अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या निर्मितीनंतर उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला अभूतपूर्व चालना मिळाली आहे. पर्यटन, पायाभूत सोयी, व्यापार आणि रोजगारातील प्रचंड वाढीमुळे राज्य एक लाख कोटी डॉलर उत्पन्नाच्या ध्येयाकडे वेगाने सरकत आहे.

अयोध्या येथील श्री राम मंदिर जानेवारी, २०२४ मध्ये खुले झाले. तेथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ होईल आणि त्यामुळे उत्तर प्रदेश राज्याच्या (त्याचसोबत भारताच्या) आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा तज्ञांचा अंदाज होता. एवढेच नव्हे तर त्यामुळे उत्तर प्रदेश राज्याची अर्थव्यवस्था २०२९ पर्यंत एक लाख कोटी डॉलर्स (साधारण ९० लाख कोटी रुपये) करण्याचे ध्येय समीप येईल, असाही अंदाज होता आणि तसेच होताना दिसत आहे. दुर्दैवाने गेले कित्येक दिवस श्रीराम मंदिर अनिष्ट कारणांमुळे चर्चेत आहे. तेथे पैशाचा अपहार झाला, असा आरोप आहे. परंतु, असे असले तरी श्रीराम मंदिरामुळे उत्तर प्रदेशाच्या आर्थिक विकासाला जबरदस्त चालना मिळाली, हे नाकारता येत नाही. कारण अयोध्येस येणाऱ्या पर्यटक / यात्रेकरूंच्या संख्येमध्ये अभूतपूर्व वाढ होत आहे. त्यांच्यासाठी निवास, भोजन, चहापाणी, प्रवासाच्या सोयी यामध्ये प्रचंड भर पडली आहे. अयोध्या नगरीचा वेगाने आर्थिक कायापालट होत आहे. या संबंधात पुरेशी आकडेवारीसुद्धा उपलब्ध झाली आहे.
यात्रेकरूंची एकूण संख्या
श्रीराम मंदिर होण्यापूर्वी २०२३ साल संपेपर्यंत अयोध्या हे फारसे आकर्षक असे तीर्थक्षेत्र नव्हते. तेथे पर्यटक / यात्रेकरूंची संख्या कमीच होती. दरवर्षी साधारण सहा कोटी पर्यटक, एवढीच होती. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या जेमतेम ४ ते ५ टक्केच. जानेवारी, २०२४ नंतर मंदिर खुले झाल्यावर आणि सरकारच्या पुढाकाराने रेल्वे, आंतरराष्ट्रीय विमानतळ, निवासस्थाने इत्यादि सोयी निर्माण झाल्यावर २०२४ मध्येच यात्रेकरूंची संख्या ६ कोटींवरून एकदम १६ कोटी झाली. त्यानंतर २०२५ मध्ये ५० कोटी यात्रेकरू / पर्यटक येतील असा अंदाज होता. २०२४ च्या तुलनेत यात्रेकरूंच्या संख्येमध्ये दीडपटीपेक्षा जास्त वाढ झाली. या संख्येचा आणखी एक विशेष म्हणजे, २०२४ मध्येच या संख्येने ताजमहाल येथे १.३ कोटी पर्यटक, मक्का २ कोटी यात्रेकरू तर व्हॅटिकन सिटी १ कोटी यात्रेकरू या स्थळांना मागे टाकले आहे. हे यश अभूतपूर्व म्हणण्यास हरकत नाही.
पायाभूत सोयी
गेल्या दोन वर्षांमध्ये अयोध्या येथे अक्षरशः आमुलाग्र परिवर्तन झाले आहे. अद्यावत बस सेवा, अत्याधुनिक रेल्वे स्थानक, देशी आणि परदेशी प्रवाशांची सेवा देणारा विमानतळ, अंतर्गत रस्त्यांचे जाळे, वीज व पाणी पुरवठा, निवासस्थाने, भोजनगृहे, तारांकित हॉटेल, टॅक्सी, रिक्षा, मार्गदर्शक इत्यादि सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ घडून आली आहे. एवढ्या सुविधांची निर्मिती करून सुद्धा प्रत्येक प्रकारच्या सेवेला सतत वाढती मागणी होत आहे. सर्व पायाभूत सोयींच्या निर्मितीसाठी एकूण गुंतवणूक साधारण ८५ हजार कोटींच्या घरात होऊ शकेल. एवढी मूळ गुंतवणूक झाल्यावर एकूण उत्पन्न कित्येक हजार कोटी रुपये होऊ शकेल. याशिवाय यामुळे सरकारला करांच्या माध्यमातून मिळणारा महसूलसुद्धा वाढला आहे.
व्यापार उदीम
एका विश्वासार्ह अंदाजाप्रमाणे राम मंदिरामुळे शहरातील एकूण व्यापारउदिमाच्या उलाढालीमध्ये तीनपट ते पाचपट वाढ घडून आली आहे. यात्रेकरूंकडून सर्वच वस्तू / सेवांना सातत्याने मागणी येत आहे. साहजिकच स्थानिक व्यापारी उद्योजक यांचे उत्पन्नही अनेक पटीने वाढले आहे. अनेक ठिकाणी व्यापारी बंधूंचे दररोजचे उत्पन्न २०२२, २०२३ मधील साधारण ४०० ते ५०० रुपये वरून २००० ते २५०० पर्यंत सुद्धा वाढले आहे. मग एकूण फायदासुद्धा तिप्पट-चौप्पट वाढला यात नवल नाही. व्यापाराच्या उलाढालीमध्ये वाढ म्हणजे (थोडी फार गळती सोडून) सरकारच्या जीएसटी (४०० कोटी) महसुलामध्येसुद्धा वाढ. एकूणच संपूर्ण वातावरण उत्साहवर्धक दिसते आहे.
