आधुनिक राजकारण ही वेग, निर्णयक्षमता, संघटन, संसाधने आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यांची शर्यत बनली आहे. जो पक्ष काळाची पावले ओळखतो, तोच पुढे जातो. जो केवळ प्रतिस्पर्ध्याच्या चुका होण्याची वाट पाहतो, तो मागे पडतो.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधील काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे. हा निर्णय केवळ एका पक्षापुरता मर्यादित नाही; तर देशातील बदलत्या राजकीय संस्कृतीचे प्रतीक मानला जात आहे. यामागे भाजपची राजकीय रणनीती स्पष्ट दिसते. विरोधी पक्षातील प्रभावी चेहरे आपल्या गोटात आणणे, त्यांना त्वरित राजकीय सन्मान देणे आणि त्याद्वारे विरोधकांची ताकद कमी करणे, ही नीती अनेक राज्यांत वापरली गेली आहे. पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा अशा अनेक राज्यांत विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यापैकी अनेकांना मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या. 'ससा आणि कासव' या गोष्टीत संयम, चिकाटी आणि सातत्याचा विजय दाखवला जातो. पण आजच्या राजकारणात हे सूत्र तंतोतंत लागू पडतेच असे नाही. आधुनिक राजकारण ही वेग, निर्णयक्षमता, संघटन, संसाधने आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यांची शर्यत बनली आहे. जो पक्ष काळाची पावले ओळखतो, तोच पुढे जातो. जो केवळ प्रतिस्पर्ध्याच्या चुका होण्याची वाट पाहतो, तो मागे पडतो. आज देशाच्या राजकारणात विरोधकांची स्थिती काहीशी अशीच दिसते. सत्ताधारी पक्ष सतत निवडणुकीच्या मोहिमेत राहतो, संघटन विस्तारतो, नवे चेहरे पुढे आणतो, विरोधी पक्षातील प्रभावी नेत्यांना आपल्या गोटात घेतो आणि राजकीय अजेंडा स्वतः ठरवतो. त्याउलट अनेक विरोधी पक्ष अजूनही अंतर्गत मतभेद, नेतृत्वाचा प्रश्न आणि परस्पर अविश्वास यात अडकलेले दिसतात. भारतीय राजकारणाचा वेग गेल्या काही वर्षांत प्रचंड बदलला आहे. पूर्वी एखाद्या नेत्याला पक्षात स्थान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे पक्षसंघटनेत काम करावे लागे. आज मात्र समीकरणे एका रात्रीत बदलतात. विरोधी पक्षातील प्रभावी नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करतात आणि काही दिवसांतच त्यांना राज्यसभा, मंत्रीपद किंवा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतात. त्यामुळे राजकीय निष्ठेपेक्षा राजकीय उपयुक्तता अधिक महत्त्वाची ठरत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
ठळक उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाल्यानंतर मंत्रीपदे किंवा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या. आसाममध्ये काँग्रेसमधून आलेल्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले. पश्चिम बंगालमध्येही तृणमूलमधून आलेल्या अनेक नेत्यांना पक्षसंघटनेत मोठी भूमिका देण्यात आली. या सर्व घटनांमधून एकच संदेश जातो की, भाजप राजकीय संधी पटकन ओळखतो आणि त्याचा वेगाने उपयोग करतो. याउलट विरोधी पक्ष मात्र अनेकदा निर्णयप्रक्रियेत संथ दिसतात. एखादा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती असूनही त्याला थांबवण्यात अपयश येते. अंतर्गत मतभेद, नेतृत्वाचा अभाव, निर्णय घेण्यास होणारा विलंब आणि संघटनात्मक कमकुवतपणा यामुळे विरोधकांची पिछेहाट होत असल्याचे चित्र आहे. मात्र, या रणनीतीचे दुसरेही एक वास्तव आहे. अनेक वर्षे पक्षासाठी संघर्ष करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांत नाराजी निर्माण होण्याची शक्यता असते. अचानक बाहेरून आलेल्या नेत्याला राज्यसभा किंवा मोठे पद मिळाल्यास निष्ठावान कार्यकर्त्यांना अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे पक्षविस्तार आणि कार्यकर्त्यांचा विश्वास यात संतुलन राखणे कोणत्याही पक्षासाठी तितकेच महत्त्वाचे ठरते.
भारतीय राजकारण आता विचारसरणीपेक्षा निवडणूक जिंकण्याच्या गणिताभोवती अधिक फिरत असल्याचे चित्र दिसते. कोणता नेता किती मते आणू शकतो, कोणत्या समाजघटकावर त्याचा प्रभाव आहे आणि त्याचा विरोधकांना किती फटका बसेल, यावरच अनेक निर्णय घेतले जातात. केवळ सरकारवर टीका करून चालणार नाही; तर सक्षम नेतृत्व, मजबूत संघटना, कार्यकर्त्यांचा विश्वास आणि निर्णयक्षम राजकारण उभे करावे लागेल. अन्यथा सत्ताधारी पक्ष विरोधकांतील प्रभावी चेहरे आपल्या गोटात घेत राहील आणि विरोधकांची राजकीय ताकद आणखी कमी होत जाईल. राजकारणात केवळ सरकारवर टीका करून पर्याय निर्माण होत नाही. जनतेसमोर विश्वासार्ह नेतृत्व, स्पष्ट धोरणे आणि प्रभावी संघटन उभे करावे लागते. विरोधकांकडे प्रश्न आहेत, पण अनेकदा उत्तरांची मांडणी कमकुवत दिसते. त्यामुळे जनतेला पर्याय दिसत नाही. लोकशाहीसाठी सक्षम विरोधी पक्ष तितकाच आवश्यक असतो जितके सक्षम सरकार. सत्तेला प्रश्न विचारणे, धोरणांवर विधायक टीका करणे आणि पर्यायी विचार मांडणे ही विरोधकांची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र, त्यासाठी स्वतःची ताकद वाढवावी लागते; राजकीय शर्यतीत कासव जिंकतोच असे नाही. कधी कधी वेगवान, संघटित आणि सतत सक्रिय असलेलाच अंतिम विजय मिळवतो. विरोधकांनी वेळेत आत्मपरीक्षण केले नाही, तर ते केवळ शर्यतीत मागेच पडणार नाहीत, तर जनतेच्या मनातूनही दूर
जाऊ शकतात.