पोलिसांनी नग्न करून अश्लिल प्रकार करायला भाग पाडले!

मायणा-कुडतरी पोलिसांकडून मारहाणप्रकरणी पीडितांची न्यायाची विनवणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
43 mins ago
पोलिसांनी नग्न करून अश्लिल प्रकार करायला भाग पाडले!

मडगाव : मायणा कुडतरी पोलिसांनी रेस्ट रुममध्ये नेऊन पाचही पीडित युवकांना नग्न केले आणि नको ते अश्लिल प्रकार केले. कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह बोलून शिव्या दिल्या व मारहाण केली. याशिवाय सोडून देण्यासाठी पैशांचीही मागणी केली, असे पीडित युवकांनी सांगत न्यायाची मागणी केली. अ‍ॅड. लिओना बार्रेटो यांनी संबंधित सर्व पोलिसांना निलंबित करून सखोल चौकशीची मागणी केली.

मायणा-कुडतरी पोलीस स्थानकात अल्पवयीनासह पाच युवकांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात आता लैंगिक छळ झाल्याचेही पीडित युवकांनी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत केवळ पोलीस कॉन्स्टेबल चेतन कोळी याला निलंबित केले असून ही कारवाई म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचे अ‍ॅड. लिओना बार्रेटो यांनी म्हटले असून, इतर वरिष्ठ अधिकार्‍यांवर कारवाई का नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. या घटनेला पाच दिवस उलटूनही ड्युटी ऑफिसर पोलीस उपनिरीक्षक संकेत नाईक, गौरव नाईक, हेड कॉन्स्टेबल समीर सुधीर आणि कॉन्स्टेबल प्रतीक पुंडलिक यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. म्हापशातील सॅम्युएल ब्रागांझा या युवकाचा मृत्यूनंतर पोलिसांच्या मारहाणीचा मुद्दा गंभीर बनलेला आहे. या घटनेशी संबंधित सर्व पोलिसांची चौकशी होईपर्यंत सेवेतून निलंबित करावे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकारी किंवा गुन्हे शाखेकडे द्यावा. पोलीस हे जनतेचे सेवक असून त्यांनी जनतेला मारहाण करू नये तर त्यांचे रक्षण करणे अपेक्षित असल्याचे त्या म्हणाल्या.

पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण व लैंगिक छळाचा प्रकार घडला त्यावेळी पाचही पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी फुटबॉलसाठी घातले जाणारे ड्रेस घातले होते, ते पोलीस गणवेशात नव्हते. त्यांनी दहा वाजता पोलीस ठाण्यात आणले व पहाटे तीनपर्यंत मारहाण केली. काहीही खायला दिले नव्हते. त्यांनी सकाळी ९ वाजता पोलीस ठाण्यातून सोडले.

लैंगिक छळ करून व्हिडिओ बनवले

पोलिसांनी आमचे कपडे काढून नग्न केले. आमच्यासोबत नको ते प्रकार करत लैंगिक छळ केला, त्याचे व्हिडिओ बनवले. तंबाखू चघळून आम्हाला वास घेण्यास लावला. त्यांनी सांगितलेले न केल्यास पुन्हा मारहाण करत होते. याशिवाय दुसर्‍या दिवशी २० ते ३० हजार रुपये देण्याची मागणी केली. अन्यथा तुम्हाला दुसर्‍या कोणत्याही प्रकरणात गुंतवून कोठडीत टाकण्याची धमकीही दिली, असेही पीडितांनी सांगत न्यायाची मागणी केली. 

हेही वाचा