Home >> विचार >> गोव्यावर घोंघावतेय पाणी संकट!

गोव्यावर घोंघावतेय पाणी संकट!

जलाशयांमध्ये आता जरी पाणीसाठा चांगल्या प्रमाणात असला, तरीही सरासरीपेक्षा तिथे पाऊस कमी पडल्यास पाण्याचे मोठे संकट उभे राहू शकते. पुढील संकटे टाळण्यासाठी राज्याने तयारी करावी लागेल. पाऊस कमी होणे याचा परिणाम फक्त पाणी पुरवठ्यावरच नव्हे तर शेती, भाजीपाला आणि अन्य पिकांवरही दिसणार आहे.

Story: संपादकीय |
14th July, 11:59 pm
गोव्यावर घोंघावतेय पाणी संकट!

गेल्या वर्षी गोव्यात मे महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत २५ इंच पाऊस पडला होता. त्यानंतर जून ते सप्टेंबर महिन्यांत सरासरी सुमारे ११५ इंचांपर्यंत पाऊस झाला. त्यात मे महिन्यात पडलेला २५ इंच पाऊस धरला, तरीही गेल्या वर्षी गोव्यात एकूण १४० इंच पाऊस कोसळला होता, हे महत्त्वाचे आहे. हे आकडे पाहिले तर यंदा जून महिन्यापासूनच पाऊस कमी असूनही गोव्यात पाण्याचे संकट निर्माण होता होता टळले. गेल्या वर्षी पडलेल्या चांगल्या पावसामुळे यंदा गोव्यावर पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट आले नाही. तरीही गोव्यात प्रशासनाने खाणींच्या खंदकांमधून आणि नद्यांमधून जलशुद्धीकरण प्रकल्पांपर्यंत पाणी नेण्याची योजना तयार केली होती. आता ही योजना पुढच्या वर्षी अमलात आणावी लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. 

गेल्या वर्षी २० ते २९ मे या कालावधीत तब्बल २५ इंच पाऊस पडला होता. मान्सूनही २५ मेच्या दरम्यान दाखल झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षी गोव्यात जो पाऊस पडला होता, त्याच पुण्याईने यंदा पाण्याची टंचाई टळली. अन्यथा यंदा गोव्यात पाण्यासाठी लोकांचे हाल झाले असते. तसे चित्र गोव्यात निर्माण झाले होते, पण जून महिन्यात काही प्रमाणात पडलेल्या पावसामुळे स्थिती पूर्वपदावर आली. आतापर्यंत गोव्यात ३५ इंच पाऊस झाला आहे. जो पाऊस गेल्या वर्षी ५० इंचाच्या पार गेला होता, तो यावेळी अद्याप ३५ इंचापर्यंत येऊन अडकला आहे. गेल्या वर्षी १४ जुलैपर्यंत झालेला ५० इंच पाऊस आणि त्यापूर्वी मे महिन्यात झालेला २५ इंच पाऊस धरला, तर आजच्या तारखेपर्यंत ७५ इंचांचा टप्पा पावसाने गाठला होता. यंदा स्कायमेट आणि भारतीय वेधशाळेनेही देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. तो अंदाज या वर्षी खरा ठरत आहे, असे दिसत आहे. पण त्याही पेक्षा गोव्यात कमी पाऊस होईल का, अशी चिंता आहे. कारण आतापर्यंत झालेली पावसाची नोंद ही गेल्या काही वर्षांपेक्षा कमी आणि चिंताजनक आहे. 

गोव्यात स्थिती वेगळीच आहे. गोव्यात जुलै महिन्यातील तापमान ३३.५ अंश सेल्सियस होते, जे गेल्या ६२ वर्षांमधील सर्वाधिक होते. हे चित्र पाहता शेतीवर याचे मोठे परिणाम दिसू शकतात. पाऊस उशिरा आल्यानंतर शेतीची कामे सुरू झाली होती, पण आता पाऊस काही दिवस गायब आहे. गेल्या दहा दिवसांत फक्त सहा इंच पाऊस पडला आहे. ही स्थिती अशीच राहिली, तर शेतीची कामे खोळंबतील आणि यंदा शेतीच्या उत्पादनावरही गंभीर परिणाम दिसू लागतील. शेतीला पूरक असा पाऊस पडण्याची गरज आहे. जून महिन्याच्या अखेरपासून ऑगस्टच्या अखेरपर्यंत गोव्यात चांगला पाऊस पडतो. मात्र, यावेळी गेल्या दीड महिन्यात सरासरी फक्त ३५ इंच पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे, गोव्याच्या ग्रामीण आणि डोंगराळ भागात जिथे पाऊस जास्त पडणे अपेक्षित आहे, तिथेही पावसाने दडी मारली आहे. धारबांदोडा, सत्तरी, सांगे आणि केपे या ग्रामीण भागांतील तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण गेल्या वर्षापेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी कमी आहे. धारबांदोड्यात गेल्या वर्षी १ जून ते १४ जुलैपर्यंतच ८२ इंच पावसाची नोंद झाली होती. यावर्षी तिथे फक्त ४३ इंच पाऊस पडला आहे. सांगे भागात गेल्या वर्षी आतापर्यंत ७१ इंच पाऊस होता. यावर्षी तिथे आतापर्यंत ४० इंच पावसाची नोंद झाली आहे. केपेत ६४ इंच पाऊस होता, तिथे आता ३६ इंचांपर्यंत पाऊस पोहोचला आहे. धरण प्रकल्प असलेल्या भागांत पावसाची ही स्थिती असल्यामुळे पाण्याची या वर्षीपेक्षा गंभीर स्थिती पुढच्या वर्षी दिसू शकेल. त्यासाठी राज्याने आतापासूनच तयारीला लागण्याची गरज आहे. जुलैचे पुढचे १५ दिवस आणि ऑगस्टमध्ये पावसाने तूट भरून काढली, तरच धडगत आहे अन्यथा गोव्यावर मोठे पाणी संकट येणाऱ्या काळात दिसेल. जलाशयांमध्ये आता जरी पाणीसाठा चांगल्या प्रमाणात असला, तरीही सरासरीपेक्षा तिथे पाऊस कमी पडल्यास पाण्याचे मोठे संकट उभे राहू शकते. पुढील संकटे टाळण्यासाठी राज्याने तयारी करावी लागेल. पाऊस कमी होणे याचा परिणाम फक्त पाणी पुरवठ्यावरच नव्हे तर शेती, भाजीपाला आणि अन्य पिकांवरही दिसणार आहे.