होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेच्या हल्ल्यात ३ भारतीय खलाशांचा मृत्यू

ओमानच्या किनाऱ्याजवळ मालवाहू जहाजावर हल्ला; जहाजावर होते २४ भारतीय कर्मचारी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेच्या हल्ल्यात ३ भारतीय खलाशांचा मृत्यू

नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे. (Three Indian sailors were killed after a commercial vessel came under attack from the US military near the Strait of Hormuz) अमेरिकन लष्करी कारवाईदरम्यान व्यावसायिक जहाजावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय नौकावहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी गुरुवारी या घटनेची माहिती देत दुःख व्यक्त केले. पॅलाऊ ध्वज असलेल्या एमटी सेट्टेबेलो (MT Settebello)  या जहाजावर एकूण २४ भारतीय कर्मचारी होते. हल्ल्यानंतर बेपत्ता असलेल्या तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, दोन मृतदेह सापडले आहेत.

सोनोवाल यांनी सांगितले की, बचावलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने भारतात परत आणण्यासाठी आणि मृत खलाशांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी भारतात आणण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

२१ भारतीय खलाशांची सुटका

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर जहाजावरील २४ पैकी २१ भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. बेपत्ता तिघांचा ओमानच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने शोध आणि बचाव मोहीम सुरू होती.

एमटी सेट्टेबेलो हे जहाज आखातातील महत्त्वाच्या जलमार्गातून जात असताना हल्ल्याचे लक्ष्य बनले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे जहाज अमेरिकेच्या निर्बंध यादीतील नव्हते.

होर्मुझ परिसरात तणाव वाढला

होर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. अमेरिका-इराण संघर्षामुळे या भागातील सुरक्षा परिस्थिती गंभीर बनली आहे.  व्यापारी जहाजांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

भारताने या वाढत्या संघर्षावर चिंता व्यक्त करत सर्व देशांना संवाद आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. तसेच व्यापारी जहाजे, सामान्य नागरिक आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक व्यापार, ऊर्जा पुरवठा साखळी आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.


हेही वाचा