एका खोडकर मुलाच्या बालिश चुकीमुळे घडलेला भीषण अपघात आणि भावाचा अकाली मृत्यू... सुबोधच्या आयुष्याला हादरवून टाकणाऱ्या या घटनेतून, त्याने दुःखावर मात करत मिळवलेल्या व्यावसायिक यशाची ही एक प्रेरणादायी कथा.

सुबोध लहानपणासूनच अत्यंत उनाड आणि मस्तीखोर मुलगा होता. अभ्यासात अजिबात लक्ष नसल्यामुळे त्याचे आई-वडील त्याला समजावून थकले होते. पाचवीत असतानाच तो दोनदा नापास झाला, ज्यामुळे शेवटी कंटाळून घरच्यांनी त्याला जवळच्या एका सरकारी शाळेत टाकले. तिथेही सुबोधचा फक्त मस्ती करण्यातच वेळ जात असे. कसंबसं करत तो नववीपर्यंत पोहोचला.
नववीत असताना त्यांच्या शाळेत गणिताच्या एक नवीन शिक्षिका आल्या. सुबोधच्या खोडकर स्वभावामुळे त्याने चक्क मुख्याध्यापकांकडेच त्या शिक्षिकेची तक्रार केली; की त्या फक्त पुढच्या दोन बाकांवर बसणाऱ्या मुलांकडेच लक्ष देतात आणि त्यांनाच शिकवतात. पण त्या शिक्षिकेने सुबोधवर राग न काढता, त्याला सुधारण्यासाठी त्याच्यावर वर्गातील काही जबाबदाऱ्या सोपवायला सुरुवात केली.
याच दरम्यान सुबोधचा चुलत भाऊ, प्रकाश आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून पुन्हा गोव्यात राहायला आला होता. त्याने सुबोधची अभ्यासातील दयनीय अवस्था पाहिली आणि नित्यनेमाने त्याचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली. प्रकाश दादाच्या सोप्या आणि आपुलकीच्या शिकवणीमुळे, जो सुबोध आधी गणितात नेहमी नापास व्हायचा, तो आता गणितात रुची दाखवू लागला. परंतु, तोपर्यंत वर्ष संपत आले होते. पहिल्या तीन सहामाही परीक्षांमध्ये नापास झाल्यामुळे, शेवटच्या परीक्षेत सुधारणा करूनही सुबोध नववीत पास होऊ शकला नाही.
दुसऱ्या वर्षी जेव्हा त्याने पुन्हा नववीत प्रवेश घेतला, तेव्हा प्रकाश दादाने घेतलेल्या सातत्यपूर्ण सरावामुळे सुबोध वर्गात चक्क गणितात पहिला येऊ लागला. आता त्याला गणित हा विषय खूप आवडू लागला होता. गणितातील यशामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि तो इतर विषयांतही चांगले गुण मिळवण्याचे प्रयत्न करू लागला.
अशा रीतीने सुबोधचे दहावीचे वर्ष व्यवस्थित पार पडले. प्रिलिम (सराव) परीक्षेत त्याला गणितात खूप चांगले गुण मिळाले, तर इतर विषयांत पास होण्यापुरते गुण मिळाले. मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी जवळच्याच एका सामाजिक संस्थेने एका शाळेत पूर्ण दिवसाची 'खास कार्यशाळा' आयोजित केली होती. सुबोधही तिथे गेला, पण त्याच्या चंचल आणि मस्तीखोर स्वभावामुळे त्याला दिवसभर एका जागी बसून राहणे असह्य झाले. कंटाळून त्याने आपला भाऊ प्रकाश याला फोन करून आपल्याला न्यायला बोलावले. सुबोधला आणण्यासाठी प्रकाश मोटारसायकलवरून निघाला, पण वाटेतच एका भरधाव ट्रकने त्याच्या गाडीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की प्रकाशचा जागच्या जागीच मृत्यू झाला.
जेव्हा सुबोधला ही बातमी समजली, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो पळत घरी गेला, पण हे क्रूर सत्य पचवणे त्याला कठीण जात होते. "माझ्या एका फोनमुळे, माझ्या बालिशपणामुळे दादाचा जीव गेला," या विचाराने तो स्वतःलाच दोषी मानू लागला. आपला जीवाभावाचा भाऊ जग सोडून गेल्याचे दुःख काय असते, हे सुबोधच्या मनाला पुरते कळून चुकले होते.
त्यानंतर लवकरच दहावीची मुख्य परीक्षा आली. सुबोध मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचला होता. अभ्यासात मन लागणे शक्यच नव्हते. परीक्षेचा निकाल लागला तेव्हा तो गणितात तर पास झाला, पण इंग्रजी आणि विज्ञान या विषयांत नापास झाला. त्याची मानसिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली होती, त्याला पुढे काय करावे हेच समजत नव्हते.
अशा कठीण प्रसंगात, एक दिवस सुबोधच्या आयुष्याला कलाटणी देणारा साक्षात्कार झाला. प्रकाश दादा त्याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला:
“हे बघ सुबोध, जर तुला मनापासून वाटत असेल की माझ्या आत्म्याला शांती मिळावी, तर या दुःखातून बाहेर पड. खूप अभ्यास कर आणि आयुष्यात एक यशस्वी माणूस बनून दाखव!”
त्या स्वप्नाने सुबोध खडबडून जागा झाला. दादाचे ते शब्द त्याच्या मनात घर करून गेले. त्याने स्वतःला सावरले. जून महिन्यात होणाऱ्या सप्लीमेंट्री (पुरवणी) परीक्षेसाठी त्याने जी लावून अभ्यास केला आणि तो दोन्ही विषयांत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला.
दहावी पूर्ण झाल्यानंतर सुबोधने 'शिप बिल्डिंग'चा एक छोटा कोर्स केला आणि काही काळ तो 'मारमुगाव पोर्ट'वर नोकरीला लागला. परंतु, तिथे त्याला महिन्याला अवघा दहा हजार रुपये पगार मिळत असल्याने त्याचे मन त्या नोकरीत रमले नाही. काहीतरी स्वतःचे करावे या विचाराने त्याला एक व्यवसायाची कल्पना सुचली.
सुरुवातीला त्याने सजावटीचे (Decoration) काही साहित्य विकत घेतले आणि छोटे-मोठे कार्यक्रम, सण समारंभांत लाईटिंग व डेकोरेशनची कामे करायला सुरुवात केली. हळूहळू कामाचा व्याप वाढवून त्याने मंडप (पंडाल) घालण्याचे कंत्राट घेण्यास सुरुवात केली. पुढे जाऊन त्याने यात 'कॅटरिंग' व्यवसायाचीही जोड दिली. सुबोधच्या कष्टाचे चीज झाले आणि आज त्याच्या हाताखाली अनेक माणसे काम करत आहेत. गोव्यातील एक यशस्वी आणि प्रतिष्ठित व्यावसायिक म्हणून आज तो ओळखला जातो.
आज सुबोध यशस्वी झाला आहे, पण "आपल्यामुळे प्रकाश दादाचा जीव गेला" ही टोचणी त्याच्या मनात आजही कुठेतरी जिवंत आहे. पण आता त्याच्या मनात एकच मोठे समाधान आहे, की दादाने स्वप्नात सांगितल्याप्रमाणे तो आयुष्यात यशस्वी झाला आहे आणि यामुळे नक्कीच प्रकाश दादाच्या आत्म्याला चिरशांती मिळाली असेल!

- सौ गौरी रोशन वेर्लेकर