Home >> विचार >> सर्वांचा ईश्वर तूच आहेस

सर्वांचा ईश्वर तूच आहेस

आकाशांत ढगांचे थर नष्ट झाल्यावर जसे स्वच्छ सूर्यदर्शन होते, किंवा जसे शेवाळ हाताने दूर केल्यावर स्वच्छ निर्मळ पाणी दिसायला लागते... तसे ज्ञानाच्या आड येणारी जी प्रकृती आहे तिला हे देवा तू दूर सारून तिच्या पलिकडचे परब्रह्म माझ्या बुद्धीला आकळवलंस !

Story: विचारचक्र |
19th July, 10:36 pm
सर्वांचा ईश्वर तूच आहेस

‘आपल्याच गोत्रजांबरोबर रणसंग्राम करणे हे घोर पाप होय’ या माझ्या अहंकारी दुराग्रहाच्या अतिविनाशकारी गर्तेत मी बुडून जात असताना हे श्रीकृष्णा तू मला त्यांतून ओढून बाहेर काढलेस. प्रत्यक्षांत मी स्वत: मायिक, ते गोत्रज मायिक आणि तो रणसंग्रामही मायिक ! असे असूनही मी वेडाखुळा होऊन ते सर्व सत्य मानत होतो ! पण हे विश्वेशा, तू माझे रक्षण केलेस!

लाक्षागृहांत द्रौपदीसकट आम्ही पांचही जण प्रत्यक्ष जळून मरण्याचे महासंकट उद्भवले असतानाही आम्ही त्यांतून सहीसलामत वाचलो खरे. (लाक्षागृह म्हणजे लाखेचं घर. पांडव द्यूतांत हारल्याच्या अटीनुसार बारा वर्षांच्या वनवासात वारणावती नगराजवळील जंगलात वास्तव्यास असताना दुर्योधनाचा मंत्री पुरोचन याने बांधलेल्या लाक्षागृहांत रहात होते. खरे तर लाख विस्तव लागताच वेगाने फरफरत जळून जाते ! तेव्हा पांडवांना ती शक्यता जाणवली नसावी.  दुर्योधनाने ते घर कपटाने जाळण्याचा घाट घातला ! परंतु विदुरामार्फत ही गुप्त बातमी पांडवांना वेळीच समजून आल्याने ते 

त्या घरांतील विवर मार्गाने सुखरूप बाहेर पडले !).

तिथे संपूर्ण देहनाशाचा प्रसंग होता

पण आत्ता इथे या रणांगणांत तर चैतन्यासकट सर्वस्वाचाच घात होऊ घातला होता ! त्यांतून तू मला वाचवलंस.

पूर्वी दुराग्रहरूपी हिरण्याक्ष दैत्याने असत्याचा पक्ष घेऊन पृथ्वीला, बुद्धीरूपी वसुंधरेला मोहसागराच्या तळी लपवले होते, तेव्हा जसे तू वराह अवतार घेऊन पृथ्वीला वाचवलेस तसा हा दुसरा वराहावतार तुला माझ्यासाठी घ्यावा लागलेला दिसतोय !

(हिरण्याक्ष हा हिरण्यकशिपूचा भाऊ. त्याने पृथ्वी रसातळाला नेली. पृथ्वीला खाकोटीस मारून हा पाताळात हाटकेश्वरापर्यंत गेला. त्यावेळी भगवंतांनी वराहावतार धारण करून पृथ्वीला आपल्या दाढेवर धरून वर काढले व तिचे रक्षण केले व हिरण्याक्षाला ठार केले.)

तुझ्या सामर्थ्यामुळे माझी (भरकटलेली) बुद्धी पुन्हा मूळ जागी आली ! असे हे तुझे अपार उपकार या एका तोंडाने किती वर्णूं ? हे प्रेमसिंधो, माझ्यावरील प्रेमाखातिर तू तुझे पंच-प्राण माझ्या स्वाधीन केलेस!

हे देवराया ते तुझे नि:सीम प्रेम वाया मुळीच गेले नाही. उलट त्या प्रेमाला चांगले यश प्राप्त झालेय ! तुझ्या या प्रेम-प्रसादामुळेच, हे प्राणसख्या, माझा सगळा मोह नष्ट झाला. तू म्हणजे दिव्य आनंदाच्या सरोवरातले जणू एक सु-निर्मळ पुण्डरीकच ! (पुण्डरीक म्हणजे कमळ).

