
भारतात आपण अनेकदा महान व्यक्तींचा गौरव करतो. त्यांच्या जयंती, पुण्यतिथी साजऱ्या करतो, भाषणे करतो, घोषणाही देतो. परंतु जेव्हा एखादा जिवंत संशोधक, वैज्ञानिक, शिक्षक किंवा समाजासाठी आयुष्य वाहून घेतलेली व्यक्ती आपल्या हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने उपोषणाला बसते, तेव्हा समाज आणि व्यवस्था दोघांचीही खरी परीक्षा सुरू होते.
लडाखचे सुप्रसिद्ध अभियंता, शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरणवादी आणि संशोधक सोनम वांगचुक हे असेच एक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. कठीण हिमालयीन प्रदेशात शिक्षणाची नवी दिशा देणे, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित करणे, "आइस स्तूप"सारखा जगप्रसिद्ध जलसंधारणाचा अभिनव प्रयोग करणे, हवामान बदलाच्या संकटावर उपाय सुचवणे आणि स्थानिक समाजाच्या विकासासाठी सातत्याने कार्य करणे, ही त्यांची मोठी देणगी आहे.
संपूर्ण जगाने त्यांच्या कार्याचा गौरव केला. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांचा सन्मान केला. भारतातील लाखो युवक त्यांना प्रेरणास्थान मानतात. विशेष म्हणजे, लोकप्रिय "थ्री इडियट्स" या चित्रपटातील फुन्सुख वांगडू या व्यक्तिरेखेची प्रेरणा मोठ्या प्रमाणावर सोनम वांगचुक यांच्या जीवनकार्यावर आधारित असल्याचे व्यापकपणे मानले जाते. या चित्रपटाने संपूर्ण जगाला शिक्षणाचा खरा अर्थ, नवकल्पना आणि सर्जनशील विचारांची ताकद दाखवली. त्यामुळे करोडो भारतीय प्रथमच सोनम वांगचुक यांच्याविषयी जाणून घेऊ लागले.
आज आपण वापरत असलेल्या अनेक आधुनिक सुविधा, तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक प्रगती या कोणत्या ना कोणत्या संशोधकांच्या अथक परिश्रमांचे फळ आहेत. समाज त्याचा लाभ घेतो, सरकार त्याचा उपयोग करते; पण अशा संशोधकांच्या वेदना, संघर्ष आणि मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर तो केवळ एका व्यक्तीचा अपमान राहत नाही, तर ज्ञान, विज्ञान आणि नवसर्जनाच्या मूल्यांचाही अपमान ठरतो.
मग प्रश्न उपस्थित होतो- जगभरात भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अशा व्यक्तीला स्वतःच्या देशात आपल्या मागण्यांसाठी उपोषण करावे लागते, ही शोकांतिका नाही का? सरकारने त्यांच्या प्रत्येक मागणीशी सहमत असणे आवश्यक नाही; परंतु त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या कार्याचा सन्मान राखणे आणि त्यांच्या चिंता गांभीर्याने ऐकणे, हे लोकशाहीचे कर्तव्य आहे.
देशाची खरी संपत्ती केवळ खनिजे, उद्योग किंवा इमारती नसतात. देशाची खरी संपत्ती म्हणजे त्याचे विचारवंत, वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक आणि नवकल्पना करणारे तरुण. अशा व्यक्तींना जर योग्य सन्मान, प्रोत्साहन आणि संवेदनशील वागणूक मिळाली नाही, तर भविष्यातील अनेक प्रतिभावान युवक संशोधनापासून दूर जातील. त्याचे नुकसान संपूर्ण राष्ट्राला भोगावे लागेल.
आज दिल्लीत जंतर-मंतरवर देशभरातून विद्यार्थी येत आहेत. ते केवळ एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठी येत नाहीत; तर ते प्रश्न विचारायला, लोकशाही समजून घ्यायला आणि उत्तरांचा शोध घ्यायला येत आहेत. हे चित्र भारताच्या जागृत युवा पिढीचे आहे. ही पिढी केवळ "मन की बात" ऐकू इच्छित नाही; तर स्वतःच्या मनातील प्रश्नही मांडू इच्छिते.
लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात, पण संवाद बंद होता कामा नये. संशोधकांचा आवाज ऐकला गेला पाहिजे. कारण विज्ञान, संशोधन आणि नवकल्पना यांच्यावरच उद्याचा भारत उभा राहणार आहे.
आज गरज आहे ती व्यक्तिपूजेपेक्षा विचारपूजेची, अंधश्रद्धेपेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोनाची आणि घोषणांपेक्षा संशोधकांना प्रत्यक्ष पाठबळ देण्याची.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश आजही तितकाच समर्पक वाटतो- "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा." ज्ञानाचा, संशोधनाचा आणि सत्याचा मार्ग स्वीकारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करणे, हीच एका प्रगत आणि सुसंस्कृत राष्ट्राची खरी ओळख असते.
- अॅड. शिवाजी य. देसाई, ब्रह्मा करमळी - सत्तरी