कर्मचारी भरती आयोगाकडून सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : गोवा कर्मचारी भरती आयोगाने प्राथमिक शाळांतील मराठी शिक्षकांच्या ३५२ आणि कोकणी शिक्षकांच्या ३८ पदांसाठी अंतिम गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. या भरतीसाठी आयोगाने ३० जानेवारी २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. अवघ्या सहा महिन्यांत संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
कर्मचारी भरती आयोगाकडून विविध पदांसाठी नियमितपणे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अर्ज स्वीकारल्यानंतर परीक्षा घेऊन गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते. प्राथमिक शिक्षकांच्या एकूण ३९० पदांसाठी जानेवारीमध्ये जाहिरात देण्यात आली होती. त्यानंतर संगणकाधारित (सीबीटी) पहिली व दुसरी परीक्षा तसेच वर्ग प्रात्यक्षिक (क्लास डेमॉन्स्ट्रेशन) चाचणी घेण्यात आली. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून ती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
निवड झालेले उमेदवार
मराठी शिक्षकांच्या ३५२ पदांपैकी सर्वसाधारण गटातून १३६, अनुसूचित जमाती (एसटी) गटातून ४२, अनुसूचित जाती (एससी) गटातून ४, इतर मागासवर्गीय (ओबीसी) गटातून ९२, आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस) गटातून १०, दिव्यांग गटातून १ आणि गुणवंत क्रीडापटू गटातून २ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
कोकणी शिक्षकांच्या पदांसाठी सर्वसाधारण गटातून ११, ओबीसी गटातून १५ आणि ईडब्ल्यूएस गटातून १ उमेदवाराची गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.
प्रतीक्षा यादीत मराठी शिक्षकांसाठी सर्वसाधारण गटातील ५७ आणि एसटी गटातील २२ उमेदवारांचा समावेश आहे.
कोकणी शिक्षकांच्या प्रतीक्षा यादीत सर्वसाधारण गटातील १३ आणि ओबीसी गटातील ८ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.