छत्रीबहाद्दर आणि आठवणींचा पाऊस

​आता मी सर्व व्यापातून निवृत्त झाले. कुठे जायचे नसते, तरीसुद्धा एक छोटी बटण छत्री कायम माझ्या बॅगेत असतेच. मला एक मनात आशा असते की, कधीतरी भर पावसात छत्री गोल फिरवून लोकांवर पाणी उडवायला मिळावे म्हणून. एक गंमत हो आपली…

Story: सहज सुचलेलं |
12th June, 11:54 pm
छत्रीबहाद्दर आणि आठवणींचा पाऊस

‘‘ने​मेची येतो पावसाळा" या उक्तीप्रमाणे बरोबर सात जूनला मृगाचा पाऊस सुरू झाला या वर्षी. तसा अजून जोर धरलेला नाही, पण बाजारात रेनकोट, छत्र्या दिसायला लागल्यात एवढे मात्र खरे. पूर्वी मुंबईत राहताना पावसाळ्याची तयारी म्हणजे माळ्यावर धूळ खात पडलेल्या छत्र्या एका रविवारी खाली काढून, स्वच्छ पुसून वापरणे योग्य आहे की नाही याची चाचपणी करणे. अर्थात बऱ्याच छत्र्या कुठे झुरळांनी कपडा खाल्ला, तर कुठे तार गंजून तुटली अशा अवस्थेतच असत. मग अशा अंडर-मेंटेनन्स छत्र्यांची रवानगी जोशी छत्रीवाल्याकडे होत असे. मागे मी या छत्रीवाले जोश्यांवर एक लेखही लिहिला होता. कोणाच्या अध्यात ना मध्यात नसणारे जोशी आपल्या कामात मात्र वाकबगार पक्के! मोडक्या छत्रीचं रूपडं असं काही बदलून टाकीत की या वर्षी नवीन छत्री घ्यायची असं कितीही ठरवले, तरीही जोशींनी नटवलेली ही दुल्हन बघून तो विचार मनातल्या मनात विरून जायचा.

​पूर्वी रेनकोट हा प्रकार तसा फारसा प्रचलित नव्हता. मी तरी रेनकोट पाहिले ते पोलिसांच्या आणि रेल्वे रुळावर काम करणाऱ्यांच्या अंगावरच. बाकी सगळे छत्रबहाद्दर! पूर्वी बटण छत्र्या नव्हत्या. एक लांबलचक दांडा, ज्याला एका बाजूस अर्धगोलाकृती नक्षीकाम केलेली मूठ आणि दुसऱ्या बाजूस अतिशय कुशलतेने बसवलेल्या आठ, बारा, सोळा अशा तारा आणि त्यावर काळा कपडा. आठ तारांची छत्री ही शक्यतो स्त्रियांसाठी असे, तर सोळा काड्यांची छत्री हे मुख्यत्वे ऑफिसातील मोठे साहेब लोकच वापरात. पाऊस नसताना रस्त्यात आगाऊपणा करणाऱ्या कुत्र्यांना दणका देण्यासाठीही त्यांचा वापर होई.

​आमच्या महिलांच्या छत्र्या मात्र आठ काड्यांच्या, जेमतेम. अगदी रंगीबेरंगी! मी ज्या शाळेत शिकवीत असे, त्या शाळेतील काही शिक्षिका तर पावसाळ्यात अंगावरच्या साडीला मॅचिंग रंगाची छत्री वापरत असत. असो! शाळेत असताना प्रायमरीपर्यंत स्वतःची छत्री म्हणजे काय मान असतो ते माहीत नव्हते, किंबहुना ते वयही तसे नव्हते. पण इयत्ता जशी वाढू लागली, तशी अक्कलही. इतरांचे पाहून मीसुद्धा बाबांच्या मागे लागून, रडून, सावर्ड्याच्या बाजारातून माझ्यासाठी स्वतंत्र नवीन छत्री आणलीच. मस्त मला आवडणाऱ्या मरून कलरची, वर छान चमकणारा दांडा! इतकी सुरेख की दोन दिवस ती मला उघडावीशी वाटतच नव्हटी. अहो, पावसात भिजून खराब झाली तर! हा आपला मला पडलेला भाबडा प्रश्न. दोन दिवस शाळेत छत्री नेऊनसुद्धा भिजत घरी येत होते. शेवटी आईला कळल्यावर पाठीत दोन धपाटे घालून तिने मला पडलेल्या प्रश्नाचा निकाल लावला आणि दुसऱ्या दिवसापासून मी ऑफिशियली छत्री वापरायला सुरुवात केली.

​पंधरा दिवस व्यवस्थित गेले. खरे सांगू, आमच्या वर्गात तशी मीच जरा लहान वगैरे दिसणारी. गावची शाळा ना, ती सगळी मुले अगदी दणकट! त्यात मला शाळेत नेहमी दप्तरातल्या वस्तू विसरून, हरवून यायची सवय. कधी रुमाल, तर कधी पाण्याची बाटली, कधी पेन्सिली. तुम्हाला माहिती आहे अहो, फक्त दप्तर हा प्रकार सोडून त्यातील पुस्तकांपासून ते खोडरबरपर्यंत सर्व वस्तू मी माझ्या शालेय जीवनात हरवून आलेली आहे. मी माझ्या आयुष्यात जास्त मारही ह्याच कारणावरून खाल्ला आहे. तर मी छत्री वापरायला सुरुवात केली. मग सुरू झाले पावसातले खेळ. छत्री गरागरा फिरवून पाणी दुसऱ्यांच्या अंगावर उडवणे, बंद केलेली छत्री चिखलात उभी रुतवणे, घरी छत्री उघडून घर-घर खेळणे, अनेक! तर अशी ही छत्री माझ्या नेहमीच्या सवयीनुसार मी एक दिवस शाळेत विसरून आले. झाले! मग काय, घरी पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाली. आईचे धपाटे, त्यात बाबांचा ओरडा! अगदी डबल बार वाजला. शेवटी आजीच्या कुशीत झालेल्या चुकीचे परिमार्जन झाले. नंतर जी दुसरी छत्री घेतली, त्यावर मग मावशीने माझे नाव घातले. त्यामुळे हरवण्याचा प्रश्नच नव्हता. ती मात्र मी कॉलेजपर्यंत वापरली.

​आता मी सर्व व्यापातून निवृत्त झाले. कुठे जायचे नसते, तरीसुद्धा एक छोटी बटण छत्री कायम माझ्या बॅगेत असतेच. माझी मुलगी स्कूटरवरून जाताना डक बॅगचा मस्त रेनकोट घालून जाते स्कूटरवरून ऐटीत. आमचे हे तर पावसात बाहेर पडतच नाहीत. मलाच एक मनात आशा असते की, कधीतरी भर पावसात छत्री गोल फिरवून लोकांवर पाणी उडवायला मिळावे म्हणून. एक गंमत हो आपली.


सौ. रेशम जयंत झारापकर, मडगाव,गोवा