Home >> विचार >> दक्षिण कोकणातील आध्यात्मिक रहस्याच्या शोधात

दक्षिण कोकणातील आध्यात्मिक रहस्याच्या शोधात

वाहणारा झरा आणि वृक्षवेलींच्या देवराईच्या सान्निध्यात अदृश्य रुपाने वावरणारा 'म्हातारबाबा' लोकांच्या मदतीला धावतो; म्हणून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाविक त्याला 'विडी' अर्पण करतात. त्या म्हातारबाबाचा शोध समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय रीतीने लळीत यांनी घेतलेला आहे.

Story: विचारचक्र |
20th July, 10:23 pm
दक्षिण कोकणातील आध्यात्मिक रहस्याच्या शोधात

डॉ. बाळकृष्ण रामचंद्र लळीत यांचे 'दक्षिण कोकणातील आध्यात्मिक रहस्याच्या शोधात' हे पुस्तक वाचनात आले. त्यामुळे गोवा-कोकण  परिसरातील दैवत संकल्पना, त्यांच्याभोवती गुंतलेल्या असंख्य श्रद्धा, देवदेवस्की, प्रचलित लोककथा आणि विश्वास यांचा धांदोळा घेण्याची अपूर्व संधी लाभली. सह्याद्री आणि सागर त्याचप्रमाणे पठारे यांनी युक्त अशा या देवभूमीत पिढ्यानपिढ्यांपासून इथल्या कष्टकरी समाजाने ज्या परंपरा, लोकश्रद्धा यांचे पालन करत जीवन जगले, त्यामागचे जे आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे, त्याचा शोध घेण्याची लेखकाची उर्मी आणि संशोधक दृष्टी यांचे दर्शन या पुस्तकाच्या पानोपानी घडते. मौखिक परंपरेच्या माध्यमातून ज्या गोष्टी आपल्या परिसरातील लोकसमूहांत रूढ आहेत, त्यामागची पार्श्वभूमी जाणून घेण्याची लेखकाची धडपड या पुस्तकाच्या पहिल्या भागात समाविष्ट करण्यात आलेल्या २४ लेखांतून पाहायला मिळते. कोकणातील गावोगावी असणारे देवचारांचे प्रस्थ, त्यांच्या मागे लोकमानसाने जोपासलेले समज, संकेत इथल्या ग्राम संस्कृतीने कसे पाळलेले आणि गावगाडा कसा चालत आलेला आहे, हे अनुभवायला मिळते. 

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत मराठी भाषेतील प्रथितयश लेखक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी लळीत यांच्या लिखाणाला अंधश्रद्धेच्या तागडीत न तोलता, त्यांना गवसलेले सत्य वाचकाने स्वीकारावे. दक्षिण कोकणातील देवदेवस्की, लोकरीती, समज-अपसमज, संचारी अवसर, कौलप्रसाद आपल्या ललित साहित्यांतून शब्दबद्ध केले आहे; ते संशोधक वृत्तीने नसून त्याकडे लोकभ्रम, लोकसंस्कृती, लोकरीती म्हणूनच पाहिले असल्याचे नमूद केलेले आहे. दक्षिण कोकणातील लोक संस्कृतीचा प्रभाव, लळीत यांच्या साहित्यातून प्रतीत झाल्याने, लेखकाने सश्रद्ध मनाने संशोधकीय धांदोळा घेण्याचा जो प्रयत्न केला, त्याची नोंद प्रस्तावनेत घेण्यात आलेली आहे. कर्णिक यांनी समारोपात म्हटलेले आहे त्याप्रमाणे- ''प्रो. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी संशोधनासाठी अलक्षित लोकरीती हाती घेतल्या. कोकणचा रहिवासी आणि ललित लेखक म्हणून मी या लेखनाने माझे काहीसे ज्ञान वाढविले, एक नवी दृष्टीही दिली. त्यामुळे प्रो. लळीत यांचे आभार मानताना, त्यांनी कोकणच्या अद्याप कितीतरी लोकरीती अलक्षित आहेत त्याकडे लक्ष पुरवावे, अशी सदिच्छा प्रगट करतो.'' हे निश्चित लेखक आणि लोक साहित्याचा अभ्यासक म्हणून लळीत यांचा एकाप्रकारे केलेला गौरवच आहे. 

कुडाळजवळील कालेली, दोडामार्गजवळील आडाळी यासारख्या कोकणातल्या निसर्गरम्य आणि देव, देवचार, देवराई आदी संकल्पनांवर विश्वास ठेवत त्यांचे बालपणाचे दिवस रम्य झालेले आहेत. त्या आठवणींचा धांदोळा घेत असताना, लेखकाने आपल्या स्मृतीपटलावर नोंद झालेल्या गोष्टींच्या आधारे, त्यांनी या पुस्तकातील लेखांद्वारे वाचकांना गुंतवून ठेवण्याचे कौशल्य प्रकट केलेले आहे.

