Home >> विचार >> तरुण पुरुष महिलांपेक्षा अधिक श्रद्धाळू

तरुण पुरुष महिलांपेक्षा अधिक श्रद्धाळू

Story: विश्वरंग |
22nd July, 11:45 pm
तरुण पुरुष महिलांपेक्षा अधिक श्रद्धाळू

अनेक वर्षांपासून असा समज होता की स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक धार्मिक असतात. परंतु, अलिकडच्या काही वर्षांत ही धारणा वेगाने बदलताना दिसत आहे. ‘गॅलप’च्या २०२४-२५ च्या विश्लेषणाने या बदलावर शिक्कामोर्तब केले आहे. अमेरिकेत प्रथमच तरुण पुरुष धार्मिकतेच्या बाबतीत स्त्रियांच्या पुढे गेले आहेत.

‘गॅलप’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील ४२ टक्के तरुण पुरुषांनी धर्माला आपल्या जीवनात ‘खूप महत्त्वाचे’ मानले आहे. दोन वर्षांपूर्वी हे प्रमाण अवघे २८ टक्के होते. याउलट, तरुण स्त्रियांमध्ये हे प्रमाण २९ टक्के वरच स्थिर राहिले. 

तज्ञांच्या मते, हा बदल केवळ अंधश्रद्धेमुळे किंवा देवावरील भक्तीमुळे झालेला नाही; तर यामागे ओळखीचे राजकारण, वैचारिक भूमिका आणि सोशल मीडियाचा प्रभाव आहे. विशेषतः रिपब्लिकन विचारसरणीच्या तरुण पुरुषांमध्ये ही धार्मिकता वेगाने वाढली आहे. सोशल मीडियावर पुरुषांची पारंपरिक भूमिका आणि रूढीवादी विचारांचा प्रसार करणाऱ्या सामग्रीमुळे पुरुष धर्माला त्यांच्या राजकीय व वैचारिक ओळखीचा प्रमुख भाग मानत आहेत.

तरुण पुरुषांमध्ये धार्मिकता वाढण्यासोबतच, तरुण स्त्रियांचे धर्मापासून दूर जाणे हे देखील लिंगभेद बदलण्याचे मोठे कारण ठरले आहे. पब्लिक रिलिजन रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार, २०१३ मध्ये २९ टक्के तरुण स्त्रिया धर्माशी जोडलेल्या नव्हत्या, तर २०२५ पर्यंत हा आकडा ४३‍‍ टक्के वर पोहोचला.

धार्मिक संस्थांमधील पुरुषप्रधान विचारसरणी, महिलांना मिळणारा मर्यादित सहभाग आणि लैंगिक असमानता यामुळे तरुण स्त्रिया अंतर राखत आहेत. याशिवाय, ‘मी टू’सारख्या चळवळींचा आणि जागरूकतेचाही यावर मोठा प्रभाव पडला आहे.

अमेरिकेत पुरुषांचा कल धर्माकडे वाढताना दिसत असला, तरी भारतात परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या २०२१ च्या अहवालानुसार, भारतातील ६४ टक्के महिला दररोज प्रार्थना करतात, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण ५६ टक्के आहे. म्हणजेच, भारतात अजूनही स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक धार्मिक आहेत. अमेरिकेत धर्म आता केवळ श्रद्धेचा विषय राहिला नसून तो राजकीय व वैचारिक ओळखीचे साधन बनत आहे. तर दुसरीकडे, लैंगिक असमानतेमुळे स्त्रिया धार्मिक चौकटीतून बाहेर पडत आहेत.

- सुदेश दळवी