पणजी :नव्या वीजजोडणीसाठी अर्ज केल्यानंतर महानगर क्षेत्रात तीन, नगरपालिका क्षेत्रात सात, तर ग्रामीण भागात १५ दिवसांच्या आत वीजजोडणी देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. गोवा आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी असलेल्या संयुक्त वीज नियामक आयोगाने (जेईआरसी) वीजजोडणी आणि वीजभारासंदर्भातील नवीन नियमांची अधिसूचना जारी केल्यानंतर गोवा वीज खात्यानेही त्याच्या अंमलबजावणीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
नव्या नियमांनुसार निश्चित कालमर्यादा
वीजजोडणीसाठीचा अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण असणे आणि संबंधित ठिकाणी आवश्यक यंत्रणा उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, नवीन वीजखांब उभारणे किंवा वीजवाहिन्या टाकण्याची आवश्यकता असल्यास ही नियमित कालमर्यादा लागू होणार नाही. तसेच नवीन ट्रान्स्फॉर्मर किंवा वितरण यंत्रणा (डिस्ट्रिब्युशन मेन्स) उभारावी लागल्यास ९० दिवसांच्या आत वीजजोडणी देणे बंधनकारक राहील. ग्रामीण भागातील बेटांवर वीजजोडणी देण्यासाठी कमाल ३० दिवसांची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
ग्राहकाचा वीजभार पाच किलोवॅटपर्यंत असल्यास सिंगल-फेज जोडणी दिली जाईल. पाच किलोवॅटपेक्षा अधिक वीजभार असल्यास थ्री-फेज जोडणी देणे आवश्यक राहील. यामुळे वीजपुरवठा अधिक सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उद्देश आहे.
१० किलोवॅटपर्यंतच्या वीजजोडणीसाठी अर्ज करताना अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र, जागेच्या ताब्याचे (ऑक्युपन्सी) प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील. अर्ज पूर्ण असल्यासच निर्धारित कालमर्यादेत वीजजोडणी दिली जाणार आहे.


