केंद्रीय खात्यांच्या, लष्कराच्या नोकरभरतीतच नव्हे, तर केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या परीक्षांमध्येही गोमंतकीयांचा सहभाग नगण्य असतो. पूर्वी राज्याच्या नागरी सेवेसाठीही उमेदवार मोजकेच यायचे. त्याबाबत आता जागृती होत आहे. आता एखाद्या पदासाठी गोव्यातून हजारो अर्ज येतात. केंद्रीय खात्यांच्या भरतीसाठीही अशाच प्रकारे गोव्यातील तरुणांनी उत्साह दाखवायला हवा.

गोव्यातील तरुणांनी फक्त गोव्यातच नोकरी मिळवण्याच्या हेतूने प्रयत्न न करता, केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये, संस्थांमध्ये तसेच भारतीय स्थलसेना, हवाईदल किंवा नौदलात भरती होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी राज्य सरकारने २०१२ मध्ये एक योजनाही आखली होती. भारतीय लष्करात उच्च पदांवर भरती होणाऱ्यांना एक लाख रुपये, त्याखालील पदांवर भरती होणाऱ्यांना ५० हजार रुपये, तर जवान म्हणून भरती झाल्यास २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची योजना तयार केली होती. पण त्यानंतरही गोव्यातून मोठ्या प्रमाणात युवक भारतीय लष्करात भरती झाल्याचे चित्र पाहायला मिळाले नाही. ही निराशाजनक स्थिती गोव्यात आहे. आता होत असलेल्या 'अग्निवीर' भरतीतही गोव्यातील तरुण पुढाकार घेतात, पण त्यातील बहुतेकजण हे शेवटच्या टप्प्यात भरती प्रक्रियेतून बाहेर पडतात. गोव्यात लष्कर भरतीसाठी थोडीशी निराशाजनक स्थिती असली तरीही गोव्याच्या पोलीस दलात भरतीसाठी हजारो तरुण येतात. ती संख्या लष्कराच्या भरतीवेळी दिसत नाही. तिथे क्वचितच कोणीतरी गोमंतकीय दिसेल. जेवढ्या मोठ्या प्रमाणात गोवा पोलीस दलाच्या भरतीसाठी युवक पुढे येतात तेवढ्या प्रमाणात लष्कर भरतीवेळी का येत नाहीत, असा प्रश्न पडतो. शासकीय स्तरावरही मोठ्या प्रमाणात जागृती होत नाही, त्यामुळे गोव्यातील युवक कदाचित भारतीय सैन्यदल, नौदल आणि हवाईदलाच्या भरतीपासून दूर राहतात. या भरतींकडे लक्ष दिले तर गोव्यातील तरुणांना भारतीय सैन्यात संधी मिळू शकते. त्यासाठी गोव्यात खास प्रशिक्षण शिबिरे घेण्यावरही सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी एखाद्या सरकारी खात्याला जबाबदारी दिली, तर राज्यातून भारतीय सैन्यात भरती होणाऱ्यांचा आकडा अनेक पटीने वाढू शकतो.
सादोळशे-काणकोणची अभिदा बार्रेटो ही पुणे येथील सैन्यदलाच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण करून कमिशनड लेफ्टनंट म्हणून नियुक्त झाली आहे. गोव्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी सत्तरीतील डॉ. पंकज गांवकर हेही कॅप्टन म्हणून भरती झाले होते. भारतीय सैन्यात पूर्वीपासून अनेक गोमंतकीयांनी मोठ्या पदांवर सेवा बजावली आहे. द्वितीय विश्वयुद्ध, भारत-पाक युद्धाच्या काळात सेवा बजावलेले मेजर जनरल युस्टेस डिसोझा यांच्यापासून ते आर्मी स्टाफचे चीफ राहिलेले जनरल सुनिथ रॉड्रिग्ज, लष्कराचे उपप्रमुख राहिलेले लेफ्टनंट जनरल स्टॅनली मिनेझिस, आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल एरिक वाझ, लेफ्टनंट जनरल वॉल्टर पिंटो अशा अनेकांनी देशसेवेसाठी लष्करात मोठ्या पदांवर सेवा दिली आहे. ही यादी पुढे वाढत गेली. रविवारच्या अंकात 'सलाम फौजी' नावाच्या सदरात 'गोवन वार्ता'मध्ये लष्करात सेवा बजावलेल्या गोमंतकीयांचा परिचय दिला जातो. ती यादी पाहिली तर भारतीय लष्करात पूर्वी अनेक गोमंतकीयांनी सेवा बजावलेली आहे. पण ही यादी आता पुढे जात आहे का, तो प्रश्न मात्र सर्वांनीच स्वतःला विचारायला हवा. आज काही ध्येयवेडे युवक भारतीय लष्करात भरती होण्यासाठी जातात, पण त्यांची संख्या अगदीच कमी असते. गोव्यातील बहुतांश युवक लष्करातील भरतीकडे पाठ का फिरवतात, हा मोठा प्रश्न आहे. लष्करातील भरतीबाबत शासकीय स्तरावर जागृती का होत नाही? पालक आपल्या मुलांना भारतीय सैन्यात का पाठवत नाहीत? असे अनेक प्रश्न गोव्यातील तरुणांविषयी निर्माण होतात. नोकरी नाही म्हणून सरकारच्या नावाने बोटे मोडणारे तरुण, सैन्याच्या भरतीवेळी तिथे का फिरकत नाहीत? हा प्रश्न विचारण्यासारखा आहे.
आमदार नोकरी देईल, राज्याच्या सरकारी खात्यातच नोकरी मिळेल असा आत्मविश्वास असलेल्या युवकांचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यात लष्करातील भरतीसह केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये होणाऱ्या नोकरभरतीबाबत जागृती व्हायला हवी. राष्ट्रीय बँका, रेल्वे, पोस्ट अशा अनेक ठिकाणी नोकरभरती होते तेव्हा गोव्यातील तरुण त्याकडे लक्ष देत नाहीत. दुसऱ्या राज्यात राहावे लागेल, प्रवास करावा लागेल, लष्करात गेल्यास दूरच्या ठिकाणी सेवा द्यावी लागेल अशा गोष्टींमुळे तरुण अशा नोकऱ्यांपासून दूर राहत असतील, तर ही चिंतेची बाब आहे. अशाने रोजगाराचे प्रश्न मिटणार नाहीत. गोव्यातील तरुणांना सैन्यासह इतर केंद्रीय खात्यांतील भरतीमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. केंद्रीय खात्यांच्या, लष्कराच्या नोकरभरतीतच नव्हे, तर केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या परीक्षांमध्येही गोमंतकीयांचा सहभाग नगण्य असतो. पूर्वी राज्याच्या नागरी सेवेसाठीही उमेदवार मोजकेच यायचे. त्याबाबत आता जागृती होत आहे. आता एखाद्या पदासाठी गोव्यातून हजारो अर्ज येतात. केंद्रीय खात्यांच्या भरतीसाठीही अशाच प्रकारे गोव्यातील तरुणांनी उत्साह दाखवायला हवा.