मृतदेह विहिरीतील कचऱ्यामध्ये अडकल्याने शोधात अडथळा

वास्को : बिर्ला-झुआरीनगर येथे आपल्या नातेवाईकाकडे आलेला अमृत पुंडलिक परमार हा १९ वर्षीय युवक आपल्या मित्रांसह बुधवारी दुपारी विहिरीत पोहण्यासाठी उतरल्यावर बुडाला. त्याचा मृतदेह विहिरीतील कचऱ्यामध्ये अडकल्याने तो बाहेर काढण्यासाठी बराच त्रास घ्यावा लागला. शेवटी सायंकाळी उशीरा त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात द्दष्टीच्या जीवरक्षकांना यश आले.
अमृत हा मूळचा कर्नाटकचा असून तो बिर्ला- झुआरीनगर येथे राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे पंधरा दिवसांपूर्वी आला होता. बुधवारी दुपारी पंधरा सोळाजणांचा एक गट पोहण्यासाठी एका विनावापर विहिरीकडे आला होता. ती विहीर निर्जनस्थळी असल्याने सहसा कोणाच्या नजरेस येत नाही. काहीजण पावसाळ्यात पोहण्यासाठी तेथे येतात. आपल्या मित्रासह पोहण्यासाठी आलेल्या अमृतला पोहता येत नव्हते. त्यामुळे अमृत वगळता इतर पोहण्यासाठी विहिरीत उतरले होते. त्यांना पाहून अमृतने आपले कपडे उतरून विहिरीच्या बाजूला असलेल्या दोरखंडाला पकडून तो पाण्यामध्ये आंघोळ करू लागला. कदाचित तोल गेला असावा किंवा तो पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यावर पाण्यात दिशेनासा झाला. त्याचे इतर मित्र पाण्याबाहेर आले तेव्हा त्यांना अमृत त्या ठिकाणी नजरेस पडला नाही. त्यामुळे त्यांनी पाण्यात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. विहीर खूप खोल असल्याने अमृतचा शोध लागला नाही. त्यामुळे त्यांनी अमृतसंबंधी माहिती त्याच्या नातेवाईकांना दिली. याप्रकरणी आपत्कालीन कक्षाला माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस वगैरे तेथे पोहचले. अग्निशमन दलाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फोल ठरला. त्यामुळे पणजीहून पाण्यातील वस्तूंचा शोध घेणारा खास कॅमेरा आणण्यात आला. त्या कॅमेऱ्याचा वापर केल्यावर अमृत त्या विहिरीतील गाळ व कचऱ्यामध्ये फसल्याचे दिसून आले. त्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी द्दष्टीच्या जीवरक्षकांना बोलाविण्यात आले. खोल विहिरीत उतरण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था नसल्याने अडचण निर्माण झाली होती.
अमृत याचा मृतदेह चिकित्सेसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठविण्यात आला. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला.
मामलेदार, पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल
दरम्यान, मामलेदार प्रवीणजय पंडित, वेर्णाचे पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर तेथे पोहचले. त्यांनी तेथील परिस्थितीची पाहणी केली. पावसाळ्यात धोक्याच्या ठिकाणी कोणी पोहण्यासाठी जाऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. तेथे त्यासंबंधी फलक लावण्यात आले आहेत. मात्र, ही विनावापर व खोल विहीर संबंधितांच्या नजरेतून सुटली असावी. ती निर्जनस्थळी असल्याने तसेच त्या विहिरीचा वापर करण्यात येत नसल्याने त्या विहिरीची माहिती पुढे आली नसावी, असे सांगण्यात आले.