रोजगार वाढ
अयोध्या येथील विकास हा सेवाक्षेत्राच्या अंतर्गत होणारा विकास असल्यामुळे यात्रेकरूंना निवास, भोजन, नाश्ता, दळण-वळण, देवकार्य मार्गदर्शक इत्यादि अनेकविध सेवा पुरविणाऱ्या लोकांसाठी भरघोस प्रमाणात रोजगार वाढ झाली आहे. या एकूण सेवांची गणती करणेसुद्धा कठीण काम आहे. असे म्हणतात की, येणाऱ्या यात्रेकरूंच्या कपाळावर 'जय श्रीराम' हा शिक्का मारणाऱ्या अशिक्षित माणसापासून ते पंचतारांकित हॉटेलचे व्यवस्थापन करणाऱ्या उच्चशिक्षित व्यवस्थापकापर्यंत सर्वांना कामधंदा मिळाला आहे. साहजिकच त्यांची प्राप्तीसुद्धा वाढली आहे. या सर्वच घडामोडी अत्यंत स्वागतार्ह आहेत.
राज्याचे उत्पन्न
२०२९ पर्यंत राज्याचे एकूण उत्पन्न एक लाख कोटी डॉलर्स (साधारण ९० लाख कोटी रुपये) करण्याचे उत्तर प्रदेशचे ध्येय आहे. २०२१-२२ मध्ये उत्तर प्रदेशचे एकूण घरगुती उत्पन्न साधारण १९ लाख कोटी रुपये होते. त्यावेळी अयोध्या जिल्ह्याचे उत्पन्न साधारण ११,००० कोटी रुपये होते. म्हणजे राज्याच्या उत्पन्नाच्या ०.६ टक्के एवढेच! २०२४-२५ मध्ये राज्याचे उत्पन्न साधारण ३० लाख कोटींच्या १.५ टक्के म्हणजे ४५००० कोटी रुपये आहे. याचाच अर्थ असा की, अवघ्या दोन-अडीच वर्षामध्ये अयोध्येचे घरगुती उत्पन्न (केवळ राम मंदिरामुळे) ११ हजार कोटींवरून ४५ हजार कोटी इतके भरघोस वाढले. दोन वर्षामध्ये चौपट वाढ म्हणजे, राम मंदिरामुळे अयोध्येचे उत्पन्न तर वाढलेच एवढेच नव्हे तर राज्याच्या एकूण उत्पन्नामध्ये अयोध्याचा वाटासुद्धा वाढला. राम मंदिरापूर्वी विकासामध्ये अयोध्येचा क्रमांक उत्तर प्रदेशामध्ये ७५ पैकी ४८ वा होता, तो राम मंदिरामुळे वर सरकून ७५ पैकी २६ वा झाला. हे लक्षणीय आहे. या विकासामुळे सरकारचा कर महसूलही वाढला आहे. श्री राम मंदिर ट्रस्टने सरकारला २०२४-२५ मध्येच ४०० कोटी रुपये प्रत्यक्ष कर दिला आहे. प्रत्यक्ष कर, जीएसटी आणि इतर कर मिळून उत्तर प्रदेश सरकारला दरवर्षी साधारण २० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळू शकेल, असे स्टेट बँकेचे संशोधन सांगते.
'चांगली' महागाई वाढली
गेल्या दोन वर्षांतील सर्वंकष विकासामुळे उत्पन्न वाढले, रोजगार वाढले, प्राप्ती वाढली. खर्च (म्हणजे मागणी) वाढली. बाजारात जास्त पैसा खेळू लागला. साहजिकच महागाईसुद्धा वाढली. जमीन, घरभाडे इत्यादि वेगाने वाढू लागले. मंदिराशेजारील जमिनीचे भाव दोनच वर्षांमध्ये दहापटीने वाढले. निवास, भोजन, रिक्षा यांचे भाव वाढले असणे निश्चित आहे. लोक तक्रार करत असणेही शक्य आहे. परंतु, याबाबत अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे, ही महागाई विकासापाठोपाठ, विकासानंतर वाढलेली आहे. वाढते रोजगार, वाढती प्राप्ती आणि लोकांनी केलेला वाढता खर्च यामुळे सदर महागाई वाढली हे मात्र विसरू नये. येथे विकास आणि महागाई असे दोन्ही एकत्र आहेत. या प्रकारास विकासोत्तर महागाई असे म्हटले जाते. या महागाईस 'चांगली' महागाई असे म्हणता येईल. एकूणच श्रीराम मंदिरामुळे अवघ्या दोन वर्षातच त्या भागाच्या सर्वंकष विकासाला जबरदस्त उठाव मिळाला आहे. उत्तर प्रदेश राज्याचे एक लाख कोटी डॉलर्सचे स्वप्न समीप आले आहे आणि त्यामुळे भारताचे पाच लाख कोटी डॉलर्सचे स्वप्नसुद्धा साकार होऊ शकेल.
- डॉ. अनिल पडोशी
(लेखक गोवा विद्यापीठाचे माजी अर्थशास्त्र विभाग प्रमुख आहेत.)
९८२२५८८८६२