शिक्षक पदांसाठी भरती : ओबीसीसह सर्वसाधारण गटातही पात्र उमेदवारांची कमतरता

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : कर्मचारी भरती आयोगाने कोकणी आणि मराठी प्राथमिक शाळांतील ३९० शिक्षकपदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, अंतिम गुणवत्ता यादीत सर्वसाधारण आणि ओबीसी गटांसह एकूण ३१४ उमेदवारांचीच निवड झाली आहे. जाहिरातीत नमूद केलेल्या जागांपेक्षा ७६ उमेदवार कमी असून, सर्वसाधारण आणि ओबीसी गटातही आवश्यक तेवढे पात्र उमेदवार उपलब्ध झाले नाहीत.
कर्मचारी भरती आयोगाने ३० जानेवारी २०२६ रोजी मराठी आणि कोकणी प्राथमिक शाळांतील शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार मराठी शिक्षकांच्या ३५२ आणि कोकणी शिक्षकांच्या ३८ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. राज्यात बी.एड. आणि डी.एड. धारकांची संख्या मोठी असल्याने हजारो इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले. दोन संगणकाधारित (सीबीटी) परीक्षा आणि त्यानंतर पात्र उमेदवारांची वर्ग प्रात्यक्षिक (क्लास डेमॉन्स्ट्रेशन) चाचणी घेण्यात आली. त्यानंतर आयोगाने अंतिम गुणवत्ता यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली.
मराठीसाठी ३५२ पैकी २८७ उमेदवार
मराठी शिक्षकांच्या ३५२ पदांपैकी सर्वसाधारण गटासाठी १५८, अनुसूचित जमाती (एसटी) गटासाठी ४२, अनुसूचित जाती (एससी) गटासाठी ४, ओबीसी गटासाठी ११३ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) गटासाठी ३५ पदे राखीव होती. अंतिम गुणवत्ता यादीत सर्वसाधारण गटातील १३६, एसटी ४२, एससी ४, ओबीसी ९२, ईडब्ल्यूएस १०, दिव्यांग गटातील १ आणि गुणवंत क्रीडापटू गटातील २ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. एसटी आणि एससी गटातील सर्व जागा भरल्या असल्या तरी सर्वसाधारण गटात २२, ओबीसी गटात २१ आणि ईडब्ल्यूएस गटात २५ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे मराठी विषयासाठी एकूण ६५ पदे रिक्त राहिली आहेत.
कोकणीसाठी ३८ पैकी २७ उमेदवार
कोकणी प्राथमिक शाळांतील ३८ पदांसाठी सर्वसाधारण गटात १९, ओबीसी गटात १५ आणि ईडब्ल्यूएस गटात ४ जागा होत्या. अंतिम गुणवत्ता यादीत सर्वसाधारण गटातील ११, ओबीसी गटातील १५ आणि ईडब्ल्यूएस गटातील १ उमेदवाराची निवड झाली आहे. ओबीसीवगळता इतर गटांमध्येही जाहिरातीत नमूद केलेल्या जागांपेक्षा कमी उमेदवार पात्र ठरले.
प्रतीक्षा यादीही जाहीर
गुणवत्ता यादीसोबत प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे. मराठी विषयात सर्वसाधारण गटातील ५७ आणि एसटी गटातील २२ उमेदवार प्रतीक्षा यादीत आहेत. एससी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस गटासाठी प्रतीक्षा यादी जाहीर झालेली नाही. कोकणी विषयात सर्वसाधारण गटातील १३ आणि ओबीसी गटातील ८ उमेदवार प्रतीक्षा यादीत आहेत. गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारली नाही, तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना क्रमाने संधी दिली जाणार आहे.
कर्मचारी भरती आयोगाकडून निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्राप्त झाली असून, प्रमाणपत्रांची पडताळणी झाल्यानंतर सरकारतर्फे नियुक्तीपत्रे दिली जातील. जाहिरातीत नमूद सर्व जागा का भरल्या गेल्या नाहीत, याबाबत माहिती नाही.
_ शैलेश झिंगडे, संचालक, शिक्षण
पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड झाली आहे. शिक्षण खात्याने निर्धारित केलेल्या शैक्षणिक व इतर पात्रता निकषांनुसारच भरती प्रक्रिया राबविण्यात आली.
_ शशांक ठाकूर, सचिव, कर्मचारी भरती आयोग