अभिजीत दिपकेंचे मोठे वक्तव्य : पुणे येथे आंदोलन

पुणे : देशभरात प्रचंड गाजत असलेल्या ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) केंद्र सरकारविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. ६ जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या यशस्वी आंदोलनानंतर आता पक्षाने आपला मोर्चा पुण्याकडे वळवला असून, आगामी २० जून रोजी दिल्लीत आणखी मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिला आहे.
पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अभिजीत दिपके यांनी आंदोलनाचा पुढील टप्पा आणि रणनीती स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्ही सध्या पुण्यात आंदोलन करत आहोत. आमच्यासोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी, तसेच एमपीएससी आणि यूपीएससीची तयारी करणारे शेकडो तरुण जोडले गेले आहेत. आगामी २० जून रोजी देशभरातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीत एकत्र यायचे आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही.
पुण्यातील या आंदोलनाला समाजातील विविध घटकांकडून मोठा पाठिंबा मिळाला आहे. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. इतकेच नव्हे तर, २० जून रोजी दिल्लीत होणाऱ्या आगामी आंदोलनात प्रख्यात पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील सक्रियपणे सहभागी होणार असल्याची माहिती दिपके यांनी या वेळी दिली. या आंदोलनादरम्यान पक्षाच्या वतीने एक विशेष ‘शिक्षणविषयक जाहीरनामा’ देखील प्रसिद्ध केला जाणार आहे.
पुण्यानंतर पुढील आंदोलन नागपूर येथे होणार असल्याचे स्पष्ट करत अभिजीत दिपके यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. आम्ही सरकारशी कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने चर्चा करण्यास सदैव तयार आहोत. परंतु, आमचा आवाज दाबण्यासाठी आमची सोशल मीडिया खाती बंद पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ही कोणतीही लोकशाही पद्धत नाही, अशी टीका त्यांनी केली.
लढाई कोणत्याही पक्षाविरोधात नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याची!
हे आंदोलन कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाच्या विरोधात नसून, देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या अंधकारमय होत चाललेल्या भविष्यासाठी आहे. ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात जोपर्यंत विद्यार्थ्यांना पूर्ण न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा हा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार दिपके यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी २० जूनच्या दिल्लीतील महाआंदोलनात देशातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.