पणजी :यंदा राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ३४.५ टक्क्यांनी कमी असले तरी अधूनमधून होणाऱ्या मुसळधार सरींमुळे धरणांतील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. २५ जुलैअखेर गवाणे, साळावली आणि तिलारी ही राज्यातील तीन प्रमुख धरणे ८० टक्क्यांहून अधिक भरली असून पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीही तुर्तास दिलासा मिळाला आहे.
तीन प्रमुख धरणांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा
२५ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार गवाणे धरणात सर्वाधिक ८६ टक्के पाणीसाठा असून साळावली धरण ८४ टक्के आणि तिलारी धरण ८१ टक्के भरले आहे. याशिवाय आमठाणे धरणात ७५ टक्के, पंचवाडी धरणात ७४ टक्के, चापोली धरणात ५९ टक्के, तर अंजुणे धरणात ४८ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार २६ ते २८ जुलैदरम्यान राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १.३४ इंच पावसाची नोंद झाली असून शनिवारीही अनेक भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाबरोबर जोरदार सरी कोसळल्या. १ जून ते २५ जुलै या कालावधीत राज्यात सरासरी ४५.७४ इंच पावसाची नोंद झाली आहे.
शनिवारी पणजी येथे कमाल ३१.६ अंश सेल्सिअस, तर किमान २४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमध्ये कमाल तापमान ३१.४ अंश आणि किमान तापमान २४.६ अंश सेल्सिअस होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३१ जुलैपर्यंत राज्यातील कमाल तापमान ३२ ते ३३ अंश, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.


