
पणजी : दरवर्षी २६ जुलै हा दिवस संपूर्ण भारतभरात अत्यंत अभिमानाने, उत्साहाने आणि आदराने 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. सन १९९९ मध्ये लडाखमधील कारगिल क्षेत्रातील अत्यंत प्रतिकूल, बर्फाच्छादित आणि उंच शिखरांवर लढल्या गेलेल्या युद्धात भारतीय लष्कराने मिळवलेल्या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजयाचे हे प्रतीक आहे. पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांनी नियंत्रण रेषा (LoC) ओलांडून चोरट्या मार्गाने ताबा मिळवलेल्या भारतीय चौक्या जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावून पुन्हा ताब्यात घेतल्या आणि शत्रूचा धुव्वा उडवला.
हा दिवस केवळ एका लष्करी विजयाचा उत्सव नसून भारतमातेचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अमर हुतात्म्यांना नमन करण्याचा एक पवित्र सोहळा आहे. या ऐतिहासिक विजयाची स्मृती जपण्यासाठी आणि शूर जवानांच्या बलिदानाला सलाम करण्यासाठी सन २००० मध्ये द्रास येथे 'कारगिल युद्ध स्मारक' उभारण्यात आले, ज्याचे पुढे २०१४ मध्ये नूतनीकरण करण्यात आले. तसेच २०१९ मध्ये नवी दिल्ली येथे राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले, जे १९६२ चे भारत-चीन युद्ध, १९४७, १९६५, १९७१ ची भारत-पाक युद्धे, श्रीलंकेतील शांती सेना मोहीम आणि १९९९ च्या कारगिल संघर्षातील वीरांना समर्पित आहे.
युद्धाची पार्श्वभूमी आणि पाकिस्तानचा विश्वासघात
भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्षाचा मोठा इतिहास राहिला आहे. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. त्यानंतर सियाचिन ग्लेशियरवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्यात सतत तणाव राहिलेला आहे. मे १९९८ मध्ये दोन्ही देशांनी केलेल्या अणुचाचण्यांमुळे दक्षिण आशियातील हे क्षेत्र अत्यंत संवेदनशील आणि अण्वस्त्रसज्ज बनले होते. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी १९९९ मध्ये दोन देशांतील तणाव कमी करण्यासाठी ऐतिहासिक 'लाहौर घोषणापत्र' जारी करण्यात आले, ज्याचा उद्देश काश्मीर मुद्दा शांततापूर्ण मार्गाने सोडवणे हा होता. मात्र, या शांतता चर्चेचा बुरख्यामागे पाकिस्तानी सैन्याने एक मोठा आणि कुटिल कट रचला होता. १९९८-१९९९ च्या कडाक्याच्या हिवाळ्यात, जेव्हा प्रचंड बर्फवृष्टीमुळे दोन्ही देशांचे सैन्य आपापल्या चौक्या सोडून खाली येते, त्याचा गैरफायदा पाकिस्तानी सशस्त्र दलांनी घेतला. त्यांनी लडाखमधील द्रास, बटालिक आणि कारगिल सेक्टरमधील एनएच १ए (NH 1A) या अत्यंत मोक्याच्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भारतीय चौक्यांवर गुप्तपणे घुसखोरी करून ताबा मिळवला.