बांदा येथे जाण्याच्या वाटेवर असलेल्या मोरगावातील 'म्हातारबाबा', या परिसरातील लोकमानसाचे सांस्कृतिक आणि धार्मिक संचित असून, तेरेखोलची उपनदी असणाऱ्या कडशी नाल्याच्या उगमस्थळी 'म्हातारबाबा' कित्येक पिढ्यांपासून अडलेल्या, नडलेल्या कष्टकऱ्यांच्या हाकेला ओ देत वावरत आहे. वाहणारा झरा आणि वृक्षवेलींच्या देवराईच्या सान्निध्यात अदृश्य रुपाने वावरणारा 'म्हातारबाबा' लोकांच्या मदतीला धावतो; म्हणून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाविक त्याला 'विडी' अर्पण करतात. त्या म्हातारबाबाचा शोध समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय रीतीने लळीत यांनी घेतलेला आहे. 

आडाळी गावातील ग्रामदेवी माऊली, सिद्धाच्या डोंगरावरचा अधिपती सिद्धनाथ त्याचप्रमाणे रायकार, दाट साकळकार, माड्यो, धुळवटकार, काजरेकार, कात्रेकार... आदी देवचारांची गावातील ठिकाणे तसेच 'बारा-पाचाचे' देवस्थान, पिशाचो डोंगर आणि त्यांच्याशी निगडित लोकसंकेत या साऱ्याची माहिती आडाळीच्या गतवैभवाची कल्पना देते. गोवा-मुंबई महामार्गावरील झाराप गावातील भूविज्ञानाची चमत्कृती समजल्या जाणाऱ्या 'पंडुची पाथर', १६० गावांचा 'चाळोबा' आणि त्यांच्याशी निगडित कुडाळी मालवणी बोलीतील बाबासाहेब आंबेडकर यांनी संकलित केलेले गाऱ्हाणे लळीत यांनी प्रकाशित करून, लोकसाहित्याच्या अभ्यासकांना अचंबित करून टाकलेले आहे. १९५२ सालच्या 'जनता' साप्ताहिकाच्या आवृत्तीत प्रकाशित झालेले हे गाऱ्हाणे बाबासाहेबांच्या लोकसाहित्यविषयक 

दृष्टीबाबत वाचकांना अंतर्मुख करते. गोवा-कोकणातील नागपंचमीच्या सणाचे लोकसांस्कृतिक रहस्य शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आरोसीच्या स्वामी सच्चिदाश्रमांच्या कर्तृत्वाचे लेखकाला झालेले लोणार येथील दर्शन अनुभवायला मिळते. योगिराज बापूमामा केणी, सत्पुरुष आनंदमूर्ती यांच्या आध्यात्मिक क्षेत्रातील कार्याची माहिती मिळते. कोकणातील प्राचीन इतिहासाचा वारसा मिरवणाऱ्या कोचरे गावाशी असलेले विजयालक्ष्मी पंडित यांचे नाते, परुळेचे रघुनाथ स्वामी त्याचप्रमाणे सावंतवाडी संस्थानाचे लोकदैवत असणाऱ्या 'उपरलकरा'चा लेखकांनी घेतलेला शोध पाहायला मिळतो. देवी महिषासुरमर्दिनी कोकणातील लोकमानसाची माऊली कशी झाली, त्याचा प्रवास या पुस्तकात आलेला आहे. मालवण जवळच्या न्हिंवे गावातील डोंगरावर असणारी भवानी देवकीमाता म्हणून ओळखली जाते, त्याविषयीची माहिती रंजक पद्धतीने लेखकाने दिलेली आहे. 

लेखकाने नमूद केल्याप्रमाणे -

आपल्याकडे अध्यात्म, रहस्य, देव-धर्म, कुळाचार, संत-महंत, सत्पुरुष, योगी, देवस्थाने, अध्यात्मवादी व त्या क्षेत्रांतील कोणताही संदर्भ आला की, माणसे कुतूहल व्यक्त करतात, तर काहीजण न वाचता कुत्सितपणे मनातल्या मनात किंवा प्रकटपणे काहीतरी बोलून-लिहून मोकळे होतात आणि हे लिहिणाऱ्याने लक्षात घेऊनच आपले लेखन करायला हवे, म्हटले तर हे धाडस आहे, म्हटले तर मी फार पूर्वी कित्येक वर्षांपूर्वी केलेला लेखनसंकल्प आहे.

वाचणाऱ्याचे अंतर्मन नि शरीर हे ज्याच्या त्याच्या संस्कारांचा भाग असल्याने व अनुभूतीचा विषय असल्याने आपण या लेखनावरील विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही. मात्र या पुस्तकातील विचार हे केवळ मी लिहितोय म्हणून माझे असे कृपया कोणीही समजू नये. दुसरे अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, या लेखनामागे समाज वा व्यक्तिमनात अंधश्रद्धा पसरविणे हा हेतू बिलकूल नाही. या लेखनातील बरेच प्रसंग हे मौखिक लोककथा, चरित्रपर लेखन यांच्या आधारे लिहीत आहे व हे 'लोकसाहित्य व लोकजीवना'चा अनुबंध शोधणारे लेखन आहे, याची प्रचिती हे पुस्तक देते.

- राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून पर्यावरणप्रेमी आहेत.) 

मो. ९४२१२४८५४५