म्हापसा :बागा-कळंगुट येथील नाझरी रिसॉर्टचे बांधकाम करताना गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाचे (जीसीझेडएमए) कथित बनावट पत्र तयार करून फसवणूक केल्याच्या खटल्यातून म्हापसा न्यायालयाने रिसॉर्टचे मालक तथा आमदार मायकल लोबो आणि फ्रान्सिस (फ्रेन्की) व्हिएगस यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे.
सरकारी पक्षाकडून ठोस पुरावे सादर करण्यात अपयश
न्यायाधीश पूजा सरदेसाई यांनी दिलेल्या ६१ पानी सविस्तर निकालात पोलीस तपास आणि सरकारी पक्षाच्या दाव्यांतील अनेक गंभीर त्रुटींवर भाष्य केले आहे. आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असा एकही ठोस आणि विश्वासार्ह पुरावा सरकारी पक्ष सादर करू शकला नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
या प्रकरणात कळंगुट येथील सर्व्हे क्रमांक ३१९/२, ३१९/३, ३१९/५ आणि ३१९/१२ मधील सागरी भरती रेषेच्या परिसरात सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून तसेच जीसीझेडएमएचे कथित बनावट पत्र वापरून बांधकाम केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेने २६ जुलै २०१० रोजी गुन्हा नोंदवला होता.
या खटल्यात आरोपींच्या वतीने वरिष्ठ वकील अॅड. तानाजी सावंत यांनी बाजू मांडली, तर सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. तेजस पवार यांनी युक्तिवाद केला.
न्यायालयाने आपल्या निकालात पोलीस तपासातील त्रुटी आणि पुराव्यांतील कमतरता अधोरेखित करत, आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर साखळी पूर्ण करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचे नमूद केले. त्यामुळे मायकल लोबो आणि फ्रान्सिस व्हिएगस यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली.


