मॉर्फ केलेले अश्लील पोस्टर प्रसारित करून बदनामी!

आमदार बोरकारांच्या महिला कर्मचाऱ्याविरोधात आरजीपीचे अजय खोलकर यांची पोलिसांत तक्रार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th June, 11:57 pm
मॉर्फ केलेले अश्लील पोस्टर प्रसारित करून बदनामी!

पणजी : रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजीपी) मधील अंतर्गत वादाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे. आरजीपीचे खजिनदार अजय खोलकर यांनी आमदार वीरेश बोरकर यांना लक्ष्य करत त्यांची कर्मचारी करिश्मा नाईक यांच्या विरोधात एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली आहे.

अजय खोलकर यांनी आरोप केला आहे की, करिश्मा नाईक यांनी सोशल मीडियावर त्यांचे मॉर्फ केलेले अर्धनग्न पोस्टर प्रसारित करून त्यांची बदनामी केली. यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला असून हा प्रकार त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन, मानसिक छळ, चारित्र्यहनन आणि सामाजिक अपमान करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

खोलकर यांनी ही तक्रार जुने गोवे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक (मुख्यालय) तसेच उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली आहे. तक्रारीत त्यांनी आपण अनुसूचित जमाती समाजातील असून ‘इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया’चे सदस्य असल्याचे नमूद केले आहे.

या प्रकरणात तातडीने एफआयआर नोंदवून सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तसेच आक्षेपार्ह मजकूर आणि पोस्टचे स्क्रीनशॉट आदी कागदपत्रेही सादर केली आहेत.

दरम्यान, या तक्रारीची प्रत गोवा अनुसूचित जाती-जमाती आयोगालाही पाठविण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा