Home >> विचार >> सरकार बदलल्यावर बदलतो बसचा रंग !

सरकार बदलल्यावर बदलतो बसचा रंग !

Story: राज्यरंग - पश्चिम बंगाल |
19th July, 10:33 pm
सरकार बदलल्यावर बदलतो बसचा रंग !

पश्चिम बंगालमध्ये सत्तांतरानंतर सरकारी बसेसच्या रंगात बदल करण्याची परंपरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. डाव्या आघाडीच्या शासन काळात राज्यातील सरकारी बसेस लाल रंगात धावत होत्या. त्यानंतर तृणमूल काँग्रेस सत्तेत आल्यानंतर या बसेसना निळा-पांढरा रंग देण्यात आला आणि तोच राज्याच्या सार्वजनिक वाहतुकीची ओळख बनला. आता भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर नव्या सरकारी बसेसना भगवा रंग देण्यात येत असल्याने या बदलाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

ही बाब विशेषतः एसी-५८ मार्गावरील नव्या वातानुकूलित बससेवेच्या उद्घाटनावेळी प्रकर्षाने समोर आली. सोनारपूर ते न्यू टाऊनमधील इको स्पेस या मार्गावर धावणाऱ्या बस निळ्या असतील, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात चमकदार भगव्या रंगातील बस रस्त्यावर उतरल्या. त्यानंतर लगेचच दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील घटकपूर ते हावड्यातील संतरागाछी या मार्गावरील नव्या खासगी बससेवेलाही भगवा-पांढरा रंग देण्यात आला.

राजकीय प्रतीकांच्या दृष्टीने लाल रंग हा डाव्या पक्षांचा, तर भगवा रंग भाजपचा मानला जातो. तृणमूल काँग्रेसचा अधिकृत रंग निळा नसला तरी गेल्या १५ वर्षांत निळा-पांढरा रंग हा कोलकात्याच्या सार्वजनिक वाहतुकीची ओळख बनला होता. त्यामुळे नव्या रंगसंगतीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राज्याचे परिवहन मंत्री अर्जुन सिंह यांनी या बदलाचे समर्थन करताना सांगितले की, कोलकात्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था काळानुसार बदलणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, भगवा रंग हा केवळ ‘डबल इंजिन’ सरकारचे प्रतीक नसून आधुनिक, पर्यावरणपूरक आणि अधिक सक्षम सार्वजनिक वाहतुकीकडे होणाऱ्या संक्रमणाचाही संदेश देतो. शहराला नवी आणि वेगळी ओळख देण्यासाठी हे ब्रँडिंग करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम बंगाल ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आणि साउथ बंगाल स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या कार्यशाळांमध्ये बसेसचे रंग बदलण्याचे काम वेगाने सुरू आहे. ई-तिकिटांवरील डिजिटल वॉटरमार्कही निळ्यावरून भगव्या रंगात बदलण्यात आला आहे. मात्र, परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विभागाचा अधिकृत रंग कायमस्वरूपी बदलण्याचा कोणताही औपचारिक निर्णय अद्याप झालेला नाही.

या निर्णयावर परिवहन क्षेत्रातील तज्ज्ञांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परिवहन संघटनेचे नेते तपन दास यांच्या मते, प्रत्येक नवीन सरकार सार्वजनिक वाहतुकीचा वापर आपल्या राजकीय प्रतिमेसाठी करते. मात्र, बसचा रंग बदलल्याने चालकांची कमतरता, देखभालीतील त्रुटी किंवा बसांची अपुरी संख्या यांसारख्या मूलभूत समस्या सुटत नाहीत. प्रवाशांनाही बसच्या रंगापेक्षा तिची वेळेवर उपलब्धता अधिक महत्त्वाची वाटते.

- प्रसन्ना कोचरेकर