Home >> विचार >> जमावाच्या निशाण्यावर आसाम रायफल्स

जमावाच्या निशाण्यावर आसाम रायफल्स

Story: राज्यरंग |
16th July, 11:22 pm
जमावाच्या निशाण्यावर आसाम रायफल्स

मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या घटनेने ईशान्य भारतातील सुरक्षा परिस्थिती पुन्हा एकदा चर्चेत आणली आहे. आसाम रायफल्सने माकुइलोंगडी परिसरात शोधमोहीम राबवल्यानंतर काही तासांतच संतप्त जमावाने त्यांच्या छावणीवर हल्ला चढवला. दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोडीत जवानांची तीन वाहने पेटवून देण्यात आली

आसाम रायफल्सची ही कारवाई एनएससीएन (आयएम) अर्थात नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालिम-इसाक मुईवाह या सशस्त्र बंडखोर संघटनेच्या कथित सशस्त्र कार्यकर्त्यांचा शोध घेण्यासाठी होती. गुप्तचर माहितीनुसार काही कार्यकर्ते शस्त्रे व गणवेशासह अधिकृत छावणीबाहेर फिरत होते. हे शस्त्रसंधीच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते. त्यामुळे सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम हाती घेतली.

एनएससीएन (आयएम) ही स्वतंत्र ‘नागालिम’च्या मागणीसाठी अनेक दशकांपासून सक्रिय असलेली संघटना आहे. नागाबहुल भागांमध्ये या संघटनेला काही प्रमाणात सामाजिक व राजकीय पाठिंबा असल्याचे मानले जाते. त्यामुळे सुरक्षा दलांच्या कारवायांबाबत स्थानिक समाजातील काही घटक संवेदनशील भूमिका घेतात. हल्ला करणारा जमाव नेमका कोणाचा होता, याबाबत अधिकृतरीत्या स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. मात्र शोधमोहिमेचा निषेध करण्यासाठी स्थानिक नागरिकांचा मोठा समूह एकत्र आल्याचे वृत्त आहे. या जमावाने छावणीवर दगडफेक केली, वाहनांची तोडफोड केली आणि जाळपोळ केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. मध्यरात्री परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. या संघर्षात जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईदरम्यान मोठा पोलीस फौजफाटा तैनात केल्याची माहिती सोशल मीडियावरून पसरली होती; मात्र स्थानिक पोलिसांच्या मदतीने कमीत कमी पोलीस बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशेष म्हणजे, हा एकाकी प्रकार नव्हता. गेल्या दहा दिवसांत आसाम रायफल्सवर झालेला हा तिसरा हल्ला होता. यावरून मणिपूरमधील तणावपूर्ण वातावरण आणि सुरक्षा दलांविरोधातील काही भागांतील असंतोष अधोरेखित होतो. अशा घटनांनंतर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जातात आणि चौकशी सुरू होते. तथापि, जमावातील व्यक्तींची ओळख पटविणे आणि त्यांच्यावर प्रभावी कारवाई करणे हे अनेकदा कठीण ठरते. त्यामुळे अनेक प्रकरणांत तपास दीर्घकाळ सुरू राहतो. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केवळ सुरक्षा कारवाया नव्हे, तर स्थानिक समाजाचा विश्वास जिंकणे आणि बंडखोर प्रश्नावर दीर्घकालीन राजकीय तोडगा काढणेही तितकेच आवश्यक असल्याचे या घटनेने पुन्हा स्पष्ट केले आहे.

- प्रदीप जोशी