भावना दाबून ठेवण्यापेक्षा त्या समजून घेण्याची सवय लागली, तर अनेक संघर्ष हिंसेपर्यंत पोहोचण्याआधीच थांबू शकतात. कारण माणूस जेव्हा स्वतःच्या भावनांना त्याच्या शब्दांतून वाट देतो, तेव्हा त्याला त्या कृतीतून सिद्ध करण्याची गरजच उरत नाही.

तूमाझं म्हणणं का नाही ऐकलंस?"
हे वाक्य आपण किती सहज बोलून जातो. पण त्यामागे दडलेला भाव कधी लक्षात घेतला आहे का? काही वर्षांपूर्वी हे वाक्य एखाद्या किरकोळ रुसव्यापुरतं मर्यादित असायचं. आज मात्र नातेसंबंध तुटताना, मैत्री संपताना, सोशल मीडियावर द्वेषपूर्ण प्रतिक्रिया देताना आणि कधी कधी गंभीर गुन्ह्यांमध्येही हाच भाव दिसून येतो, “मला नकार कसा दिलास?”
अलीकडे आपण रोजच्या बातम्यांमध्ये पाहतो, प्रेमप्रकरणातून खून, किरकोळ वादातून मारामाऱ्या, सोशल मीडियावरील ट्रोलिंग, रागाच्या भरात घेतलेले टोकाचे निर्णय. प्रश्न पडतो, लोक इतके असहिष्णू का होत चालले आहेत?
मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर माणूस दुःखापेक्षा नकार अधिक कठीणपणे सहन करतो. कारण नकार फक्त एखाद्या गोष्टीचा नसतो; तो आपल्या अहंकाराला लागलेला धक्का असतो. आपण मनोमन एक कथा तयार केलेली असते, “हे नातं माझं आहे”, “ही संधी मला मिळालीच पाहिजे”, “हा माणूस माझ्या अपेक्षेप्रमाणेच वागला पाहिजे.” आणि जेव्हा वास्तव त्या कथेला छेद देतं तेव्हा आतून अस्वस्थता निर्माण होते.
पूर्वी जीवनात प्रतीक्षा होती. रांगेत उभं राहणं होतं. पत्रांची वाट पाहणं होतं. अपयश पचवण्यासाठी वेळ मिळायचा. आजच्या जगात सर्व काही एका क्लिकवर मिळतं. पण दुर्दैवाने भावनांना प्रोसेस व्हायला अजूनही वेळच लागतो ना! त्यामुळे आपण तंत्रज्ञानात किती ही प्रगत झालो, तरीही आपल्या भावनिक सहनशीलतेचा सराव मात्र कमी झाला आहे.
खरंतर, सोशल मीडियानेही या कथेत मोठी भूमिका बजावली आहे. तिथे प्रत्येक जण आनंदी, यशस्वी आणि परिपूर्ण दिसतो. त्यामुळे स्वतःच्या वेदना, अपयश किंवा नकार स्वीकारणं अधिक अवघड होतं. आपल्याला वाटतं, “सगळ्यांचं आयुष्य सुरळीत आहे, फक्त माझंच का बिघडलं?” आणि मग निर्माण होतो राग. स्वतःवर, इतरांवर, जगावर.
विशेषतः मुलांना आणि तरुणांना आपण यशाची भाषा शिकवतो. पण नकाराची भाषा शिकवत नाही. गुण कमी आले तर काय करायचं, प्रेमात अपयश आलं तर कसं सावरायचं, एखाद्याने आपल्याला नाकारलं तर ते वैयक्तिक अपमान नाही हे कसं समजून घ्यायचं याचं शिक्षण कुठे मिळतं?
खरं तर भावनिक परिपक्वता म्हणजे प्रत्येक वेळी जिंकणं नाही. ती म्हणजे हरल्यानंतरही स्वतःला न हरवणं. एखाद्याने “नाही” म्हटलं म्हणून आपली किंमत कमी होत नाही. नातं संपलं म्हणून जीवन संपत नाही. आणि मतभेद झाले म्हणून समोरचा शत्रू होत नाही.
आज आपल्या समाजाला कदाचित नवीन कायद्यांपेक्षा जास्त गरज आहे ती भावनिक शिक्षणाची. राग व्यक्त करण्याची, दुःख पचवण्याची, नकार स्वीकारण्याची आणि स्वतःच्या जखमांकडे प्रामाणिकपणे पाहण्याची.
कारण प्रत्येक हिंसक कृतीच्या आधी अनेक वर्षांचा न बोललेला राग, न स्वीकारलेलं दुःख आणि न समजलेली भावना दडलेली असते.
अशा वेळी समुपदेशनाची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. दुर्दैवाने अजूनही अनेकांना वाटतं की समुपदेशकाकडे जाणं म्हणजे आपण कमकुवत आहोत याची कबुली देणं. प्रत्यक्षात मात्र समुपदेशन म्हणजे स्वतःच्या मनाशी प्रामाणिकपणे भेटण्याची प्रक्रिया असते. आपल्या रागामागचं दुःख, आपल्या मालकीच्या भावनेमागची असुरक्षितता, आणि नकाराच्या भीतीमागची जखम समजून घेण्याची ती एक सुरक्षित जागा असते.
समुपदेशक कोणाची बाजू घेत नाही, तो व्यक्तीला स्वतःकडे पाहायला शिकवतो. “मला एवढा राग का येतो?”, “माझ्यासाठी नकार इतका असह्य का ठरतो?”, “माझ्या अपेक्षा आणि वास्तव यांच्यात इतका संघर्ष का आहे?” अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यास मदत करतो. अनेकदा लोकांना वाटतं की त्यांचा क्रोध ही एक समस्या आहे. पण समुपदेशन सांगतं की तुमच्या रागाच्या मागे दडलेलं दुःख, भीती किंवा असुरक्षितता समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे.
भावना दाबून ठेवण्यापेक्षा त्या समजून घेण्याची सवय लागली, तर अनेक संघर्ष हिंसेपर्यंत पोहोचण्याआधीच थांबू शकतात. कारण माणूस जेव्हा स्वतःच्या भावनांना त्याच्या शब्दांतून वाट देतो, तेव्हा त्याला त्या कृतीतून सिद्ध करण्याची गरजच उरत नाही.
आणि म्हणून कदाचित आज प्रश्न एवढाच नाही की समाज अधिक असहिष्णू होत चाललाय. खरा प्रश्न हा आहे की आपण आपल्या भावनांना समजून घेण्यासाठी, नकार स्वीकारण्यासाठी आणि गरज पडल्यास मदत मागण्यासाठी तयार आहोत का?

मानसी कोपरे, मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक, डिचोली - गोवा, ७८२१९३४८९४