रणसंग्रामाची सुरुवात आणि 'ऑपरेशन विजय'
शुरुवातीला जेव्हा भारतीय सैन्याला या घुसखोरीची माहिती मिळाली, तेव्हा हे घुसखोर केवळ काही स्थानिक दहशतवादी किंवा जिहादी असावेत असा अंदाज बांधला गेला होता. परंतु, लवकरच भारतीय लष्कराच्या लक्षात आले की, हा कुठलाही दहशतवादी हल्ला नसून पाकिस्तानी सैन्याने अत्यंत नियोजित पद्धतीने रचलेले एक मोठे लष्करी आक्रमण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला मश्कोह खोऱ्यापासून ते तुरतुकपर्यंत पसरलेल्या तब्बल १७० किलोमीटर लांबीच्या कठीण आणि खड्या पर्वतीय रेषेवर या भीषण युद्धाला सुरुवात झाली. दोन अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये प्रत्यक्ष रणांगणात लढले गेलेले हे जगातील पहिलेच युद्ध ठरले. या घुसखोरीचा नायनाट करण्यासाठी आणि नियंत्रण रेषेवरील भारतीय भूभाग पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने 'ऑपरेशन विजय'ची अधिकृत घोषणा केली. या मोहिमेत भारतीय सैन्याचे दोन लाखांहून अधिक शूर जवान रणांगणात उतरले. उणे तापमान, खड्या चढणीचे डोंगर आणि वरच्या बाजूला बसून शत्रू करत असलेला गोळीबार अशा सर्व विपरीत परिस्थितीवर मात करत जवानांनी एकापाठोपाठ एक शिखरे मोकळी करण्यास सुरुवात केली.
त्रि-सेवा मोहीम: हवाई दल आणि नौदलाचा पराक्रम
कारगिलच्या महासंग्रमात केवळ भूसेनेनेच नाही तर भारतीय हवाई दल आणि नौदलानेही अत्यंत निर्णायक भूमिका बजावली. अतिउंचीवरील शिखरांवर बसलेल्या शत्रूचा बिमोड करण्यासाठी भारतीय हवाई दलाने 'ऑपरेशन सफेद सागर' सुरू केले. या मोहिमेत मिग-२१, मिग-२३, मिग-२७, मिराज २००० आणि जग्वार या लढाऊ विमानांचा वापर करून शत्रूच्या ठिकाणांवर अचूक आणि भीषण बॉम्बफेक करण्यात आली. अतिउंचीवर विमान उडवून बॉम्बफेक करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम हवाई दलाच्या वैमानिकांनी लिलया पेलले. दुसरीकडे, समुद्रमार्गे पाकिस्तानने कोणतीही धाडसी हालचाल करू नये यासाठी भारतीय नौदलाने 'ऑपरेशन तलवार' राबवले. नौदलाच्या युद्धनौकांनी अरबी समुद्रात आपली ताकद दाखवून पाकिस्तानची सागरी नाकेबंदी करण्याची तयारी दर्शवली, ज्यामुळे पाकिस्तानवर प्रचंड मानसिक दबाव निर्माण झाला. या तिन्ही सैन्यांच्या अभूतपूर्व आणि अद्भूत समन्वयामुळे अखेर २६ जुलै १९९९ रोजी भारतीय सैन्याने कारगिलच्या सर्व शिखरांवर पुन्हा एकदा भारताचा तिरंगा पूर्ण अभिमानाने फडकवला.
कूटनैतिक विजय आणि जागतिक पटलावरील भारताचे स्थान
कारगिल युद्धाने भारताला केवळ रणंगणातच नव्हे, तर जागतिक कूटनैतिक पटलावरही मोठा विजय मिळवून दिला. आंतरराष्ट्रीय समुदायाने नियंत्रण रेषेला (LoC) भारत आणि पाकिस्तानमधील वास्तविक सीमा म्हणून स्पष्ट मान्यता दिली, ज्यामुळे जम्मू-काश्मीरच्या प्रादेशिक अखंडतेबाबत भारताच्या भूमिकेला मोठे जागतिक पाठबळ मिळाले. या युद्धामुळे पाकिस्तानवर प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव आला. ४ जुलै १९९९ रोजी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचा घाईघाईने दौरा केला असता, अमेरिकेच्या अध्यक्षांनी पाकिस्तानच्या या कारवायांची तीव्र निर्भर्त्सना केली आणि सैन्याला तात्काळ मागे हटवण्याचे निर्देश दिले. या आंतरराष्ट्रीय तणावामुळे पाकिस्तान जागतिक स्तरावर पूर्णपणे एकाकी पडला. तसेच, भारताने दाखवलेला अत्यंत जबाबदार अण्वस्त्रधारी देशाचा संयम जगाला भावला. या युद्धामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंधांना एक नवी आणि सकारात्मक दिशा मिळाली, ज्याची परिणती पुढे ऐतिहासिक भारत-अमेरिका नागरी अणू करारात झाली.
