Home >> विचार >> संवेदनशून्यता !

संवेदनशून्यता !

पूर्वी काँग्रेसच्या नेत्यांना जशी सत्ता मस्तकात चढली होती, तशाच प्रकारे आता भाजपच्या काही नेत्यांनाही त्याची लागण झाली असावी. एखाद्या गंभीर विषयाकडे भावनिक दृष्टीने आपण पाहू शकत नाही, तर किमान त्यांची चेष्टा केली जाणार नाही, याचे तरी भान ठेवायला हवे होते.

Story: संपादकीय |
22nd July, 11:47 pm
संवेदनशून्यता !

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनकर्त्यांवर दिल्लीत झालेला लाठीमार ताजा असतानाच दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव अशा अनेक नेत्यांना दिल्लीत ताब्यात घेण्यात आले. सगळीकडून सरकारची कोंडी होत असताना भाजपचे नेते आणि 'अंधभक्त' म्हणून घेणारे 'जाणकार' आंदोलकांची आणि देशातील युवकांची कशी थट्टा करतात, तेही समोर आले. गेले दोन दिवस आंदोलन करणारे कसे देशद्रोही आहेत, यापासून ते आंदोलक 'वाळवी' आहेत, असे म्हणण्यापर्यंत 'भक्तां'च्या पोस्टचा महापूर आलेला आहे. हे तेव्हाच होते, जेव्हा काही लोक सत्ताधाऱ्यांच्या भक्तीत लीन होतात. तेच त्यांच्यासाठी देव असतात. आपल्या नेत्यांच्या फोटोंना लाडूचा प्रसाद दाखवतात. आपल्या लाडक्या नेत्यांसाठी हंबरडा फोडून, ऊर बडवून ओरडत असतात. ते 'भक्त' मग आंदोलन सुरू असताना तिथे येऊनही भक्ती दाखवतात. आंदोलकांचे खच्चीकरण करण्यासाठी दगड फेकतात. तोंडावर शाई फेकतात. यात काहींची सत्ताधाऱ्यांप्रती भक्ती असते, तर काहींना अहंकार असतो. 

केंद्रात भाजप २०१४ पासून सत्तेत आहे. गोव्यात २०१२ पासून भाजप सत्तेत आहे. सलगपणे सत्ता मिळू लागल्यानंतर काहींचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो. पूर्वी काँग्रेस अशाच प्रकारे सत्तेत होती, त्यावेळी त्यांच्याही काही नेत्यांना अहंकाराचा स्पर्श झाला होता. उठसूठ काहीतरी वादग्रस्त विधाने करून आपले कोणी काही करू शकत नाही, अशा भ्रमात ते होते. मणिशंकर अय्यरसारखा नेता सतत वाद उकरून काढायचा. अनेक नेत्यांच्या सत्ता डोक्यात गेली होती. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे काँग्रेसच्या काळात उघडकीस आली. शेवटी जनतेनेच कंटाळून काँग्रेसला सत्तेतून बेदखल केले. जनतेच्या सगळ्या आंदोलनांमध्ये तेल ओतण्याचे काम तेव्हा भाजप करायची. काँग्रेसच्या भ्रमाचा भोपळा २०१४ मध्ये फुटला. जनतेने शेवटी भाजपला कौल दिला. आज भाजपच्या काही नेत्यांची तीच स्थिती आहे, जी काँग्रेसच्या काळात त्यांच्या नेत्यांची होती. जिभेला हाड नसलेले आणि दुसऱ्यांना हीन मानणारे नेते भाजपमध्ये आहेत, जे वारंवार काहीतरी करून प्रसिद्धीत राहू इच्छितात. त्यांच्या मनात इतरांविषयी द्वेष अगदी ठासून भरलेला आहे. दुसऱ्या पक्षाचे लोक किंवा सरकारच्या विरोधात जो कोणी बोलतो, आंदोलन करतो तो त्यांच्या 'हिट लिस्ट'वर असतो. माजी खासदार नरेंद्र सावईकर हेही त्याच रांगेत बसतात. एरवी कशीबशी शब्दांची जुळवाजुळव करून इतर पक्षांना, त्यांच्या नेत्यांना ते लक्ष्य बनवत असतात. फेसबुकवर अशा यमक जुळवून अनेक कविता ते पोस्ट करतात. त्यातून अनेकांचे मनोरंजन होते. त्यांच्या कवितांवर खाली ज्या प्रतिक्रिया येतात, त्या त्यांच्या विरोधात असल्या तर त्यातून ते खचून न जाता, पुन्हा काहीतरी नवे लिहित असतात. त्यांनी परवा तर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांना 'वाळवी' असे म्हणून एक पोस्ट समाजमाध्यमांवर टाकली. तरुणांवर दिल्लीत अत्यंत निर्दयीपणे लाठीमार होतो आणि त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी सावईकर अशा प्रकारची पोस्ट करून आंदोलकांना 'वाळवी' संबोधतात, हे फारच दुर्दैवी आहे. आंदोलन करणारे जर 'वाळवी' आहेत तर भाजपने सत्ताच मिळवली ती आंदोलनांच्या मार्गातून, याचा विसर सावईकरांना पडला. कदाचित पक्ष एवढी वर्षे सत्तेत असल्यामुळे, त्या जुन्या आंदोलनांचा त्यांना विसर पडला असावा.

'नीट' परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात सुमारे १२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. 'नीट' पेपरफुटीची नैतिक जबाबदारी ही संबंधित खात्याच्या मंत्र्याची असते. त्यांना हटविण्यासाठी आंदोलन सुरू आहे. देशातील तरुण वर्ग या आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाला. कारण, जे घडत आहे त्याविषयी त्यांना चीड आहे. आत्महत्या केलेल्या काही मुलांचे पालकही या आंदोलनात होते. त्यांना पाठिंबा द्यायचा नसेल, तर किमान गप्प राहताही आले असते. पण या आंदोलकांना 'वाळवी' म्हणून त्यांची थट्टा सावईकर यांनी केली. भाजपच्या दिल्लीतील अनेक नेत्यांना हे आंदोलन थांबायला हवे असे वाटते. सत्ताधारी गटातील लोकांनाही आंदोलकांची मागणी योग्य आहे असे वाटत असताना काही नेत्यांना मात्र आंदोलक 'वाळवी' वाटतात, हे आश्चर्यच आहे. पूर्वी काँग्रेसच्या नेत्यांना जशी सत्ता मस्तकात चढली होती, तशाच प्रकारे आता भाजपच्या काही नेत्यांनाही त्याची लागण झाली असावी. एखाद्या गंभीर विषयाकडे भावनिक दृष्टीने आपण पाहू शकत नाही, तर किमान त्यांची चेष्टा केली जाणार नाही, याचे तरी भान ठेवायला हवे होते.