ममता करणार काँग्रेसमध्ये 'घरवापसी'? कॉंग्रेस नेतृत्त्वाकडून राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची ऑफर

अभिषेक बॅनर्जी यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदाची ऑफर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
ममता करणार काँग्रेसमध्ये 'घरवापसी'? कॉंग्रेस नेतृत्त्वाकडून राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची ऑफर

कोलकाता : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या काँग्रेसमध्ये 'घरवापसी'च्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस नेतृत्वाने तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला आहे. तसेच त्यांचे पुतणे तथा टीएमसीचे नेते अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee ) यांना काँग्रेसमध्ये राष्ट्रीय सरचिटणीसपद देण्याचीही ऑफर असल्याचे सांगितले जात आहे.

ही चर्चा अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बंडखोरी झाल्याचा दावा केला जात आहे.  पक्षाच्या अनेक खासदार आणि आमदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.

ममता बॅनर्जी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधूनच केली होती. विद्यार्थी नेत्या म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि नंतर काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आल्या. माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव (P. V. Narasimha Rao)  यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणूनही काम पाहिले होते. मात्र १९९८ मध्ये काँग्रेसपासून वेगळे होत त्यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली.

दरम्यान, ममता बॅनर्जी किंवा काँग्रेस नेतृत्वाकडून या कथित प्रस्तावाबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे ममता बॅनर्जींची काँग्रेसमध्ये पुनरागमनाची शक्यता अद्याप चर्चेपुरतीच मर्यादित असून; अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा