या काही वर्षांत सहजपणे देशद्रोही असा शिक्का मारला जातो. झुरळ, वाळवी अशी संभावना करून टपोरीगिरी करणे तर नेहमीचेच. आपण आणि आपल्या विचारसरणीचे पाठीराखे तेवढे देशप्रेमाचे ठेकेदार. इतर सर्वजण देशद्रोही, ही मानसिकता बदलली जाणार नसेल, तर दिवस भरत आले आहेत, असा स्पष्ट संदेश या चळवळीने दिला आहे. ही जनरेशन झेड म्हणजेच ‘जेन झी’. तिचे अवकाश वेगळे आहे. त्यांची विचारप्रक्रिया आणि कृ​ती यांत साम्य आहे. तिची उपयुक्तता ओळखून तिला योग्य प्रकारे हाताळायला हवे. देशाचे भवितव्य हीच युवा पिढी घडविणार आहे. त्यांना मुळीच निराश न करता प्रसंगी एक पाऊल मागे घेऊन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पायउतार करणे हाच यावरील सध्याच्या स्थितीत योग्य उपाय ठरेल. अन्यथा कधी तरी भविष्यात ‘नीट’ परीक्षेचे नाव बदलण्याव्यतिरिक्त या देशात काहीच बदल होणार नाही.

कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले आपल्या ‘तुतारी’ या कवितेत म्हणतात,

जुने जाऊ द्या मरणालागुनी

जाळुनी किंवा पुरुनी टाका

सडत न एक्या ठायी ठाका

सावध! ऐका पुढल्या हाका

या काव्यपंक्तीतून आणि युवा पिढीच्या चळवळीतून सत्ताधिशांनी बोध घेणेच हितावह आहे.

- सचिन खुटवळकर, (लेखक गोवन वार्ताचे वृत्त संपादक अाहेत)