Home >> विचार >> अनुभव आणि आक्रमकतेचा सामना !

अनुभव आणि आक्रमकतेचा सामना !

फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना रंगतदार होणार आहे. जेवढा रंगतदार, तेवढाच तो स्मरणातही राहणारा ठरणार आहे. कारण एका संघाला सलग दोनदा विश्वचषक जिंकून पूर्वीच्या दोन विक्रमांशी बरोबरी करायची आहे, तर दुसऱ्या संघाला सलगपणे आंतरराष्ट्रीय सामने जिंकून विक्रम करायचा आहे.

Story: संपादकीय |
16th July, 11:26 pm
अनुभव आणि आक्रमकतेचा सामना !

दोनवेळा विश्वविजेता ठरलेल्या फ्रान्ससारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून स्पेन, तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडला हरवून मागचा विश्वविजेता अर्जेंटिना हे संघ फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. तीनवेळा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या, दोनवेळा उपविजेता ठरलेल्या आणि जगावर भुरळ घालणारा दिग्गज लियोनेल मेस्सीसारखा खेळाडू असलेल्या अर्जेंटिनाचा अनुभव पाहता स्पेनसाठी अंतिम सामना हा अग्निदिव्यच आहे. २०१० चा विजेता असलेला स्पेन १६ वर्षांनंतर अंतिम सामन्यात पोहोचला आहे. विशेष म्हणजे, यावेळी स्पेनची आक्रमक खेळी दिसत आहे. फ्रान्सला सहजपणे नमवून स्पेनने आपली पकड मजबूत केली आहे. स्पेनचा डिफेन्स काय आहे, ते या फुटबॉल विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये सर्वांनीच पाहिले आहे. त्यामुळे लामिन यामाल हा १९ वर्षीय खेळाडू असो किंवा २९ वर्षांचा मिकेल ओझार्याबाल, रोद्री, पेड्रीसारखे युवा खेळाडू असोत, आपल्या संघाला अपराजित ठेवण्यात या युवा खेळाडूंचा मोठा वाटा आहे.

आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये सलग ३७ सामन्यांत अपराजित राहण्याचा एक विक्रमही इटलीच्या नावावर आहे. स्पेनने त्या विक्रमाशी बरोबरी करून इतर प्रतिस्पर्ध्यांवर आपला जो प्रभाव टाकायचा आहे, तो टाकलेला आहे. म्हणजे अंतिम सामन्यापूर्वी जो दबाव यायला हवा, तो निश्चितच अर्जेंटिनावर आलेला असेल. फ्रान्सचा दिग्गज खेळाडू आणि फुटबॉलमध्ये ज्याच्या नम्रपणाचा दाखला दिला जातो, त्या किलियन एम्बापेलाही स्पेनच्या खेळाडूंनी उपांत्य सामन्यात कोणतीही संधी दिली नाही. एम्बापेला निराश व्हावे लागले. अशा वेळी अर्जेंटिनाचा दिग्गज आणि जगप्रसिद्ध लिओनेल मेस्सी स्पेनच्या खेळाडूंना कसा हाताळतो, ते पाहण्याची संधी फुटबॉलच्या चाहत्यांना मिळणार आहे. अंतिम सामना हा चुरसीचा तेवढाच रोमहर्षक होईल, यात शंका नाही. इटलीने यापूर्वी १९३४ आणि १९३८ असे दोनवेळा सलगपणे विश्वचषक आपल्या नावे केले होते. ब्राझिलने १९५८ व १९६२ असे सलग दोन वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. तसा विक्रम आता अर्जेंटिनाला करण्याची संधी आहे. अर्जेंटिनाचा फुटबॉलमध्ये असलेला अनुभव, जिंकण्यासाठी त्यांच्याकडून होणारा संघर्ष पाहता इटली आणि ब्राझिलचा विक्रमही मोडण्याची संधी त्यांच्याकडे आहे. अशा अनेक अंगाने फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना रंगतदार होणार आहे. जेवढा रंगतदार, तेवढाच तो स्मरणातही राहणारा ठरणार आहे. कारण एका संघाला सलग दोनदा विश्वचषक जिंकून पूर्वीच्या विक्रमांशी बरोबरी करायची आहे, तर दुसऱ्या संघाला सलगपणे आंतरराष्ट्रीय सामने जिंकून विक्रम करायचा आहे. दोन्ही संघ विश्वविजेते होण्यासाठी जीवाचे रान करतीलच, पण यावेळी विक्रमासाठीही ते खेळणार आहेत.

मेस्सीमुळे अर्जेंटिनाकडे सर्वांच्या नजरा असल्या तरी स्पेनच्या खेळाचेही वेगळे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या तरुण खेळाडूंनी गेल्या काही वर्षांत सिद्ध केलेली आपली क्षमता आणि सलगपणे जिंकत आलेले सामने यामुळे अर्जेंटिना स्पेनचा कसा सामना करणार, हे अंतिम सामन्यात पहावे लागेल. दोन्ही संघ तुल्यबळाचे असल्यामुळे यंदाचा अंतिम सामना हा प्रचंड आकर्षणाचा ठरणार आहे. स्पेनने २०२४ मध्ये युरो कप जिंकलेला आहे, तर अर्जेंटिनाने २०२२ चे विश्वचषक आणि २०२४ कोपा अमेरिका चषकावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दोन्ही संघ एवढे चांगले खेळतात, की त्यांच्यातील त्रुटी काढणेही फुटबॉलच्या समीक्षकांना शक्य होत नाही. अर्जेंटिनाच्या खेळाडूंकडे प्रचंड अनुभव आहे तर स्पेनच्या संघात तरुणाईचा जोश आहे. उपांत्य फेरीतील सामन्यात स्पेनने चेंडू आपल्याकडे कसा ठेवायचा आणि आक्रमण कसे करायचे, या दोन्ही गोष्टी दाखवून दिल्या आहेत. अर्जेंटिना हा अनुभवी संघ असल्यामुळे आक्रमकता आणि संधी हाती आली तर तिचा कसा फायदा घ्यायचा, ते त्यांना चांगले माहीत आहे. त्यामुळे यावेळचा अंतिम सामना हा फक्त एक सामना नसेल, तर या सामन्यातून अर्जेंटिनाला सलग दुसऱ्यांदा विश्वविजेते होऊन इटली आणि ब्राझिलच्या विक्रमाच्या बरोबरीस पोहचायचे आहे. तर, स्पेनला नव्या रक्ताचे खेळाडू नव्या पद्धतीने कसा अविष्कार करतात ते दाखवून द्यायचे आहे. अर्जेंटिनाकडे जगातील बहुसंख्य चाहत्यांचे लक्ष असेलही, पण स्पेनने या स्पर्धेत बाजी उलटवली आहे. त्या संघाच्या तरुण खेळाडूंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जिथे जगातील अनेक दिग्गज खेळाडू निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, तिथे फुटबॉलच्या मैदानावर पुढील अनेक वर्षे साम्राज्य करण्यासाठी स्पेनने अनेक नवे खेळाडू समोर आणलेले आहेत. नवे रोनाल्डे, मेस्सी, नेमार, एम्बापे तयार होत आहेत, तेच या अंतिम सामन्यातून अधोरेखित होईल.