कारगिल समीक्षा समिती आणि सुरक्षा क्षेत्रातील क्रांती
कारगिल युद्धातील विजयानंतर भारताने आपल्या राष्ट्रीय सुरक्षा चौकटीचे अतिशय सखोल पुनरावलोकन केले. युद्धादरम्यान झालेल्या चुका, गुप्तचर यंत्रणांमधील उणिवा आणि सीमा व्यवस्थापनातील कमतरता शोधून काढण्यासाठी ज्येष्ठ संरक्षण तज्ज्ञ के. सुब्रह्मण्यम यांच्या नेतृत्वाखाली 'कारगिल समीक्षा समिती' (KRC) स्थापन करण्यात आली. या समितीने सादर केलेल्या अहवालानंतर भारताच्या संरक्षण आणि गुप्तचर व्यवस्थेत आमुलाग्र सुधारणा करण्यात आल्या. तिन्ही दलांमध्ये (लष्कर, नौदल आणि हवाई दल) परिपूर्ण समन्वय आणि एकसंधता आणण्यासाठी 'चीफ ऑफ डिफेंन्स स्टाफ' (CDS) या सर्वोच्च लष्करी पदाची निर्मिती करण्यात आली, जे सरकारचे प्रमुख एक खिडकी सैन्य सल्लागार म्हणून काम करतात. तसेच, तिन्ही दलांच्या संसाधनांचे एकत्रीकरण करून भविष्यातील युद्धांसाठी अंदमान आणि निकोबार कमान या पहिल्या त्रि-सेवा कमानची स्थापना करण्यात आली.
गुप्तचर यंत्रणांचे बळकटीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञान
कारगिलच्या वेळी गुप्तचर माहिती वेळेवर न मिळाल्याची कसर भरून काढण्यासाठी देशात अनेक नवीन संस्थांची स्थापना झाली. तांत्रिक गुप्तचर माहिती संकलित करण्यासाठी 'नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन' (NTRO) ची निर्मिती करण्यात आली. तसेच सैन्यदलांच्या गुप्तचर माहितीचे संकलन आणि समन्वय साधण्यासाठी 'डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी' (DIA) ची स्थापना झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) यांच्याकडे सर्व गुप्तचर यंत्रणांच्या समन्वयाची मुख्य जबाबदारी सोपवण्यात आली. सीमा सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवत थर्मल इमेजिंग कॅमेरे, मोशन सेन्सर्स आणि अत्याधुनिक रडार सिस्टीम सीमेवर बसवण्यात आल्या. इंटेलिजन्स ब्युरोला (IB) प्रमुख दहशतवादविरोधी यंत्रणा म्हणून सक्षम करण्यात आले.
स्वदेशी उपग्रह प्रणाली आणि नवीन लष्करी सिद्धांत
कारगिल युद्धाच्या काळात भारतीय सैन्याला शत्रूच्या स्थानांची अचूक माहिती मिळवण्यासाठी उपग्रह नेव्हिगेशनची अत्यंत गरज होती. त्यावेळी अमेरिकन सरकारने आपल्या जीपीएस (GPS) प्रणालीची माहिती भारताला देण्यास स्पष्ट नकार दिला होता. या कटू अनुभवामुळे भारताने स्वतःची स्वावलंबी यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला, ज्यातूनच 'भारतीय प्रादेशिक उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली' (IRNSS) म्हणजेच 'नाविक' प्रणालीचा जन्म झाला. सैन्यासाठी धनुष तोफा आणि आकाश क्षेपणास्त्रांसारख्या स्वदेशी शस्त्रास्त्रांचा समावेश करण्यात आला. याशिवाय, पाकिस्तानच्या छुप्या आणि बहुआयामी युद्धांना सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने 'कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिन' सारख्या नवीन आणि आक्रमक लष्करी सिद्धांतांचा विकास केला, ज्यामुळे भारताची सुरक्षा यंत्रणा पूर्वीपेक्षा कैक पटीने मजबूत झाली आहे.