डॉ. कुमार सप्तर्षी यांचा युवकांवर विलक्षण विश्वास होता. समाजातील परिवर्तनाची खरी ताकद तरुणांमध्ये आहे, असे ते नेहमी सांगत. त्यामुळे त्यांनी तरुणांना केवळ आंदोलनाची भाषा शिकवली नाही, तर अभ्यास, विवेक, संवाद, संविधान आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचेही महत्त्व पटवून दिले.

समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि युवक क्रांती दलाचे (युक्रांद) संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने वैचारिक विश्वातील एक महत्त्वाचा दीपस्तंभ मालवला आहे. त्यांचे जाणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचा अंत नव्हे, तर मूल्याधिष्ठित राजकारण, सामाजिक बांधिलकी आणि वैचारिक प्रामाणिकतेच्या एका परंपरेचा मोठा आधार हरपणे होय. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आयुष्यभर सत्ता नव्हे, तर समाजपरिवर्तनाचा मार्ग निवडला. डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करूनही त्यांनी सुखसोयींचे आयुष्य नाकारले आणि स्वतःला सामाजिक व राजकीय चळवळींसाठी वाहून घेतले. लोकनायक जयप्रकाश नारायण, महात्मा गांधी, डॉ. राममनोहर लोहिया आणि समाजवादी विचारधारेचा प्रभाव त्यांच्या कार्यात स्पष्टपणे दिसून येत होता. अन्याय, भ्रष्टाचार, विषमता आणि सत्तेचा दुरुपयोग याविरुद्ध त्यांनी सातत्याने आवाज उठवला. युवक क्रांती दलाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात हजारो तरुणांना सामाजिक भान, लोकशाही मूल्ये आणि संघर्षाची दिशा दिली. त्यांच्यासाठी राजकारण म्हणजे निवडणूक जिंकण्याचे साधन नव्हते; ते समाजसेवेचे माध्यम होते. म्हणूनच त्यांचे विचार अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहिले. डॉ. सप्तर्षी यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा विचारसरणीची अंधभक्ती कधीच केली नाही. ज्या वेळी जिथे लोकशाही, संविधान किंवा सामाजिक न्याय धोक्यात आल्याचे त्यांना वाटले, तेथे त्यांनी निःसंकोचपणे भूमिका घेतली. सत्ताधारी कोण आहेत यापेक्षा सत्तेचा वापर कसा होत आहे, हा त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा प्रश्न होता. त्यामुळे विरोधकही त्यांच्या प्रामाणिकपणाचा आदर करत.
आणीबाणीच्या काळात त्यांनी निर्भयपणे लोकशाहीच्या बाजूने उभे राहून संघर्ष केला. तुरुंगवासाची पर्वा न करता त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी लढा दिला. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे विचारांशी तडजोड न करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे उदाहरण होते. डॉ. सप्तर्षी हे प्रभावी लेखक आणि अभ्यासू वक्तेही होते. समाज, राजकारण, शिक्षण, धर्मनिरपेक्षता, संविधान आणि युवकांची भूमिका या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या भाषणांत आक्रमकता नव्हती, पण मुद्देसूद तर्क, अभ्यास आणि नैतिक ताकद होती. मतभेद असले तरी मनभेद नसावेत, हा त्यांचा स्वभाव होता. आजच्या काळात राजकारणावर व्यक्तिपूजा, सत्तास्पर्धा आणि तात्कालिक स्वार्थ यांचे वर्चस्व वाढत असताना डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यासारख्या मूल्यनिष्ठ नेत्यांची उणीव अधिक प्रकर्षाने जाणवते. त्यांनी दाखवून दिले की, विचारांवर ठाम राहूनही लोकांशी संवाद साधता येतो आणि संघर्ष करतानाही संयम राखता येतो. डॉ. सप्तर्षी यांचा युवकांवर विलक्षण विश्वास होता. समाजातील परिवर्तनाची खरी ताकद तरुणांमध्ये आहे, असे ते नेहमी सांगत. त्यामुळे त्यांनी तरुणांना केवळ आंदोलनाची भाषा शिकवली नाही, तर अभ्यास, विवेक, संवाद, संविधान आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचेही महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक कार्यकर्ते आज विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत कार्यरत आहेत. हीच त्यांच्या कार्याची खरी परंपरा आहे.
आजच्या ध्रुवीकरणाच्या वातावरणात मतभिन्नता म्हणजे वैर, अशी प्रवृत्ती वाढताना दिसते. अशा काळात डॉ. कुमार सप्तर्षी यांनी मतभेदांना वैचारिक संधी मानले. ते विरोधी मत ऐकत, त्यावर अभ्यासपूर्ण प्रतिवाद करत आणि संवादाचे दरवाजे कधीही बंद करत नसत. म्हणूनच ते केवळ समाजवादी नेते नव्हते, तर लोकशाही संवादसंस्कृतीचे खरे पुरस्कर्ते होते. काही वर्षांपूर्वी ते गोव्यातही आले होते, काही युवकांना त्यांनी मार्गदर्शन केले होते. दुर्दैवाने त्यांच्या विचारपद्धतीचा अवलंब करणारे गोमंतकीय त्यांना भेटले नसावेत किंवा जनतेला असा संयमी नेता आकर्षित करू शकला नसेल.
आज भारतासमोर सामाजिक सलोखा, आर्थिक विषमता, बेरोजगारी, राजकीय ध्रुवीकरण आणि संविधानिक संस्थांवरील विश्वास यांसारखी अनेक आव्हाने आहेत. अशावेळी डॉ. सप्तर्षी यांचे जीवन सांगते की, कोणत्याही समाजाची खरी ताकद सत्तेत नसून जागरुक नागरिकांमध्ये असते. संघर्ष आवश्यक असतो; पण तो विवेक, नैतिकता आणि अहिंसेच्या चौकटीत राहून केला तरच समाजाला नवी दिशा मिळते. त्यांच्या निधनाने समाजवादी चळवळ, पुरोगामी विचारविश्व आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहे. मात्र, व्यक्ती जाते; विचार अमर राहतात. त्यांनी जपलेली लोकशाही, सामाजिक न्याय, समता, धर्मनिरपेक्षता आणि संविधाननिष्ठा ही मूल्येच त्यांना खरी श्रद्धांजली ठरतील. डॉ. सप्तर्षी यांचे निधन ही केवळ एका ज्येष्ठ समाजवादी नेत्याची एक पोकळी नाही, तर विचारांच्या राजकारणावर विश्वास ठेवणाऱ्या संपूर्ण पिढीची हानी आहे. काळ बदलतो, चेहरे बदलतात, सत्ताही बदलते; परंतु सत्य, समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय ही मूल्ये कधीच कालबाह्य होत नाहीत. त्या मूल्यांचा दीप त्यांनी आयुष्यभर तेवत ठेवला. आता तो अधिक तेजाने जिवंत ठेवण्याची जबाबदारी समाजाची आहे.