Home >> विचार >> काम धोकादायक, मग गलथानपणा कसा चालेल?

काम धोकादायक, मग गलथानपणा कसा चालेल?

Story: अंतरंग - गोवा |
12th July, 11:51 pm
काम धोकादायक, मग गलथानपणा कसा चालेल?

अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या तीन गोष्टींशिवाय कोणतीही व्यक्ती जगू शकत नाही. आज या तीन गोष्टींशिवाय इतर अनेक गोष्टी गरजेच्या बनल्या आहेत. मानवाची व समाजाची जसजशी प्रगती होत आहे, तसतशा त्याच्या गरजा वाढत आहेत. रस्ता, वीज, वाहन, मोबाईल आणि आता इंटरनेट या सर्व गोष्टी आवश्यक बनल्या आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन अधिक सोपे व सुसह्य बनले आहे, परंतु यामुळे मानवी गरजा वाढण्यासही मदत झाली. टीव्ही, रेफ्रिजरेटर, संगणक ही सर्व उपकरणे चालण्यासाठी सुरळीत वीजपुरवठ्याची आवश्यकता असते. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीज अभियंते, लाईनमन व इतर कर्मचाऱ्यांना विनाव्यत्यय काम करावे लागते. वीजपुरवठा सुरळीत आणि अखंडित ठेवण्यासाठी बऱ्याच समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो. वेळी-अवेळी काम करावे लागते. बऱ्याच वेळेला खांबावर चढून दुरुस्तीचे काम करावे लागते, तर काही वेळा भर पावसात झाडांच्या फांद्या छाटाव्या लागतात. यामुळे लाईनमन वा इतर कर्मचाऱ्यांचे काम जोखमीचे व धोकादायक असते. काम करताना विजेचा शॉक लागला तर जीव गमावण्याची पाळी त्यांच्यावर येते. वीज वितरणासाठी ११ केव्ही, ३३ केव्ही वीजवाहिन्या असतात. या वाहिन्यांवर काम करणे अत्यंत धोकादायक असते. कामाचा भाग म्हणून आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी लाईनमनना ही जोखीम पत्करावीच लागते. 

दोन दिवसांपूर्वी वीजवाहिनी बाजूच्या फांद्या छाटताना विजेचा शॉक लागून एका लाईनमनचा मृत्यू झाला. ही घटना अस्नोड्यात घडली. या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व दुःख व्यक्त होत आहे. विजेचा शॉक लागून लाईनमनचा मृत्यू होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी होंडा येथे आणि त्यापूर्वी डिचोलीत शॉक लागून लाईनमनला मरण येण्याच्या घटना घडलेल्या आहेत. वर्षाला एक-दोन लाईनमनचे शॉक लागून मृत्यू होणे, हा गंभीर प्रकार आहे. याकडे गांभीर्याने पाहून उपाययोजना आखण्याची गरज आहे. 

भरतीवेळी लाईनमनना कामांबरोबर स्वतःच्या सुरक्षेविषयी प्रशिक्षण दिले जाते. हँडग्लव्हज, टेस्टरसह इतर आवश्यक सुरक्षा उपकरणे दिली जातात. परंतु, बऱ्याच वेळेला लाईनमनकडून सुरक्षेची उपकरणे वापरली जात नाहीत. तसेच काम करण्यापूर्वी योग्य ठिकाणी वीजपुरवठा बंद केला जात नाही. काही वेळा वीजपुरवठा सुरू असतानाच लाईनमन दुरुस्तीकाम करतात. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी लाईनमन व इतर कर्मचाऱ्यांना नियमितपणे सुरक्षाविषयक धडे देण्याबरोबर त्यांचे समुपदेशन करण्याची गरज आहे. वीजवाहिन्यांवर काम करताना कोणती विशेष काळजी घ्यावी लागते, याबाबत त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

- गणेश जावडेकर