कारचा धक्का दुचाकीला बसल्यावरून शिवोलीत मारहाण, पैसे उकळण्याचा प्रकार

पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद : फिर्यादीच्या कार, मोबाईलचे केले नुकसान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
कारचा धक्का दुचाकीला बसल्यावरून शिवोलीत मारहाण, पैसे उकळण्याचा प्रकार

म्हापसा : मार्ना शिवोली येथे रोडरेजवरून मुंबईतील एका व्यक्तीसह तिघांना मारहाण करून १० हजार रूपये खंडणी रक्कम उकळण्यासह कार व मोबाईलची मोडतोड करण्यात आली. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी पाच स्थानिक युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना रविवार, ७ रोजी मध्यरात्री १२ वा. सुमारास घडली होती. याप्रकरणी मार्ना शिवोली येथील ला दोनैरा सोसायटीमध्ये राहणारे व मूळ मुंबई येथील मानव मेहता यांनी तक्रार दिली आहे.

ला दोनैरा सोसायटीच्या गेटजवळ घटनेवेळी फिर्यादी मेहता यांच्या कारची किरकोळ धडक संशयिताच्या दुचाकीला बसली. त्यावरून दुचाकीस्वार तसेच इतर मिळून अज्ञात पाच संशयितांनी फिर्यादींशी वाद घातला. त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या मदतीसाठी धावून आलेल्या सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला देखील संशयितांनी मारहाण केली.

फिर्यादींनी आपल्या मदतीला मित्र इंदरदीप सिंग यांना बोलावले. तेव्हा संशयितांनी त्यांनाही मारहाण केली. नंतर दुचाकीची नुकसान भरपाई म्हणून संशयितांनी फिर्यादी मेहता यांच्याकडून १० हजार रुपये रक्कम यूपीआय मार्फत हस्तांतरीत करून घेतले. नंतर फिर्यादी तसेच इंदरदीप यांच्या गाडीची व मोबाईलची मोडतोड करून सव्वा लाख रुपयांचे नुकसान केले.

हणजूण पोलिसांनी तक्रार दाखल होताच संशयितांविरुद्ध भा.न्या.सं.च्या १८९(२), १९१(२), ११५(२), ३०८(२), ३५१(२), १२७(३), ३२४(५) व १९० कलमान्वये खंडणी, दंगल माजवणे, मारहाण व मोडतोडीचा गुन्हा नोंद केला.

पोलिसांनी संशयित आरोपींची ओळख पटवली असून त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साईश शेटगावकर हे पुढील तपास करत आहेत. 

हेही वाचा