
मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, येत्या २७ ऑक्टोबर रोजी देशात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातील, असे वृत्त इस्रायली प्रसारमाध्यमांनी दिले आहे. सत्ताधारी लिकुड पक्षाचे ज्येष्ठ नेते ओफिर काट्झ यांनी घोषणा केली आहे की, कायद्यानुसार ठरलेल्या वेळेवरच पुढील निवडणुका पार पडतील. सध्याच्या 'नेसेट'ने म्हणजेच इस्रायलच्या संसदेने १७ जुलै रोजी आपला चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
ही निवडणूक इस्रायलच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण १९८८ नंतर पहिल्यांदाच इस्रायलमध्ये ठरलेल्या वेळेनुसार म्हणजेच मुदतपूर्व न होता निवडणुका होत आहेत. तसेच, नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार गेल्या ५० वर्षांत पूर्ण चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले सरकार ठरणार आहे. आघाडीतील मित्रपक्षांच्या मागणीवरूनच निवडणुका नियोजित वेळेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इस्रायली माध्यमांच्या माहितीनुसार, निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी सादर करण्याची अंतिम मुदत ७ सप्टेंबर असेल.
राजकीय विश्लेषकांच्या मते, बेंजामिन नेतन्याहू यांना त्यांच्या चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीतील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक निवडणुकीचा सामना करावा लागणार आहे. या निवडणुकीत इस्रायली मतदार ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेला भीषण हल्ला आणि त्यावेळचे सुरक्षा अपयश, गाझा आणि लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे नियोजन, इराणसोबतचा थेट तणाव आणि मित्रदेश अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये आलेली कटुता या मुद्द्यांच्या आधारे नेतन्याहू सरकारच्या कामगिरीचे मूल्यांकन करतील. लष्करी मोहिमांमधील अपयश, वाढती जीवितहानी आणि युद्धात अद्याप कोणताही स्पष्ट विजय न मिळाल्याने नेतन्याहू यांच्या 'मजबूत सुरक्षा रक्षक' या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. याशिवाय, अमेरिकेच्या मध्यस्थीने प्रादेशिक तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांमुळे नेतन्याहू यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.
नुकत्याच समोर आलेल्या जनमत चाचण्यांनी इस्रायलमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. चाचण्यांनुसार कोणत्याही एका गटाला १२० जागांच्या नेसेटमध्ये बहुमतासाठी आवश्यक असलेला ६१ जागांचा आकडा गाठणे कठीण जाईल, ज्यामुळे पुन्हा एकदा त्रिशंकू संसद अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.
- सुदेश दळवी