सतेज कोमल अशी जी तुझी दृष्टी तिच्या कृपेची वृष्टी ज्याच्यावर करील त्याच्यापुढे माया-मोह काय दिवे लावतील ? त्याच्यापुढे माया-मोहाचा प्रभाव सर्वथैव तुच्छच होय !

जो समुद्रात असूनही विझत नाही त्या वडवाग्निपुढे मृग-जळाची वृष्टि ती काय ? क:पदार्थासारखी तुच्छच ती ! त्याप्रमाणे तुझ्यासमोर भव-भय-भ्रांतिची दयनीय स्थिती आहे. तुझ्या कृपेच्या गाभाऱ्यांत शिरून मी स्वानंदाचा चारा यथेच्छ चरतोय ! तेव्हा अशा परिस्थितीत जर माझा मायामोह नष्ट झाला असेल तर त्यात आश्चर्य ते काय ?

तुझ्या पायांची शपथ घेऊन सांगतो की तुझ्यामुळे माझा खराखुरा उद्धार झालेला आहे.

भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया।

त्वत्त: कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ।।२।।

सरळ अर्थ :  कारण हे कमलनेत्रा, मी भूतांची उत्पत्ति व प्रलय आपल्याकडून विस्तारपूर्वक ऐकिली. तसेच आपला अविनाशी प्रभावही ऐकिला आहे.

विस्तृत विवेचन :  अर्जुन म्हणतोय हे देवांच्या देवा, तुझे विशाल नयन कमळासारखे विराजतायत्. कोटी सूर्यांसारखे तुझे तेज दीव्य आहे आणि माझ्या पूर्वसुकृताचे फळ म्हणून की काय, तूच आज मला भूतांची (म्हणजे जे जे काही अस्तित्वांत असलेले म्हणून दिसतेय ते ते सर्व) उत्पत्ती कशी होते आणि मग ती लयास कशी जातात याचा बोध केलास.  तसेच तू मला प्रकृतीचे परिपूर्ण विवेचन करून दाखवलेस ! प्रकृतीचे दाखले देऊन पुरुष तत्व म्हणजे काय ह्याचा निवाडा, निर्णय करून दाखवलास (सांख्य शास्त्रांत प्रकृती व पुरुष अशी दोन तत्वे स्वयंभू व अनादि आहेत असे सांगितले आहे. प्रकृती व तिचे विकार मिळून होणारी चोवीस तत्वे आहेत आणि या सर्वांचा द्रष्टा, भोक्ता, साक्षी असा जो आत्मा तो पुरुष असे सांख्य शास्त्र म्हणते. सांख्यशास्त्राने केलेले पुरुषाचे वर्णन आत्मा ह्या शब्दाने ज्याचे वर्णन केले जाते त्याचेच आहे. सांख्यशास्त्राप्रमाणे पुरुष अनंत आहेत तर वेदान्तशास्त्रांत आत्मा अनेकत्वाने भासत असला तरी एकच आहे असे सांगितले आहे).

त्याच पुरुषाचे यश पांघरून शब्दब्रह्म नटले ! त्या शब्दब्रह्माचा उत्कर्ष होऊन त्याला जीवन लाभून मग त्याच्यामधून धर्म नांवाचे रत्न प्रसवले आणि त्याच पुरुषाचा आश्रय घेतल्याने आज मला हे सगळे श्रेय लाभलेय!

हे स्वानुभवरम्य असे तुझे अगाध माहात्म्य आहे ! उपलब्ध अशा सर्व मार्गांनी जाणण्यायोग्य असा हाच एक विषय या जगांत आहे. आणि नेमकं तेच, हे जगत्पते, तू मला आज अगदी सहज अशारीतीने दाखवून दिलेस. आकाशांत ढगांचे थर नष्ट झाल्यावर जसे स्वच्छ सूर्यदर्शन होते, किंवा जसे शेवाळ हाताने दूर केल्यावर स्वच्छ निर्मळ पाणी दिसायला लागते, किंवा सर्पाचे वेढे दूर झाल्यावर जसे चंदन दिसायला लागते, किंवा पिशाच्च पळून गेल्यावर जशी द्रव्य-राशि हस्तगत होते तशी ज्ञानाच्या आड येणारी जी प्रकृती आहे तिला हे देवा तू दूर सारून तिच्या पलिकडचे परब्रह्म माझ्या बुद्धीला आकळवलंस ! म्हणून एक आणि एकच असा सर्वांचा ईश्वर तूच आहेस असा  आता या (माझ्या) जिवाचा निर्धार झालेला आहे.
क्रमशः

- मिलिंद कारखानीस, (लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.), मो. ९४२३८८९७६३