पणजी :केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शनिवारी आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आनंदोत्सवादरम्यान ‘फ्री उमर खालिद’ असे पोस्टर झळकवल्याने तणाव निर्माण झाला. संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी आंदोलकांनी, तर प्रत्युत्तरादाखल भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केले.
पोस्टरबाजीनंतर पोलिसांची कारवाई
आंदोलनादरम्यान तोंडावर मास्क लावलेल्या दानिश नावाच्या व्यक्तीने ‘फ्री उमर खालिद’ असे लिहिलेले पोस्टर झळकवले. याबाबत विचारणा केली असता, असे पोस्टर प्रदर्शित करण्याचा आपल्याला अधिकार असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला मास्क काढण्यास आणि ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. मात्र, त्याने नकार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
संबंधित व्यक्तीला पोलीस मुख्यालयात नेले जात असताना त्याच्यासोबत असलेल्या काही कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी आंदोलकांनी पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले.
सीजेपीच्या आंदोलनात ‘फ्री उमर खालिद’ हा मुद्दा कसा आला, असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांचा वापर करून विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पणजी पोलीस स्थानकासमोर स्वतंत्र ठिय्या आंदोलन सुरू केले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गट पोलीस मुख्यालयासमोर आंदोलनावर ठाम राहिले.


