जूनमध्ये २८ जणांचा मृत्यू : एकूण मृतांपैकी १०३ जण दुचाकीस्वार

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : राज्यात अपघातसत्राला अद्याप ब्रेक लागलेला नसून यंदा १ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यांत १,३२४ रस्ते अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये १४२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. चिंताजनक बाब म्हणजे, एकाच जून महिन्यात विविध अपघातांत सर्वाधिक २८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक ७२.५३ टक्के, म्हणजेच १०३ जण हे दुचाकीचालक आणि त्यांच्यामागे बसलेले प्रवासी आहेत.
राज्यात यंदा १ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यांत १,३२४ रस्ते अपघात झाले. त्यात १३६ भीषण अपघात असून त्या अपघातांत १४२ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी २०२५ मध्ये याच कालावधीत राज्यात १,१९६ अपघात झाले होते. त्यातील १३८ भीषण अपघातांत १४१ जणांचा मृत्यू झाला होता. २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये अपघातांच्या संख्येत १२८ (१०.७० टक्के), तर मृतांच्या संख्येत १ (००.७१ टक्के) वाढ झाल्याचे समोर आले आहे.
याशिवाय २०२६ मध्ये १२५ अपघातांत १६२ जणांना गंभीर, तर २८९ किरकोळ अपघातांत ४७७ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. ७७५ अपघातांमध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. २०२५ मध्ये वरील कालावधीत १०९ अपघातांत १३२ जणांना गंभीर, तर २३६ अपघातांत ३८८ जणांना किरकोळ दुखापत झाली होती. शिवाय ७१३ वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.
वरील कालावधीत यंदा दगावलेल्या १४२ जणांमध्ये ६०.५६ टक्के, म्हणजेच ८६ दुचाकीचालकांचा समावेश आहे. याशिवाय, दुचाकीवर मागे बसलेले १७ जणाचा मृत्यू झाला. दोन्ही आकडेवारी पाहिल्यास ७२.५३ टक्के, म्हणजेच १०३ जण हे दुचाकीचालक आणि त्यांच्या मागे बसलेले प्रवासी आहेत. याशिवाय १८ पादचारी, १० चालक, ७ प्रवासी, दोन सायकलस्वार आणि अन्य दोघांचा यात बळी गेला आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये याच कालावधीत १४१ जणांचा जीव गेला होता. त्यावेळी मृतांमध्ये ८३ दुचाकीचालक होते. त्याशिवाय ३० पादचारी, दुचाकीवर मागे बसलेले १६ जण, ४ प्रवासी, ५ चालक आणि अन्य तिघांचा समावेश होता.
यंदा जून ठरला अपघाती महिना
(२०२६ मध्ये महिनानिहाय झालेले अपघाती मृत्यू)
जानेवारी -- १८
फेब्रुवारी -- २३
मार्च -- २२
एप्रिल -- २५
मे -- २२
जून -- २८